विभाग नववा : ई-अंशुमान
उशना, वै दि क.-ऋग्वेदांत उशना काव्याचा उल्लेख कुत्स व इंद्र यांबरोबर केलेला दिसतो. (१. ५१, १०; ८३, ५; १२१, १२; ४. १६, २; ६. २०, ११; ८. २३, १७; ९. ८७, ३; ९७, ७. १०.४०, ७. इत्यादि. अथर्व. ४.२९, ६,) पुढील वाङ्मयांत (तै. सं. २. ५, ८ ८, ५. पंच. ब्रा. ७. ५, २०. शांखायन श्रौ. सू. १४. २७, १) देवदैत्यांच्या कलहांत हा असुरांच्या कडील पुरोहित म्हणून वावरतांना आढळतो. कवि उशना असें याचें दुसरें नांव आहे. (ऋ. ४. २६, १) ब्राह्मण ग्रंथांतूनहि हा आचार्य म्हणून दिसतो. (पंच. ब्रा. १४. १२, ५ जै. उप. ब्रा. २, ७, २, ६).
पौ रा णि क :- स्वायंभू मन्वंतरांतील भृगुपुत्र कवि, त्याचा पुत्र. यास काव्य असें नांव असून, प्रियव्रत राजाची कन्या ऊर्जस्वती, ही याची स्त्री होती. यास भार्गव असेंहि म्हणत. कारण हा भ्रगुवंशज होता.
वैवस्वत मन्वंतरांतील जो वारूणि कवि, त्याच्या आठ पुत्रांतील चौथा; यासहि काव्य असें नांव असून, शुक्र असेंहि क्वचित म्हटलेलें आहे. हा चालू मन्वंतराच्या तिसर्या पर्यायामध्यें (चौकडींत) व्यास होता. हिरण्यकशिपूच्या वेळेस हा दैत्यांचा पुरोहित असून, प्रल्हादास अर्थ कामादि पुरूषार्थपरबुद्धि शिकविण्याच्या प्रसंगीं, हा तपार्थ गेला होता म्हणून, याचे दोन पुत्र शंड व मर्क तें पौरोहित्य चालवीत होते (भाग. स्कं, ७ अ. ५). [ सेंटपीटर्सबर्ग डिक्शनरी. गेल्डनेर-वेदिश्च स्टुडिओ २; बगैंन-रिलिजन वेदिक, २; मॅकडोनेल-वेदिक मायथॉलॉजी. वेदिक इंडेक्स ]