विभाग नववा : ई-अंशुमान

उष्टारखाना.- मराठेशाहींतील अठरा कारखान्यांपैकी एक ['अठरा कारखाने' पहा].  याला उष्ट्रशाला किंवा शुतरखाना असेंहि म्हणत. साताराच्या छत्रपतींच्या खाजगी खात्याकडील या कारखान्यासंबंधीं शके १७४१ मधील कांहीं नियम पुढीलप्रमाणें:-

जा व ता उ ष्टा र खा ना.- उष्टारखान्याचे हवालदार यांनीं सारवान याजपासून आपल्या रूबरू उंटाची निगा करवीत जावी. वैरण दाणापाणी, समयाचे समयास जनावरांस पोंचून ताजीं राखावीं. धुणें जनावरांस आठा चौ रोजीं करीत असावे मसाला आजार जहाल्यास चौकशीनें देत असावे. मजलमसाला तयार असावा. मजल पाहून द्यावे, व सरंजाम नवा जुना वरचेवर पाहून सरकारांत कळवीत जावें. सदरहू लिहिले प्रमाणें बंदोबस्त जलदीनें हुशारींनें राखील व चाकरी करून दाखवील त्याजवर सरकारमेहेरबानी होईल. ज्याच्याकडून हें न घडे त्यास इजा पोहोंचून पुन्हां त्या कामावर चाकरीवर रहाणार नाहीं, व रदबदली होऊन चाकरी मिळणार नाहीं. हें स्पष्ट समजोन लिहिल्याप्रमाणें वागावें व चाकरी करावी. ज्यास चाकरीवर वागणें त्यानें जें वस्त्रपात्र असेल तें निर्मळपणें जेथील तेथें प्रात:काळीं अंघोळ करून सजोलपणें गळाठा न दिसतां स्वच्छतेनें असत जावें. घरास वगैरे जातां येतां हजीरनीस यांस रूजू होऊन जात जावें. हें न केल्यास गेल्या दिवसाच्या तारखा मजुरा पडणार नाहींत.

कारकून यांनीं सामान, चंदी व वैरण रोजच्यारोज पाहून त्याची याद करून नित्यश: वर्दी हुजूर देऊन तर्तूद करून घेत जावी. बोभाट पडूं देऊं नये. उंटास पाळणा वगैरे सरंजाम लेश राखावा. सरंजाम गाफीलपणें लेश न राखिल्यास व उंट पाठीस लागल्यास खोळंबा सरकार कामाचा होईल. याकरितां बहुत सावधगिरीनें हवलदार व तुम्ही सदरहू लिहिलेप्रमाणें उभयतांनीं बंदोबस्त राखावा व सांडणीस्वार विश्वासू, बातमी खरी सांगणारा, वर्दी बोलणार चांगला असावा. अशी वरचेवर ताकीद देत जावी. लबाडी करून कांहीं खाऊं नये. या कामास आळस करूं नयें.
कारखान्याबद्दल कायदे चालावयाचे:-
१ हवालदारास सरकारचा हुकूम कारखान्यासंबंधें कोणतेहि कामकाजाबद्दल व्हावा म्हणोन कलम लिहिलें आहे. त्याप्रमाणें होत जाईल.
१ दसरियाबद्दल बकरें शिरस्तेप्रमाणें पावत जाईल.
१ दिपवाळीबद्दल तेल व बुक्का हवालदार व कारकून व दभासीयास पावतो म्हणोन कलम लिहिलें आहे. त्याप्रमाणें पावेल.
१ बारा सणांचे विडे प्रथम हवालदारास, मागाहून कारकून, याच्या मागून सर्वांस पावत आल्याप्रमाणें पावत जातील.
१ राखी पौर्णिमेस पोतीं व राखीं हवालदारास व कारकुनास शिरस्तेप्रमाणें पावतील.
 दसर्‍याबद्दल कारखान्याची पूजा व दक्षणा पावतो म्हणून कलम. त्याप्रमाणें पावत जाईल.   
१ गुरूवाराबद्दल पीरास शेरणी व ऊद दरबारीं पावतो म्हणोन कलम आहे त्यास चौकशी होऊन पावत जाईल.        
१ सरकारांत नजर हवालदार व कारकून व दभासी व सांडणीस्वार यानीं करीत जावी.
१ जू मांगीची मुठी दभासी घेतात, त्यानें कारखान्यांत खैरात व भणंग भिकारी वगैरे खर्च करीत आहों म्हणून कलम आहे. त्याप्रमाणें करीत जाणें [इतिहाससंग्रह पु. ६. अं. ७, ८, ९. ]