विभाग नववा : ई-अंशुमान
ऊ - 'उ' ला एक फांटा नवीन जोडून हें अक्षर तयार झालेलें दिसतें. हा फाटा केव्हांपासून प्रचारांत आला तें पाहूं. भरहुतस्तूपावरील लेखांत 'ऊ' अक्षर असून, अशोकाच्या गिरनार लेखांतील 'ऊ' आकृतींत ('उ' पहा.) खालच्या आडव्या फाट्याच्या जरा वर त्याला समांतर असा दुसरा फाटा काढल्यास वरील भरहुत लेखांतील 'ऊ' चीं आकृति तयार होईल. इ. स. पू. पहिल्या शतकाच्या सुमारच्या पभोसा येथील लेखांत वरच्या सारखीच उंची आकृति आहे, पण त्यांतील फांटा दुसर्या अवस्थेंतील 'ऊ' ला काढला आहे. तिसर्या अवस्थेंतील 'उ' ला बांकदार फाटा काढून तयार केलेला ऊ. इ. स. ५ व्या शतकांतील हूणराजा तोरमाण याच्या कुडा येथील लेखांत आढळतो. आजच्या वळणदार 'उ' ला डोक्यापासून फाटा काढून बनविलेला 'ऊ' चंबा राज्यांतल्या सराहां येथें सांपडलेल्या इ. स. १० शतकांतील एका प्रशस्तींत पहावयास मिळतो.