विभाग नववा : ई-अंशुमान
उळवी :- मुंबई उत्तरकानडा जिल्ह्यांतील हल्याळ तालुक्यातलें एक गांव. लो. सं. (१९११) ९०५. सन ११५० मध्यें बिज्जलाच्या पुत्रापासून आपला जीव बचावण्यासाठीं बसव येथें आला व 'उळीवेनु' (म्हणजे आतां मी मुक्त होऊन) असा शब्द उच्चारून त्यानें विहिरींत उडी घेतली. अशी जैन कथा आहे. या 'उळीवेनु' शब्दावरून या गावांचें नांव पडलें असें सांगतात. येथें त्याचें स्मारक एक मंदीर आहे व आणखी पुरातन देवळें आहेत. गवीमठ हें लेण्यासारखें देऊळ सर्वांत जुनें दिसतें. बुदबुतळें नांवाचें एक तळें आहे. त्यालाहि फार पूज्य मानतात. येथें प्राचीन काळीं म्हार किंवा होळयार राजा होता. नंतर म्हैसूरच्या सुलतानानें सदाशिव सुभेदाराच्या स्वाधीन हा गांव केला. येथील अवशेषांवरून हा गांव पूर्वी भरभराटींत होतासें दिसतें. दरसाल बसवेश्वराच्या यात्रेला फार गर्दी जमते. [मु. गॅ. १५ इ. गॅ. २४.]