विभाग नववा : ई-अंशुमान
उस्तरण :-एक पठाण जात. वायव्यसरहद्द प्रांतांतील डेराइस्माईलखान जिल्ह्याच्या अगदीं दक्षिणभागांतील डोंगरांतून या जातीचे लोक राहतात. उस्तरण ही मूळ ची व्यापारी जात असे. त्यांच्या शेजारचे जे मुसाखेल लोक त्यांच्याशीं यांचें भांडण होऊन यांनीं दरवर्षीं पश्चिमेकडे देशांतर करण्याची जुनी वहिवाट सोडून हे शेतकरी बनले. डोंगराच्या पायथ्याची बरीचशी सपाट जमीन त्यांनी तेव्हांपासून हस्तगत केली. त्यांच्या मुलुखांत सुलेमान पर्वताची पूर्ण उतरण कायती येते. शिखराचा भाग भुसाखेल, इसाट आणि इस्मारै लोकांकडे आहे. उस्तरण लोक मोठे धाडसी व्यापारी असून कंदाहारापासून बंगालपर्यंत त्यांचा माल जातो. ही शूर जात शांत व सभ्य असून तींतील पुष्कळ लोक सैन्यांत व पोलिसांत आहेत.