विभाग नववा : ई-अंशुमान
उषा.- प्रभात. या सृष्टिचमत्काराला देवता कल्पिलेलें, व तिचें स्तवन केलेलें सर्व वाङ्मयांतून आढळतें. उषेचें वैदिक स्वरूप ''वेदविद्या'' (प्रस्तावनाखंड विभाग २ रा. पा. ३२९-३० यांत आलें आहे.
उषा - एक दैत्यराजाची कन्या. ही बलिपुत्र बाणासुर याची लाडकी कन्या होती. एकदां उषेनें स्वप्नांत एक राजपुत्र पाहून त्याच्या विरहानें ती झुरणीस लागली. तेव्हां तिच्या चित्रलेखा नांवाच्या सखीनें पुष्कळ देव, दैत्य, मानव, ऋषी यांचीं चित्रें काढून तिला तिचा प्रियकर कोणता तें ओळखण्यास सांगितलें. कृष्णपौत्र जो अनिरूद्ध तोच आपल्या सखीचा स्वप्रगत प्रियकर असें चित्रलेखेनें जाणून त्याला मायावलानें उषेच्या मंदिरांत आणिलें. बाणासुराला उषा-अनिरूद्ध समागमाची वार्ता कळतांच त्यानें अनिरूद्धाला बंदिवान केलें. कृष्णाला ही बातमी समजतांच तो मोठ्या सैन्यानिशी बाणावर चालून आला, व शिवस्कंदाची बाणासुराला मदत असतांहि त्याचा पराभव करून अनिरूद्धाला सोडविलें. पुढें उषेचें अनिरूद्धाबरोबर लग्न होऊन ती द्वारकेला गेली. अशा आशयाची कथा भागवतांत आहे. (स्कं. १०, अ. ६२-६३)