विभाग नववा : ई-अंशुमान
उस्मानाबाद , जि ल्हा:- हैद्राबाद संस्थानच्या पश्चिम भागांतील एक जिल्हा. ह्यास पूर्वी 'नलदुर्ग' म्हणत असत. याच्या उत्तर-पश्चिम व दक्षिणेस मुंबई इलाख्याचे अहमदनगर व सोलापुर हे जिल्हे. उत्तर व पूर्वेस:- भीर व बेदर जिल्हे दक्षिणेस-अक्कलकोट संस्थान व आग्नेयीस गुलबर्गा जिल्हा. क्षेत्रफळ ४०१० चौ. मै. पैकीं खालसा व सर्फ इखास जमीन २६२७ चौ. मै. असून इतर पैगाह व जहागीर आहे. जिल्ह्याचे दोन भाग पाडणारी एक वायव्य-आग्नेयोत्तर डोंगरांची ओळ आहे. वासी, ओवसा व कलम हे तालुके व तुळजापूर, उस्मानाबाद व नलदुर्गाचा कांहीं भाग डोंगर सपाटीवर आहे. इतर सखल भागांत आहे. तुळजापूर पासून उस्मानाबादकडे जमीन उंच उंच होत गेली आहे. मोठी नदी मांजरा. इतर लहान नद्या सिन, खेरी, तिरना, आणि बोरणा या आहेत. जंगल फारसें नाहीं. बाभूळ, निम्ब, आंबा वगैरे झाडें आहेत. नलदुर्ग व ओवसा तालुक्यांची हवा उष्ण व रूक्ष आहे. तुळजापूर व उस्मानाबाद तालुक्यांची हवा थंड आहे. वासी, कलम व परेन्ड तालुक्यांची हवा दमट आहे. पाउस ३३ इंच पडतो.
इतिहास :- चौदाव्या शतकाच्या सुरवातीपासून हा जिल्हा मुसुलमानांच्या वर्चस्वाखालीं होता. ह्यानंतर तो अलाउद्दीननें दिल्लीच्या साम्राज्यास जोडला. ब्राम्हणी राज्याच्या स्थापनेनंतर ह्याच्या ब्राह्मणी राज्यांत समावेश होऊं लागला. व ब्राह्मणी राज्य लयास गेल्यावर हा अहमदनगर व विजापूरच्या राज्याखालीं मोडूं लागला. अवरंगजेबानें जेव्हां दक्षिण जिंकली तेव्हां हा जिल्हा पुन्हां दिल्लीपतीकडे गेला. अखेर १८ व्या शतकाच्या सुरूवातीस जेव्हां हैद्राबाद संस्थानची स्थापना झाली तेव्हां तो हैद्राबाद संस्थानांत मोडूं लागला. रायचूर दोआबच्या तहाप्रमाणें हा १८५३ मध्यें इंग्रजांस देण्यांत आला होता. पण १८६० मध्यें तो निझामास परत देण्यांत आला.
प्रेक्षणीय स्थळें :- नलदुर्ग किल्ला, ओसवा तालुक्यांतींल जाम मशीद, उस्मानाबाद शहराभोंवतीं असलेलीं दाबर, चमार व लाचन्दर लेणीं, परेंडचा किल्ला, तुळजापूर (येथें भवानीचें देवालय असून मोठी जत्रा भरते, थेर येथें असलेले बौद्धकालीन अवशेष हीं पौराणिक कालचीं स्थलें प्रेक्षणीय आहेत.
जहागिरी धरून यांत गांवें ८६५ असून लोकसंख्या १९०१ सालीं ५,३५,०२७ होती.
मोठीं गांवें :- उस्मानाबाद, तुळजापूर, थेर, ओवसा, लातूर, मोरम. यांत शेंकडा ८९ लोक हिंदू आहेत. पैकीं शें ८४ लोक मराठी भाषा बोलतात.
१९०५ सालीं वासीचा कलममध्यें व नलदुर्गाचा तुळजापूरमध्यें समावेश होत असे व अशारीतीनें ५ तालुके, (उस्मानाबाद, कलम, तुळजापूर, ओवसा व परेन्ड) शिवाय दोन मोठ्या गंजोटी व लोहार्या पैगाह जहागिर्या व भूप व वालवडची जहागिरी असे विभाग असत.
लोकांच्या जाती :- कुणबी, मराठे धनगर, महार, चाम्भार, वाणी व ब्राह्मण. शेंकडा ५८ लोक शेतकीवर उपजीविका करितात.
जमीन काळी कापसाची आहे. उस्मानाबाद, कलम, वासी व परेन्ड येथें चांगल्यापैकीं काळीं जमीन आहे. त्यामुळें रब्बीचें पीक चांगलें येतें.
रिगर जमीनींत जवार, चणे, गहूं व कापूस पिकतो. व मसब (लालपांढुरकी) जमीनींत ज्वारी, बाजरी व कडधान्य पिकतें. खरपड जमिनीचा बागाईताकडे उपयोग करितात. कारण त्या जमिनींत चांगलें धान्य येण्याकरितां खत पुष्कळ लागतें. पहाडाच्या पायथ्याची जमीन सुपीक आहे.
रयतवारी पद्धत सुरू आहे. मुख्य खाद्य ज्वारी. कापूस सर्व तालुक्यांत होतो. कोठें कोठें विहिरीच्या पाण्यावर ऊंस करतात. शेतकींत अजून सुधारणा अशीं कांहींच नाहीं. धनगर लोक घोंगड्या तयार करितात. ओवसा तालुक्यांतील लातूर व्यापाराचें मुख्यठिकाण असून येथें तीन जिनें आहेत.
बाहेर जाणारा माल:- ज्वारी व इतर खाद्यधान्यें, कडधान्यें, कापूस, गळीताचीं धान्यें, तेल, मिरच्या, गुरें, मेंढरें, तंबाखू, चामडें इ.
आंत येणरा माल :- मीठ, खारेमासे, अफू, मसाले, रूपें, सोनें, तांब्याचीं भांडीं, शुद्ध केलेली साखर, लोखंड, राकेल तेल, गंधक, कच्चें रेशीम, व सुती कापड हा माल येतो. लातूरच्या खालोखाल उस्मानाबाद हें व्यापाराचें ठिकाण आहे. वाणी, मारवाडी, कोमटी व भाटिया हे व्यापारी लोक होत. ग्रेट इन्डियन पेनिनशुला रेल्वे तुळजापूर तालुक्यांतून जातें.
व्य व स्था:- ह्या जिल्ह्याचें दोन विभाग पाडले आहेत. एकांत कलम, ओवसा व परेन्ड हे तालूके येतात व दुसर्यांत उस्मानाबाद तुळजापूर हे आहेत. प्रत्येक तालुक्यावर एक तहशिलदार असतो.
जिल्ह्याच्या दिवाणी कोर्टावर नाझिम-इ-दिवाणीची नेमणूक आहे. १७ व्या शतकाच्या आरंभीपासून मलिकंबरची जमाबंदीची पद्धत अमलांत होती. जमीनीची पहाणी करून तिच्या सुपीकतेवरून सारा ठरवीत असत. शिवाय सारावसुली सुलभ रितीनें व्हावी म्हणून गावेंच्या गावें शेतकर्याकडे वसुलीकरितां मक्त्यानें लावून देत असत. सारा उत्पन्न (१९०३) ११७७ हजार रू. व एकंदर उत्पन्न १२७१ हजार रू. उस्मानाबाद येथें म्युनिसीपालिटी आहे. मोठ्या शिक्षा पावलेले कैदी गुलबर्गा येथें पाठवितात. शेंकडा ३.१ लोकांस लिहितां वाचतां येतें.
ता लु का:- हैद्राबाद संस्थानांत उस्मानाबाद जिल्ह्याच्या मध्यभागीं असलेला मुख्य तालुका. हा पूर्वी धारासिव ह्या नावानें ओळखला जात असें. जाहागिरी धरून क्षेत्रफळ ४१७ चौ. मैल आहे. १९०१ सालीं लोकसंख्या ७७५३३ गावें दोन उस्मानाबाद व थेर. खेडीं ८७ व जहागिरी:- ९ मोठीं जमीन काळी (रेगर) कापसाची आहे.
गांव :- हैद्राबाद संस्थानमधील उस्मानाबाद जिल्ह्याचें व तालुक्याचें मुख्य ठिकाण. उ. अ १८० ११' व पू. रे. ७५० ३'. सोलापूरच्या उत्तरेस ४३ मैल व बार्शींच्या पूर्वेस ३२ मैल आहे. लोकसंख्या १९०१ त १०६०७ होती. हें बालाघाटमध्यें असून पूर्वी ह्यास धारासिव ह्या नावानें ओळखीत असत. १८५३ ते १८६० हा जिल्ह्या ब्रिटिशांस दिला होता तेव्हां ह्याचें मुख्य गांव नलदुर्ग होतें. हें व्यापाराचें मोठें ठिकाण आहे. गांवाच्या ईशान्येस दोन मैलांवर ७ लेणीं आहेत. त्यापैकीं चार जैन असून तीन वैष्णव आहेत.