विभाग नववा : ई-अंशुमान
ऊरूस्तंभ :- आर्यवैद्यक व आंग्लवैद्यक या दोहोंमधील या रोगाचा उद्भव कारणें व चिकित्सा या संबंधीं दक्षिण व उत्तर ध्रुवाइतका फरक दिसून येतो. लक्षणामध्यें मात्र बरेंच साम्य दिसून येतें. या रोगाचें कारण पृष्ठवंशरज्जु म्हणून जो मज्जासंस्थेचा भाग आहे त्यांत दाहक्रिया सुरू होणें हें होय. पाठीस मार, इजा, अतिजड ओझीं उचलणें. पाठीच्या कण्याजवळ झालेली शय्याक्षतें पसरून त्यांचा या ठिकाणीं शिरकाव होणें पृष्ठवंशरज्जूवर दाब पडणें मणक्यांचीं हाडें कुजणें व तेथे अस्थिव्रण होणें ग्रंथिरोगाचा तेथें दाब पडणें, सांथीच्या ज्वरानंतर व एरवीहि शरीरांत दूषित जंतूंचा प्रवेश होणें, हीं नेहमीचीं कारणें आहेत. फिरंगोपदंश हहि एक सबळ कारण असून थंडी, गारठा व ओल यामुळेंहि हा रोग होतो. पृष्ठवंशरज्जूचा छेद केला असतां त्याच्या गाभ्यांत करड्या रंगाचा जो भाग असतो त्यांतील पूर्व शृंगाकार भागांमध्यें दाहक्रिया सुरू झाल्यामुळें त्यांतून मनाची इच्छा व संवेदनाप्रदर्शक खाली व वर मज्जातंतूवाटें संदेश येणें व जाणें सर्वस्वीं बंद पडतें. विकृत भागांतील काठीण्य वाढत जातें. पृष्ठवंशरज्जूंतील कमी अगर अधिक अगर वरील, मध्य किंवा खालील भागांत रोग असेल त्यामानानें भेद व लक्षणें वेगळीं होतात.
ल क्ष णें :- विकृत (हाता-पायांत) भागांत बधिरता, मुंग्या येणें. व आरंभीं अंग मोडून येणें व थोडा ज्वर हीं लक्षणें होऊन नंतर पायांत व हातांत कळा येतात. कधीं पेटके स्पर्शसंवेदनाधिक्य कंप, पाठींत वेदना हीं लक्षणें प्रथमच्या दाहावस्थेचीं सूचक आहेत. एक दोन दिवसानंतर हे हात पाय चेतनाशून्य व स्पर्शसंवेदनशक्तिहीन होतात. यांतील अनेक उपभेदानुसार अनेक लक्षणें होतात. तीं विस्तारभयास्तव देतां येत नाहींत. लेकरांत आढळून येणारा एक भेद आहे. हें लक्षांत ठेवावयाचें कीं, पृष्ठवंशरज्जु हा मज्जाभाग मानेपासून माकड हाड अगर पुच्छास्थिपर्यंत असतो; म्हणून हा या दोन शेवटांमध्यें कोठेंहि दाहक्रियेमुळें तो विकृत झाला असतां विकृत मज्जाभागाच्यावरील शरीराचा भाग रोगरहित व चलनशील व त्या मज्जाभागाच्या खालील शरीर अर्धांगवायुरोगाप्रमाणें मात्र दोन्ही बाजूस जड, लुले व चेतनाविहीन असतें. हात अगर पाय तर राहो पण एखादें दुसरें बोटेहि हलवितां येत नाहीं. बेंबीच्या जरा वर अगर खालपर्यंतचा ऊरूस्तंभरोगभेद अधिक प्रमाणांत आढळतो. बेंबीच्या रेषेवर स्पर्शज्ञान शाबूत व खालीं तें ज्ञान अगदीं नाहीं; सुई टोंचलेली कळत नाहीं, ढेंकूण चावलेले समजत नाहींत, मलशुद्धि बस्तीशिवाय अगर औषधाशिवाय होत नाहीं. व लघवीहि मूत्रनलिकेनें काढल्याशिवाय होत नाहीं. परंतु कांहीं दिवसांनीं मूत्र कोंडून मूत्राशय फुगून मूत्र थेंब थेंब आवारतां न आल्यामुळें वहात असतें. आंथरूणांत पडून राहिल्यानें हाडकाळ जाग्यावर शय्याक्षतें पडतात. नंतर हातांत अगर पायांत ताठपणा फार येतो. कमरेखालीं दाहरोग असल्यास हातापायाचे स्नायु पोषकमज्जातंतू विकृत झाल्यामुळें रूक्ष व निस्तेज आणि रोड होतात; व नकळत मलमूत्र विसर्जन ताबा नसल्यामुळें होतें. मानेमध्यें विकृतस्थान असल्यास वरील सर्व प्रकार आढळून अधिक भयंकर स्थिती होते. ती अशी कीं, हातांतील व श्वसनक्रियेचे स्नायू व श्वसन मध्यपटलनायक मोठा स्नायु चेतनाहीन होतात व त्यामुळें कफसंचय, दम, श्वास उत्पन्न होऊन रोगी गुदमरतो. त्यामुळें हृदयक्रिया अनियमितपणें व जलद चालते. ज्वरातिशय, अन्न गिळतां न येणें, उचकी हींहि लक्षणें होतात. नाना तर्हेचे आगंतुक दोष उत्पन्न होऊन रोगी त्यापैकीं एखाद्यानें अगर अनेकांमुळें दगावतो अगर त्याचें दीर्घकालीन रोगांत रूपांतर होतें अगर रोगी कांहींसा सुधारण्याच्या पंथास लागतो.
रो ग नि दा न:- इतर मज्जारोग नाहींत व ऊरूस्तंभरोगच आहे अशी खात्री करून घेणें हे वैद्य डॉक्टरांचे काम आहे. परंतु एखाद्या वातोन्माद अगर गर्भाशयोन्माद रोगाच्या मनुष्यास मानसिक दुर्बलतेमुळे हात पाय लुले पडून त्यास सर्व मज्जातंतू शाबूत असून अशा सारखीं लक्षणें होतात. त्यामुळें वैद्यानें फसतां कामा नये. तसेंच दीर्घकालीन दुखण्यांतून उठल्यावर अथवा अतिश्रम केल्यामुळें मेंदु व पृष्ठवंशरज्जु शाबूत असून केवळ श्रमातिशय व थकव्यामुळें त्यांजवर मनाची हुकमत चालेनाशी होते. ही स्थिति वैद्यास जाणता आली पाहिजे.
उ प चा र:- शय्याक्षतें होऊं नयेत म्हणून अति मऊ बिछान्यावर दीर्घकाल पडून पूर्ण विश्रांति रोग्यास मिळाली पाहिजे. बोळ्यांनीं अथवा कढतपाणी रबरी पिशवींत घालून त्यानें शेकणें, मोहरीयुक्त व तसल्या औषधांनीं युक्त तैल व नाना तर्हेच्या चिकटपट्या, जळवा लावणें घटिका चूषणविधि तसेच बर्फ इत्यादि बाह्य उपचार सुरू ठेवावें. पाठीच्या कण्यांत रक्तसंचय होऊं नये म्हणून रोग्यास शक्य तितक्या पालथा निजवावा. पोटांत घेण्यासाठीं रसकापूर पेटॉशियम आयोडाइड हीं औषधें देतात. पण त्याचा उपयोग दाह कमी करण्यांत होतो असें म्हणवत नाहीं. फिरंगोषदंश रोगामध्यें मात्र प्रथम गुण न दिसला तरी चिकाटीनें हीं औषधें सुरू ठेवावीं. अर्गट नामक औषध टोंचल्यानें उपयोग थोडासा होतो. सांथींचें दोषन्न औषध सोडा सालिसिलेट देतात तें युक्तच आहे. शय्याक्षतें (बिछान्यावर एकसारखें निजून राहिल्यामुळें झालेलीं चकदळें) न होऊ देण्याविषयीं खबरदारी घ्यावी; कारण तीं मोठी भीतिप्रद असतात. मूत्रनलीकेचा उपयोग लघवी होण्यासाठीं करून ती नलीकाजंतुघ्न औषधांत बुडवून ठेवावी. लघवी नासू नये म्हणून पोटांत जरूर तीं सॅलिसिलिक अगर बोरिक अॅसिड वगैरे औषधें द्यावींत. कफसंचय व दम, श्वास कमी करण्याच्याकामीं अमोनियाकार्बोनेटचा उपयोग चांगला होतो, परंतु तो टिकणारा नसतो. रोगाची प्रथमावस्था संपून रोग कायम होतोसा वाटल्यास क्किनाईन. सोमल हे व कुचल्याचें सत्त्व यांपैकीं कांहीं औषधे पौष्टिक म्हणून द्यावीत. हातापायांत ताठरपणा आला नसल्यास कोणत्याहि प्रकारच्या विजेच्या पेटीचा उपयोग स्नायूंवर केल्यानें ते सुधारतात. परंतु मांसलभाम पुष्ट ताठर असल्यास तिचा फारसा उपयोग होत नाहीं. इतकेंच नव्हे तर थोडी इजाहि होते.
आ यु र्वे दी य:- कमरेपासून दोन्ही मांड्या व पाय जखडतात म्हणजे लांबआंखुड होत नाहींत या विकारास ऊरूस्तंभ म्हणतात.
का र णें:- थंड, ऊन, पातळ, कोरडे, जड, स्निग्ध इत्यादि परस्परविरूद्ध गुणाचे पदार्थ विशेष सेवन केल्यानें, तसेंच अजीर्ण झालें असतां भोजन केल्यानें आणि अतिशय श्रम, झोंप, किंवा जागरणें केल्यानें, शरीरांतील कफ, मेद, व वायु, दुष्ट होऊन अतिशय सांचलेल्या सामपित्ताला दुष्ट करून कमरेपासून पायांतील हाडांत कफ भरून रहातो त्यावेळीं मांड्या स्तब्ध थंड व स्पर्श न समजणार्या होतात. त्या इतक्या अचेतन होतात कीं, त्या आपल्या नव्हेत तर दुसर्याच्याच आहेत असें वाटतें, त्यांत अतिशय पीडा होते. नेहेमीं रोगी चिंतायुक्त असल्यासारखा दिसतो, आंग दुखतें, स्तिमितपणा येतो, झांपड असते. ओकारी, अरूची, व ताप हीं लक्षणें होतात. अतिशय झोंप, चिंतायुक्त असणें, ताप, आळस आंगावर रोमांच उभे रहाणें, अरूची, ओकारी मांड्या व पोटर्या जड वाटणें, हीं ऊरूस्तंभाचीं पूर्व चिन्हें होत.
हा ऊरूस्तंभ रोग कफाधिक्यानें होतो म्हणून यावर नीट रोगपरीक्षा झाली नाहीं तर हा वातारोग आहे असें समजून कोणी अडाणी वैद्यानें वातावरील स्नेहनादि उपचार केल्यास पाय जास्तच जड होतात व थोड्याच दिवसांत उचलेनासे होतात त्यास स्पर्श केला तर कळत नाहीं, पाय कांपतात, थंड, स्पर्श कळत नाहीं, पाय उचलत नसल्यामुळें रोगी चालूं शकत नाहीं, इतकेंच नाहींतर या कुशीचे त्या कुशीवरहि दुसर्याच्या साहाय्यावाचून होत नाहीं. दाह, अतिशय पीडा, पाय कांपणें हीं लक्षणें झालीं असतां किंवा दुसर्या कोणत्याहि रोगानंतर झालेला ऊरूस्तंभ असाध्य असतो.
चि कि त्सा:- ऊरूस्तंभावर (मांड्या आखंडल्या असतां) स्नेहन किंवा शोधन दोन्ही उपयोगीं नाहींत. कारण यांत कफ, मेद, व आम यांचें आधिक्य असतें. म्हणून ते कमी करण्याकरितां युक्तिपूर्वक रूक्ष उपचार करावे. जवं, सांवे व हरिक यांचे अन्न, थोडेसे तेल घालून पाण्यांत शिजवून तयार केलेल्या अळणी भाज्याबरोबर खावें. जांगल मांस तुपाची फोडणी न देतां खावें. मद्य, पाणी व अरिष्ट प्यावें. हिरडे, गुग्गुळ अथवा शिलाजित गोमुत्रांतून सेवन करावें.
याप्रमाणें उपाय करून कफावृत व मेदोयुक्त वायु शांत झाला म्हणजे मग क्षार व गोमुत्रस्वेदन सेचन व उटणीं यांचा उपयोग करावा. मध, शिरस, वारूळाची माती यांचा लेप लावावा. कफ क्षीण हे होण्याकरितां त्यास सोसेल इतका व्यायाम करावा. शक्तिच्या मानानें चालावें. स्त्रीसंभोग करावा. कोंडलेल्या व न वाहणार्या पाण्याच्या व ज्यांत सुसरी वगैरे नसतील अशा बिन धोक्याच्या तलावांत पोहावें. प्रवाहाच्या उलट म्हणजे खालून वर पोहावें, या उपायांनीं कफ व मेद यांचा क्षय झाला म्हणजे मग स्नेहन वगैरे उपाय करावे.