विभाग नववा : ई-अंशुमान

उवा. - शरीराच्या निरनिराळ्या भागांवर उवांपासून एक प्रकारचा जवळ जवळ इसबासरखा पुरळ उठतो. त्यापासून पुष्कळदां फार त्रास होऊन रोग्याच्या स्वस्थतेचा अगदीं भंग होऊन त्यास कांहीं सुचेनासें होतें. स्थानपरत्वें त्यांच्या जाती निराळ्या असून त्यांपासून होणारीं लक्षणेंहि अंशतः भिन्न असतात. उवांच्या मुख्य तीन जाती आहेत. डोक्यांतील उवा (पेडिक्युली क्यापिट्स); अंगावरील उवा (पेडिक्युली कारपोरिस); आणि गुह्य भागावरील उवा (पेडिक्युली प्यूबिस).

डो क्या व री ल उ वा व त्यां चीं ल क्ष णें:- डोकें वितवितल्यासारखें होऊन दुखरें होतें; विशेषतः डोक्याच्या मागील भागाच्या खालील ग्रंथी किंवा कानाच्या पुढील अथवा मागील किंवा गळ्याच्या ग्रंथी सुजून, केव्हां केव्हां पिकतात व त्यामुळें रोग्यास गंडमाळांचा तर विकार झाला नसेलना, असा प्रथमारंभीं संशय येतो. परंतु पुढें अमळ बारकाईनें तपास करितां असें दिसून येतें कीं, केस विशेषतः त्यांच्या बुडांशीं खपल्या धरून, एकमेकांस चिकटलेले असून इसबांतल्याप्रमाणें डोक्यावर जागजागीं पुरळ उठलेला आहे. व मधून मधून थोडेथोडें कुरतडल्याप्रमाणें झालेलें आहे. विशेषतः ज्या बायकांचे केस लांब असतात त्यांच्या डोक्यावरील कुरतुडलेली जागा केव्हां केव्हां खोल असून तिचा दाह झालेला असतो. तेथील केंस वर करून नीट पाहतांच उवा स्पष्ट दृष्टीस पडतात.

परीक्षा:- कांहीं संशयच असल्यास तो दूर होण्यासाठीं केसांची नीट तपासणी करावी. केसांस चिकटून त्यांच्या बुडाजवळ उवांचीं अंडीं दृष्टीस पडतात. त्यांचा एकेक पुंजका फक्त टांचणीच्या डोक्याएवढा मोठा असून त्याचा रंग करडा असतो. प्रत्येक केसास चिकटून असा बहुधा एकच पुंजका असतो. तो एकाहून अधिक दृष्टीस पडल्यास असें अनुमान करण्यांस हरकत नाहीं कीं, केसाच्या बुडास अथवा अगदीं मुळास चिकटून जो पुंजका असतो त्याची वीण अगदीं नुकतीच झालेली असून डोक्याच्या पृष्ठभागापासून सुमारें एक इंच अंतरावर केंसास चिकटलेल्या पुंजक्याची वीण होऊन म्हणजे उवा होऊन बरेच दिवस झाले असावे. व त्या अवधींतच केंस इतके लांब वाढले गेले. अंडीं समूळ नाहींशीं करितां येण्यासाठीं तीं केंसास कशीं चिकटतात ह्या गोष्टीची अगदीं बरोबर माहिती पाहिजे, व ती होण्यासाठीं सूक्ष्मदर्शक कांचेची मदत घ्यावी. प्रत्येक केसाभोंवतालीं एक लांबट कडें असून तें केसांस चिकटलेलें असतें. व त्याच्या बाहेरच्या बाजूस अंडें चिकटलेलें असतें. ऊ हा अगदीं बारीक किडा असून तो केसांच्या मुळाजवळच रहातो, कारण त्या ठिकाणीं त्यास विशेष ऊब व चांगलें संरक्षण हीं साहजिकच मिळतात. उवेची लांबी १/१० इंच असते व ती फार चपळ असते. अंडें घातल्यानंतर सुमारें नऊ दिवसांनीं त्यांतून ऊ बाहेर पडते व सुमारें तितक्याच दिवसांनीं तिची पूर्ण वाढ होऊन पुढें सुमारें नऊ दिवसांनीं ती प्रजोत्पत्तीस योग्य होते.

चिकित्सा. – वरील हकिकतीवरून ही गोष्ट सहज ध्यानांत येईल कीं, चिकित्सा करितांना फक्त उवा मरून जाव्यात एवढाच यत्‍न करून उपयोगी नाहीं, उवांबरोबरच त्यांच्या असंख्यात असलेल्या अंडयांचाहि (लिखांचाहि ) नाश केला पाहिजे. उवा व अंडी ह्या दोहोंचा नाश करण्याचा सोपा उपाय म्हटला म्हणजे डोक्याचे सर्व केस वस्तर्‍यानें काढून टाकणें हा होय, व असें केल्यावर फक्त डोक्याचा पुरळ बरा करण्याशिवाय दुसरी खटपटच राहत नाहीं. पुरळ अथवा डोक्याचें इसब बरें होण्यास कांही स्निग्ध उपाय करावा. व्हॅसलीन डोक्यास लावावें, किंवा झिंकआंइटमेन्ट, अथवा समभाग गोडें तेल व चुन्याची निवळी हयांच्या मिश्रणाचा उपयोग करावा. परंतु पुष्कळदां हिंदु लोकांत स्त्रियांचे केंस काढून टाकणें मुळींच शक्य नसतें व विषेपत: उवांची पीडा स्त्रियांच्याच मागें फार असते. अशा स्थितींत पुढील उपाय करावेंत:-१:४० ह्या प्रमाणांत कर्बाम्ल ( क्यार्बालिक आसिड ) पाण्यांत मिसळून मिश्रण तयार करावें व त्याबरोबर जवसाचें पोटीस करून डोक्यावर लावावें म्हणजे उवांस पळून जाण्यास संधि न सांपडतां सर्व उवा मरून जातात किंवा साबणानें अथवा वरील प्रमाणांतल्या क्यार्बालिकच्या मिश्रणानें डोकें व केस चांगले घासून धुतल्यानेंहि त्या मरतात; उवा मरून जाण्याचा अगदीं बिनखर्ची व सोपा उपाय म्हटला म्हणजे रॉकेंल तेल नुसतें अथवा खोबरेल तेलाशीं मिश्र करून डोक्यास व केसांस चोपडून ठेवणें हा होय. हा उपाय केला असतानां दिव्याजवळ अथवा विस्तवाजवळ बसूं नये, नाहींतर केंस पेट घेण्याचा फार संभव असतो. उवा मेल्या तरी त्यांची अंडीं मागें राहतातच, त्यांचा नाश होण्यासाठीं क्यार्बालिकचें मिश्रण अथवा शिरका केसांच्या बुडास चांगला चोळून काळजीपूर्वक केंस रोज कांहीं दिवस विंचरण्याची खबरदारी घ्यावी. असें केल्यानें केसांभोंवतालीं झालेलीं कडीं ढिला होऊन निघून जातात व त्यांच्याबरोबर त्यांस लगटलेलीं अंडींहि निघून जातात. उवा अगदीं नाहींशा झाल्यानंतर पंधरा दिवसपर्यंत तरी डोकें ह्याप्रमाणें धुवून विंचरण्याची काळजी घेतल्यास अंडयांचा समूळ नाश होऊन पुन: उवा होण्याची भीति रहातच नाहीं.  

अं गा व री ल उ वा (पेडिक्युली कार्पोरीस):- ह्यांचीं लक्षणें डोक्यांतील उवांप्रमाणेंच असतात. अंगावरील उवांचें मुख्य लक्षण म्हटलें म्हणजे अंगास अतिशय खाज सुटणें हेंच होय. ह्यांच्यापासून डोक्याच्या भागास मात्र खाज सुटत नाहीं, कारण त्या डोक्यांत कधींहि होत नाहींत. रोगी आपल्या नखांनीं जोरानें अंग खाजवितो त्यामुळें अंगावर जागजागीं लांब बोचकारे उमटलेले असतात, इतकेंच नव्हें, परंतु अंगावर मंडलें, पुटकुळ्या अथवा लहान जखमाहि उद्भवतात. उवांची पराकाष्ठा झाली असल्यास सर्व त्वचा काळवंडून जाते. कारण त्वचेखालीं सांखळलेल्या रक्ताचा रंग बदलून जातों, व जागजागच्या गांठी मोठया होतात. थोडें लक्ष दिल्यास ह्या विकाराचा दुसर्‍या विकाराशीं पित्त, इसब, इत्यादिकांशीं घोंटाळा होण्याचा मुळीच संभव नाहीं.

परीक्षा:- अंगावरील उवांची ठाम परिक्षा होण्यासाठीं रोग्याच्या कपड्यांची काळजीपूर्वक तपासणी केली पाहिजे. कारण ह्या उवांचें मुख्य वसतिस्थान रोग्याच्या अंगावरील कपडेच होत, त्यांतून त्या चैनीनें वाटेल तेव्हां अंगावर जाऊन आपलें भक्ष्य मिळवितात. कपड्यांत जेथें सुरकुत्या फार असतात त्या ठिकाणींच म्हणजे कांखेच्या खालच्या भागांत, कमरेच्या अथवा मानेच्या भोंवतालीं त्यापासून फार त्रास होतो, काख व कुल्यासारख्या अंगाच्या ज्या भागास कपडा फारसा चिकटून नसतो त्या ठिकाणीं खाजविल्याच्या मुळींच खुणासुद्धां नसतात, कारण ह्या भागांवर उवा सहसा जातच नाहींत. ह्या उवांस अंगावरील उवा म्हणण्यापेक्षां कपड्यांवरील उवाच म्हणणें अधिक सयुक्तिक होईल. डोक्यांतील उवापेक्षां ह्या उवा अधिक मोठ्या असून अधिक चपळहि असतात, त्यांचें डोकें लाबंट व अधिक निमगोल असतें, आणि त्यांचा वर्ण मळकट पांढरा असून कडेला त्यांत काळी झांक असते.

चिकित्सा:- रोग्याच्या त्वचेवर उपचार करण्यापेक्षां त्याच्या कपड्यावरच उपचार केले पाहिजेत असें म्हणण्यास हरकत नाहीं. नुसते सर्व कपडे अधणाच्या पाण्यांत शिजवून वापरल्यास रोग्याची पीडा कमी होते. कपडे चांगले उकळल्यास ते जाळून टाकण्याची जरूरी नाहीं. उन पाण्यानें अंग धुण्यापलीकडे सहसा दुसरा कांहीं एक उपचार करावा लागतच नाहीं; परंतु एखाद्या वेळी लागल्यास डोक्यांतील उवांप्रमाणेंच उपचार करावेत.

गु ह्य भा गा व री ल उ वा (पेडिक्युली प्युबिस लक्षणें):- वरच्याप्रमाणेंच खाज सुटणें हेंच मुख्य लक्षण असतें. अंगावरील उवांप्रमाणें ह्या उवांपासून होणारी खाज जरी फार तीव्र नसते तरी ती सतत चालू असते व तीपासून जे वण पडतात ते जवळ जवळ खरजेच्या वणाप्रमाणें असतात.

परिक्षा:- उवांचा शोध करून पाहतांच खाजण्याचें कारण सहज कळून येतें. डोक्यांतील उवांपेक्षां ह्या उवा आंखूड असून थोड्या अधिक रूंदटहि असतात. कांसवाच्या आकाराची सूक्ष्म कल्पना केल्यास तीप्रमाणें ह्या उवांचा आकार असतो असें म्हणतां येईल. ह्यांची अंडी अगदीं केसाच्या बुडास चिकटून असल्यामुळें केंस वस्तर्‍यानें काढून टाकिल्याशिवाय त्यांचा समूळ नाश होणें कठिण पडतें. ह्या जातींच्या उवा, मिशा, कल्ले, पापण्या, भिंवया व केसाळ माणसाच्या छातीवरील केंस ह्यांमध्यें होतात. परंतु त्या डोक्यांत अथवा अंगावर म्हणजे मुख्यत:रोग्याच्या कपड्यावर कधींहि आढळत नाहींत. ह्या उवांचा उपद्रव होण्यास बहुधां मैथुनसमयच कारणीभूत होतो, तथापि दुसर्‍या मार्गानेंहि त्यांचा उपद्रव होत नाहीं असें म्हणतां येत नाहीं.

चिकित्सा:- रोज थोडें पार्‍याचें मलम  (अंग्वेंटल हायड्रारजिरि) नुसतें अगर थोड्या गोड्या तेलांत मिसळून चोंळावें, अथवा रॉकेल गोड्या तेलाशी मिश्र करून लावावें. सारांश, डोक्यांतील उवांप्रमाणें चिकित्सा करावी.

कोणच्याहि प्रकारच्या उवांना जबडे नसल्यामुळें चावतां येत नाहीं; परंतु त्यांनां रक्त शोषून घेतां येण्यासाठीं विधात्यानें एकप्रकारचें इंद्रिय दिलें आहे, तें त्या मनुष्याच्या त्वचेंत भोंसकून रक्त शोषण करून आपली उपजीविका करितात.

ह्यांशिवाय तंबाखूचा काढा, पेपरमिंटचें, वेलदोड्याचें, लवंगाचें किंवा बडिशेपांचें तेल, यांपासूनहि उवा मरतात.