विभाग नववा : ई-अंशुमान
उष्णताजन्य विद्युत् - अॅलेसन्ड्रो व्होल्टा (१८०१) याला असें आढळलें कीं, जरी दोन धातूंच्या संयोगानें धन व ऋणविद्युत् वेगळ्या होतात, व सूक्ष्म विद्युन्मापकाच्या योगानें जरी त्याचें ज्ञान होतें तरी त्यापासून तितक्याच परिमाणाचा अस्खलित प्रवाह त्या निवळ धातूंच्या मंडलांत कांहीं द्रवाचा अंतर्भाव केल्याशिवाय मिळत नाहीं; कारण एका संयोगाच्या ठिकाणाच्या विद्युच्चालकशक्तीशीं दुसर्या संयोगाच्या ठिकाणच्या तितक्याच विरूद्ध शक्तीचें समतोलन होतें. यानंतर बार्लिन येथील प्रोफेसर सीबेक यास १८२१ सालीं असें आढळून आलें कीं, दोन भिन्न भिन्न धातूंच्या कांबी घेऊन त्यांचीं टोकें धातूंच्या दोन तुकड्यांनीं जोडून एक चौरस तयार केला, व त्या चौरसाचा एक सांधा उष्ण केला तर विद्युत्प्रवाह सुरू होतो. हा विद्युत्प्रवाह उत्पन्न होण्याचें कारण त्यानें असें दिलें आहे कीं, व्होल्टानें यापूर्वीच निरनिराळ्या धातूंच्या तबकड्या एकीवर एक ठेवल्या असतां विद्युत उत्पन्न होतें हें दाखविलें होतें व ती विद्युत धातूंच्या उष्णमानावर अवलंबून असते असेंहि दाखविलें होतें अर्थात एका सांध्याचें उष्णमान वाढल्यास एका बाजूकडून दुसर्या बाजूकडे विद्युत्प्रवाह सुरू होतो. त्यानें ह्याचें स्पष्टीकरण असें केले कीं, व्होल्टाची संगमविद्युच्चालकशक्ती ही उष्णमानाप्रमाणें बदलते व म्हणून एकच सांधा जास्त उष्ण केला म्हणजे समतोलन रहात नाहीं दोन धातूंची विशिष्ट एक जोडी अथवा जोर घेतली असतां प्रवाहाचा प्रकर्ष (प्र) चौरसाच्या उष्ण व थंड सांध्यामधील उष्णमानांतराशीं (उ-उ१) चौरसाच्या समप्रमाणांत व त्या विद्युत्प्रवाहास होणार्या मार्गांतील धातूच्या अंगांतील विरोध अथवा प्रतिबंधाशीं (प्रति) व्यस्त प्रमाणांत असतो असेंहि आढळून आलें आहे. यावरून उष्णमानांतर बेताचें असतांना ओहमचा नियम लावून या दोन उष्णमानातरांतील विद्युच्चालकशक्ति (वि) स्थूलमानानें आपणांस समीकरणानें दर्शवितां येईल.
समीकरण:- वि = प्र X प्रति, = प (उ-उ१).
सीबेकचा प्रयोग पुढीलप्रमाणें करतां येतो, एक तांब्याची कांब दोहों टोंकाकडे वांकवून एका बिस्मथ धातूच्या कांबीस डांकानें जोडावी. चौरसाच्या मध्यभागीं एक चुंबक कांटा ठेवून तो फिरता चुंबक कांटा दक्षिणोत्तर राहील असें तें यंत्र ठेवावें व नंतर जर तांबें व बिस्मथ यांचा सांधा उष्ण केला तर कांटा आपलें स्थान सोडतों. त्याचप्रमाणें तो भाग बर्फानें अगर ईथरनें थंड केला तरीहि कांटा स्थान सोडतो पण विरूद्ध दिशेनें फिरतो; तथापि दोन्ही वेळेस जास्त उष्णमानाकडून कमी उष्णमानाकडे प्रवाह वाहतो असें दिसून येईल. व त्याचप्रमाणें असेंहि दिसून येईल कीं, सांध्याच्या उष्णमानांत ज्या प्रमाणांत अंतर असेल तर प्रमाणांत प्रवाह कमजास्त जोराचा असतो. यावरून वरील सिद्धांत सिद्ध होतो. (विज्ञानेतिहास पृ. ५३४ पहा).
अशा रीतीनें दोन भिन्न भिन्न धातूंच्या लहान लहान कांबी घेऊन त्यांची एका बाजूचीं टोकें डाकानें जोडलीं व दुसर्या टोंकास तारा जोडून त्या, विद्युन्मापकास जोडिल्या व सांधा उष्ण केला तर, विद्युत्प्रवाह उत्पन्न होतो व विद्युन्मापकांतील कांट्याच्या स्थलांतरावरून त्याची दिशा समजते. विद्युन्मंडल पुरें केल्यानंतर थंड जोडाच्या बाजूला जर 'अ' धातूकडून 'आ' धातूकडे प्रवाह गेला तर ती धातू (अ) दुसर्या धातूशीं (आ) उष्णता विद्युदद्दष्टीनें धन आहे असें म्हणतात. याप्रमाणें निरनिराळ्या धातूंच्या जोडाचे प्रयोग करून आपणांस अशी एक आवलि उर्फ माला तयार करतां येईल कीं, तीमध्यें कोणाच्याहि धातूच्या पुढील धातूंशी संयोगानें धनविद्युत व मागील धातूंशीं संयोगानें ऋणविद्युत् उत्पन्न होते. व्होन्टाच्या रसायनविद्युदघटमालेहून ही माला निराळी आहे व तींत धातूचा शुद्धपणा, काठिण्य वगैरे भौतिक परिस्थितीप्रमाणें फेरबदल होतो असेंहि आढळून आलें आहे. उष्णमानाप्रमाणें ह्या क्रमांत फेरफार होतो असें जे. कमिंगला आढळलें आहे. उदाहरणार्थ नेहमींच्या उष्णमानावर तांबें हें लोखंडाशीं ऋण आहे पण ३००० अंश. किंवा यापेक्षां जास्त उष्णमानावर तें त्यांशीं धन आहे. त्याचप्रमाणें ह्या जोडीची विद्युच्चालकशक्ति (वि.चा.श.) २७०० अंश उष्णमानापर्यंत वाढत जाते पण पुढें ती कमी कमी होत जाऊन नाहींशीं होते व अखेरीस चिन्ह बदलतें. असो. रसायनजन्य विद्युच्चक्रामध्यें द्रव्य जे काम करते तें ह्या प्रकारच्या विद्युन्मालेमध्यें सांध्यामुळें होतें.
एकाच धातूचें जर मंडल बनविलें असेल व त्या धातूवर जर कसलाहि ताण अगर जोर बसणार नाहीं तर उष्णमानावर फेरबदल केल्यामुळें त्यांत प्रवाह उत्पन्न करणें शक्य नाहीं. उष्णमानांत आकस्मिक बदल करून, किंवा एकाच धातूच्या दोन निरनिराळ्या उष्णमानावरील कांबी एकमेकांवर दाबून जीं परिमाणें कित्येक वेळां दृष्टीस पडतात तीं त्यावर पडणार्या ताणामुळें होत. ह्याचें एक मनोरंजक उदाहरण म्हणजे ट्राऊटन चा (१८८६) प्रयोग होय. विद्युन्मापकाच्या एका मंडलांतील लोखंडी अगर पोलादी तार एका विविक्षित बिंदूजवळ आरक्तोष्ण करावी. नंतर ज्योत स्थिर असेपर्यंत कांहींहि आढळून येत नाही. पण जर ती एका दिशेने हलविली तर प्रवाह सुरू झाला असें दिसून येतें व ज्योतींच्या दिशेप्रमाणें त्याचीहि दिशा बदलते. याचें कारण इतकेंच कीं, आरक्तोष्ण केली असतां ती धातु जणूं काय दुसरीच बनते व त्यामुळें दोन धातूंच्या सांध्याहून ही बाब निराळी अशी राहत नाहीं. उष्णतेमुळें धातूचें रूप बदलतें हें त्यामुळें त्यांतील विद्युत अगर चुंबनसंबंधीं गुणधर्म बदलतात ह्यावरून स्पष्ट होतें.
उष्णताजन्य प्रवाहांची विद्युच्चालकशक्ति फार थोडी असते. परंतु या प्रवाहामध्यें सातत्य फार असतें; म्हणजे या प्रवाहांच्या जोरांत फारसे फेरफार न होतां ते एकसारखे नियमित जोरानें फार वेळ वाहतात. या उष्णताविद्युन्मालेच्या समोरासमोरच्या साध्यास वितळणारें बर्फ व काढणारें पाणी यांच्या योगानें ०० श आणि १००० श या उष्णमानावर सहज ठेवतां येतें. याच कारणाकरितां ओहम यानें आपला सिद्धांत सिद्ध करण्यासाठीं प्रयोग करण्यास याच प्रवाहांचा उपयोग केला होता. या प्रवाहांनीं साध्या रसायनजन्य विद्युन्मालेचीं सर्व जातींचीं कार्ये होतात; फक्त त्यांचें मान मात्र कमी असतें. लोखंड व जर्मनसिल्व्हर या धातूंच्या तुकड्यांच्या जोडीची ७६९ चक्रें घेऊन त्यांची उष्णताजन्यमाला केली व दोहोंकडील सांध्याची उष्णमानें १००० श व १५० श अशी ठेवून कोलरास्क यानें मालेच्या दोहों शेवटांत धन व ऋण विद्युत् आहेत असें सिद्ध केलें आणि असल्या एका चक्राची विद्युच्चालकशक्ति एका डेनियलच्या चक्राच्या १/६००० असते असेंहि त्याला आढळलें. सारांश उष्णताजन्य विद्युन्मालेनें फक्त नि:शक्त रसायनकार्ये होतात. प्लॅटिनम व लोखंड यांच्या तारांच्या जोडांच्या १२० चक्रांच्या मालेनें बोटो यानें पाण्याचें पृथक्करण केलें आहे.