विभाग नववा : ई-अंशुमान
ऊंस - यास लॅटिनमध्यें सॅकॅरम ऑफिसिनारम, इंग्रजींत शुगरकेन, मराठींत ऊंस, संस्कृतमध्यें इक्षु, गुजराथींत खोड, हिंदुस्थांनींत गोंडा, पाडा, गन्ना इत्यादि नांवें आहेत.
ऊंस हा तृणजातींत मोडतो. उसाला हल्लींचा आकार येण्यास मनुष्य हाच कारणीभूत झाला आहे. यानें या गवतासारख्या बारीक झाडाची शहाणपणानें मशागत केल्यामुळें देशकालवर्तमानाप्रमाणें वार्याउंसासारख्या अगदीं बारीक व पुंड्यासारख्या मोठ्या जाड्या जाती अस्तित्वांत आल्या आहेत. ऊंस सुमारें पांच ते सात हातपर्यंत उंच वाढतो. ह्याचीं पानें सुमारें चार फूट लांब व दोन ते तीन इंच रूंद असून पीक तयार होण्याच्यापूर्वी खालचीं पानें वाळूं लागतात. कांहीं जातींत दरवर्षीं फुलावरा येतो व कांहींनां क्वचितच येतो.
इ ति हा स :- प्राचीन ग्रंथांत उसासंबंधीं जी माहिती उपलब्ध आहे तीवरून त्याचें मूलस्थान हिंदुस्थान, कोचीन चीन हें असलें पाहिजे असें वाटतें. ग्रीकलोकांच्या वैद्यकीयग्रंथांत ख्रिस्तीशकापूर्वी हिंदुस्थानांतील उसास बोरूपासून काढलेला मध असें नांव दिलेलें आहे. इसवीसन ६२७ ते ६५० या सालांच्या दरम्यान चीनचा बादशहा टाईटसंग यानें आपल्या राज्यांतील कांहीं इसम साखर करण्याची कला शिकण्याकरितां बहार प्रांतांत पाठविलें होतें असा इ. स. १५५२ सालीं प्रसिद्ध झालेल्या चीनच्या ज्ञानकोशांत उल्लेख केला आहे. इक्षु शब्दाचा उल्लेख अथर्ववेद व नंतरच्या संहितांत आहे. यावरून उसाची माहिती असून त्याचा उपयोग गूळ किंवा साखर करण्याकडे होत असावा असें वाटतें. महाभारतकालीं शर्करा किंवा खांडव लोकांस माहिती होती, व पक्वान्नें करण्याकडे तिचा उपयोग होत असें असें दिसतें. इतर पुराणांतहि तसाच पुरावा सांपडतो. यावरून फार प्राचीनकालापासून हिंदुस्थानांत साखर होत होती, या वरील विधानास आधार मिळतो. उसाची लागवड इराणांतून व अरबस्थानांतून पाश्चात्य देशांत गेली. ती पसरत पसरत सोळाव्या शतकाच्या आरंभीं वेस्टइंडीज व दक्षिणअमेरिका या देशापर्यंत पसरली.
उ प यो ग :- सुरतेकडे खजुरीया म्हणून खाण्याकरितांच ऊंस करितात. उंसाचा रसहि पुष्कळ लोक पितात. उसाच्या रसापासून गूळ, राब, काकवी, साखर, खडीसाखर, वगैरे करितात. रावापासून रंकापावेतों सर्वत्रांनां गूळ किंवा साखर यांची जरूार आहे. आपल्या खाण्यापिण्याच्या बहुतेक पदार्थांत गूळ किंवा साखर असते. गुळाचा व साखरेचा औषधांतहि फार उपयोग होतो. ऊंस समशीतोष्ण आहे. रस थंड आहे. गूळ उष्ण आहे. साखर समघात व खडीसाखर अगदीं निर्दोष अ. मानतात. गूळ, साखर किंवा उसाचा रस हीं पोटांत गेल्याबरोबर ताबडतोब शरीरांत शोषलीं जाऊन रूधिराभिसरण जोरानें सुरू होतें. तेव्हां हे पदार्थ मनुष्याच्या जीवनास अत्यंत जरूरीचे आहेत. उसाचा कोणताहि भाग फुकट जात नाहीं. बैलांस व घोड्यांस उंसाचे तुकडे करून देतात. वाढी जनावरांस खाऊं घालतात. चिपाटें व वाळलेलीं पानें यांचा उपयोग रस आटविण्यांत सर्पणाऐवजीं करितात पाचटाचें उत्तम खत होतें. पाचटाची राख व बारीक सारीक भुगा एखाद्या खड्यांत घालून त्यांत पाणी सोडलें व तें कुजलें म्हणजे त्याचें चांगलें खत तयार होते. काकवीची दारू (रम) करितात. गूळ इमारतीच्या चुन्यांत व सिमेंटांतहि घालितात. तो घातल्यानें चुना फार चिकट व मजबूत होतो. कामिनीवर उंसाची पेरें खातात, मधुर्यावर वेडा ऊंस देतात. उचकी लागल्यास उसाचा रस पितात.
व्या पा र :- सन १९१५ सालीं जे आंकडे प्रसिद्ध झाले आहेत त्यांवरून असें दिसतें कीं, सर्व जगांत मिळून त्यावर्षी साखरेचा एकंदर व्यवहार १,२५,००,००० टनापर्यंत झाला. यापैकीं ६०,००,००० टन साखर बीट नावांच्या कंदापासून काढलेली होती व बाकीची ६५,००,००० टन साखर उंसापासून झाली; म्हणजे बीट व ऊंस यांचे प्रमाण बहुतेक समान आहे. हिंदुस्थानांत साखर अगर गूळ तयार होतो तो सर्व बहुतकरून उंसापासून होतो. हिंदुस्थानांतील हा साखरेचा किंवा गुळाचा आंकडा लहान नसून सर्व जगांत हिंदुस्थानचा नंबर दुसरा आहे; हें खालीं प्रमुख देशांचे आंकडे दिले आहेत त्यांवरून दिसून येईल.
देशाचें नांव | टन साखर |
क्यूबा (अमेरिका) | ३०,००,००० |
हिंदुस्थान | २५,३४,००० |
जावा | १५,९१,००० |
हबाई | ६,१२,००० |
बाकी सर्व देशांचा नंबर याखालीं आहे. उंसाचें पीक सर्व उष्ण: कटिबंधांत व समषीतोष्ण कटिबंधांतील कांहीं भाग मिळून सरासरी ३७० अंश म्हणजे उत्तरेस स्पेन व दक्षिणेस न्यूझीलंडपर्यंत आढळतें.
हिंदुस्थानांतील सन १९१५-१६ सालचें क्षेत्र व उत्पन्नाचे आंकडे खालीं दिले आहेत.
प्रांत | एकर | गुळ टन |
संयुक्तप्रांत | १२६१००० | १२७८००० |
पंजाब | ३४७००० | २७५००० |
बिहार, ओरिसा | २६२००० | २६०००० |
बंगाल | २३१००० | २५६००० |
मुंबई (संस्थानांसह) | १०६००० | २९१००० |
मद्रास | ९५००० | १८६००० |
आसाम | ३७००० | २९००० |
वायव्य सरहद्दीवरिल प्रांत | ३१००० | ३३००० |
मध्यप्रांत व वर्हाड | २१००० | २६००० |
२३९१००० | २६३४००० |
उ त्पा द न क्षे त्र :- सन १९१५-१६ सालीं मुंबई व मध्यप्रांतातील ऊंस पिकणार्या प्रमुख जिल्ह्यांचें क्षेत्र खालीं दिलें आहे.
मुंबई इलाखा | एकर | मध्यप्रांत व वर्हाड | एकर |
सुरत | ३०६८ | बैतुल | ३३६३ |
नाशिक | ६९४९ | बिलासपूर | ३६०७ |
अहमदनगर | ४५३८ | छिंदवाडा | २२६७ |
पुणें | १३४२४ | रायपूर | २०१६ |
सातारा | १०७४० | भंडारा | १२८४ |
बेळगांव | ११७९७ | चांदा | १२१३ |
बालाघाट | ११७० |
वर दिलेल्या आंकड्याशिवाय मध्यप्रांतांत कोरडवाहू ऊंस सुमारें २००० एकरांत होता आणि अहमदनगर जिल्ह्यांत नव्या कालव्यामुळें उंसाखालील क्षेत्र वाढत आहे.
उंसाखेरीज ताड, माड वगैरे ज्यांच्या रसापासून गूळ व साखर तयार करितात त्या झाडांच्या लागवडीखालीं सन १९१४-१५ सालीं १५६०० एकर जमीन असून इ. स. १९१६-१७ सालीं १७५००० एकर होती. साखर किंवा गूळ हा उंसापासून अगर खारकेच्या किंवा ताडीच्या व नारळीच्या झाडाच्या रसापासून करितात. मद्रास व बंगाल इलाख्यांत ताडीपासून गूळ करण्याचा प्रचार जास्त आहे. ऊंस बहुतकरून हिंदुस्थनांत सर्व ठिकाणीं पिकतो. तथापि तो उष्णकटिबंधाच्या समषीतोष्ण प्रदेशांत चांगला होतो.
जा ती :- उंसाच्या अनेक जाती आहेत. सर्व जातींचे दोन वर्ग करितां येतील. एक जाडा, मऊं, व रसाळ असतो; त्याला जमीन चांगली लागते; खत व पाणी मुबलक लागतें. दुसरी जात कठिण व बारिक असून रसाला कमी असते. हिला जमीन हलकी असली तरी चालते; त्याचप्रमाणें खत व पाणी कांहीं थोड्या प्रमाणावरहि पुरेसें होतें. ही कठिण व बारिक जात पाऊसकाळ चांगला व पुरेसा असल्यास निव्वळ पावसावरहि होते. कित्येक ठिकाणीं एकदोनदां पाणी द्यावें लागतें. या जातीची मांजरी फार्मवर जावा पद्धतीनें लागवड करण्यांत आली व तिचें उत्पन्न जवळजवळ पुंड्या इतकें झालें. जावापद्धतीप्रमाणें तीस फूट लांब व पांच फूट खोल अशा अंतरानें चर खणून त्यांत पेरीं लावावीं व पीक जसजसें वर येईल तसतशी मातीची भर द्यावी. पावसाळा सुरू होईपर्यंत पाणी देऊन नंतर पाणी बंद करावयाचें. या जातीचा ऊंस कठीण असल्यामुळें या जातीस कोल्हे, रानडुकरें वगैरे प्राण्यांचा उपद्रव कमी होतो. या उंसाला मररोग फारशी लागत नाहीं. पण एखाद्या वेळीं काजळ्या रोग होतो.
उंसाचे अनेक रंग आढळतात. कांहींचा पांढरा, कांहींचा हिरवट पिंवळा, कांहींचा बांगड्या, कांहींचा काळसर व कांहींचा तांबडा असतो. स्थलपरत्वें मोठ्या, जाड्या, मध्यम जाड्या व बारीक, जातीची लागवड सर्वत्र आढळते. १ जाडी-मलबारी (सुरत), देवगडी (रत्नागिरी), पुंड्या (पुणें), कबिर्या (सोलापूर),२ मध्यमजाडी-बानसे (सुरत), वेत्ता (कारवार), सण्णबिळें (धारवाड).३ बारीक-कळीजडी (सुरत), वार्या, कळक्या अगर खड्या (सातारा), हुल्लकल्ल (धारवाड).
हल्लीं हिंदुस्थानांत परदेशी उंसाच्या जाती बर्याच आलेल्या आहेत. त्यांचीं नावें:- तांबडा व हिरवा मारिशस, जावा ३६, पट्याचा बी २०८, पट्याचा मारिशस वगैरे.
नि व ड :- उंसाच्या पिकांत सुधारणा घडवून आणण्याकरितां हिंदुस्थानांतील निरनिराळ्या परिस्थितीला योग्य जाती निवडून काढण्यास व संकर करून जाती तयार करण्यासाठीं कोइमतूर येथें एका प्रयोगक्षेत्राची स्थपना झाली आहे. तेथें व मुख्यत्वेंकरून ऊंसाचें आगर जें उत्तरहिंदुस्थान, तेथें योग्य व चांगल्या जाती हुडकून काढण्यासंबंधीं शोध जोरांत चालू आहेत व ते बरेच सफल झाले आहेत. तेथें नेहमींचा होणारा ऊंस म्हटला म्हणजे कळक्या तांबडा व पांढरा उरवजातीच्या वर्गांतील होय. हल्ली तेथें जे ३६ व अॅशीमॉरीशस या जातींची लागवड सुरू झाली आहे ह्या जाती मध्यम जाडीच्या असून उत्पन्नाला देशीपेक्षां जास्त आहेत.
पंजाबांत जे ३६, जे १०० ह्या मध्यम जाडीच्या जाती चांगल्या होत असून सणबिळे ही जात चांगली होते. अजीमगडच्या मंगो व ढवरा जाती नदीकांठच्या भागांत बर्या होतात.
मध्यप्रांतांत जाड्या नरम जातीपेक्षां सणबिळे, खारी आणि जावा २४७ या जाती उत्पन्नाला बर्या असून त्या लोकप्रिय झाल्या आहेत.
आसामांत पट्टेरा मारिशस्, बी ३७६, आणि बी१४७ या उत्पन्नाला बर्या ठरल्या आहेत. येथें उंसाच्या लागवडीचा प्रसार होण्यास जास्त जागा आहे.
पेशावरांत पुंड्या ऊंस चांगला होतो. म्हैसुरांत पटापटी व तांबड्या मारिश जातींपासून चांगलें उत्पन्न येतें असा अनुभव आला आहे. साधारणपणें उंसाला बारा महिन्यांचें पीक असें म्हणण्याची चाल आहे. तथापि ही म्हण सर्व जातींच्या उंसाला लागू पडत नाहीं. कांहीं जाती १०-११ महिन्यांतच तयार होतात. उ. पटेरा मॉरिशस्, रेडस्फोर्दस, जे ३६ वगैरे. कांहीं बारा तेरा महिन्यांत तयार होतात उ. पुंड्या कांहीं चौदा पंधरा महिने घेतात. उ. हिरवा मॉरिशस व कांहींनां तयार होण्यास सोळा ते अठरा महिने लागतात. उदाहरणार्थ, मॉरिशस व तांबडा.
हिंदुस्थानांत बागाईत पिकांपैकीं ऊंस हें मुख्य पीक होय. याला मेहनत, मशागत, खत व पाणी हीं सर्व जास्त लागतात. या पिकाला खर्च जास्त लागतो, परंतु खर्चाच्या मानानें फायदाहि बराच होतो. या पिकाला पाण्याची सर्व वर्षभर फार आवश्यकता असल्यामुळें हें पीक कालव्याखालीं व विहिरीवरच बहुतकरून करितात. तथापि, डोंगराळ भागांत जेथे जास्त महिने पाउस पडतो, तेथें हें पीक कोरडवाहू जमिनींत थोड्या प्रमाणांत करितात. मावळांत कोरडवाहूंत लागवड करितात तेव्हां प्रथम बियाण्यास मोड आणून मग शेतांत लावितात. पूर्वबंगाल्यांतहि अशीच चाल आढळते.
पा ल ट :- उसाचें पीक बारा महिन्यांचें असल्यामुळें त्याच त्याच (एकाच) जमिनींत हें पीक घेणें शक्य नसतें व जमिनीला विसावा मिळावा म्हणून कांहीं अर्धवट कोरडवाहू पिकांबरोबर याचा फेरपालट करणें जरूर असतें. याचा फेरपालट बहुतकरून इतर बागाईत पिकांबरोबर करतात. कालव्याखालीं वर्षाआड किंवा दोन वर्षाआड ऊंस लावतात. कांहीं ठिकाणीं एक वर्ष नवा ऊंस, दुसर्या वर्षी खोडवा व तिसर्या सालीं निळवा, ज्वारी (चार्याकरितां) आणि हरभरा घेऊन पुन्हां ऊंस लावतात. विहिरीखालीं एक खोडवा घेऊन भुईमूग, मिरच्या, कांदे, खपली गहूं, हरभरा, भाज्या वगैरे पिकें एक दोन वर्षे घेऊन पुन्हां ऊंस लावितात. सातार्याकडे हळद, भुइमूग, मिरची घेण्याची फार चाल आहे. मिरचीचें बिवड उसाला चांगलें असें म्हणतात.
गुजराथेंत उंसाची फेरपालट आलें, हळद, भुइमूग केळीं वगैरे पिकांनीं करतात. वसईकडे (ठाणें जिल्हा) केळीं, आलें, पानमळा वगैरेशीं फेरपालट करण्याची चाल आहे. येथें पानमळा दीड वर्षापेक्षां जास्त ठेवीत नाहींत. कर्नाटकांत-भातखाचरांत-पहिल्या वर्षी भात, दुसर्या वर्षी ऊंस तिसर्या वर्षी मिरच्या, रताळीं, कांदे वगैरे भाजीपाला, चवथ्या वर्षी ऊंस याप्रमाणें लागवडीचा प्रघात आहे.
इतर ठिकाणीं पहिल्यावर्षी ऊंस, दुसर्यावर्षी खोडवा, तिसर्या वर्षी बटाटे अगर गहूं, चवथ्या वर्षीं मिरच्या, रताळीं, भोपळे वगैरे, पांचव्या वर्षी ऊंस याप्रमाणें प्रघात आहे.
मांजरी फार्मवर प्रयोगाअंतीं खालीं दिलेला फेरपालट फायदेशीर ठरला आहे. पहिल्या वर्षी ऊंस, दुसर्या वर्षी निळवा (ज्वारी चार्याकरितां), तिसर्या वर्षी भुईमूग (लवकर तयार होणारी जात स्पॅनिश अगर स्मॉल जपान) किंवा तागगाडणी, चवथ्या वर्षीं ऊंस.
उंसाशिवाय निळवा व भुइमूग या पिकांना खत द्यावें लागत नाहीं. हीं पिके नुसत्या पावसावर येत असल्यामुळें जमिनीला पाण्यापासून विश्रांति मिळते. उंसाच्यापूर्वी भुइमूग घेतल्यामुळें जमीनींत पोषक द्रव्याची वाढ होते. व उंसापूर्वी भुइमुगाचें पीक असल्यानें उंसाला मरीपासून अपाय होत नाहीं. कारण जोंधळा व ऊंस यांना अपायकारक मर (गाभा जळणें) एकच प्रकारची असते. याकरिता भुइमूग मध्यें आल्यानें उंसाला फारशी मर होत नाहीं.
मि श्र पि कें :- उंसाची वाढ पहिले तीन महिने कमी असते. त्यावेळीं उसांत मका, कांदे, गवारी, भेंडी, खिरे, दूधभोपळा, काशीफळ वगैरे भाज्या (शहरजवळ असल्यास) लावण्याची फार चाल आहे. मका घेण्याची चाल मात्र सर्वत्र आहे. त्याचीं कणसें मिळून शिवाय गुरांना चाराहि होतो. बहुतेक ठिकाणीं जागोजागीं वरंब्यावर शेवरी पेरितात. शेवरी लवकर वाढते. त्या झाडांचा उंसाला आधार होतो, व वार्यापासूनहि संरक्षण होते. त्यांचा पाला गुरांना व शेरड्यांना खाण्याच्या उपयोगास येतो. शेताच्या भोंवतीं एरंड लावतात. त्यावर घेवड्याचे वेल सोडितात. घेवड्याच्या शेंगांची भाजी होते. व एरंड्यांचें तेल चरकाच्या ओंगणास व कढईच्या आंतून लावण्यास उपयोगीं पडतें.
ज मी न :-उंसाला कसलीहि जमीन चालते, परंतु त्यांतल्या त्यांत जमीन काळी असून तेल्या रंगाची अगर तांबूस काळी असावी. नदीकांठच्या मळईंत उसाचें पीक चांगलें येतें. त्याला पाणी पुष्कळ लागत असल्यामुळें ज्या जमिनीला पाण्याची सोय असते व ज्या जमीनींत पाणी जात झालें असतां झिरपून जातें अशीं जमीन चांगली. भारी जमीनीपेक्षां मध्यम काळ्या जमीनींत उसाचें पीक चांगलें येतें. पाणथळ अगर क्षाराच्या जमीनींत उंसाचें पीक चांगलें येत नाहीं. पाण्यांत खारेपणा असल्यास चांगल्या जमीनींतहि उंसाचें पीक येत नाहीं. उत्तर हिंदुस्थानांत पोयट्याच्या लापण जमीनीवर उंसाची लागवड मोठ्या प्रमाणावर करितात.
ज मी नी ची म शा ग त :- उंसाला सुमारें फूटभर खोल जमीन भुसभुशीत व मोकळी करावी लागते. गांवठी नांगरानें हें काम तीन नांगरटीनें होतें. प्रत्येक नांगरटीमध्यें निदान दोन किंवा तीन आठवडे अंतर असावें म्हणजे जमीनींत हवा चांगली खेळते व ती उन्हानें तापतें. कुंदा, हरळी, लव्हाळा, वगैरेंच्या वर निघून आलेल्या मुळ्या वाळून जातात. प्रत्येक नांगरणीच्या वेळीं निघणारीं ढेंकळें वाळल्यावर मैदानें फोडून टाकावींत. जीं ढेंकळें अशीं फुटणार नाहींत तीं हातानें फोडावींत. मैद फिरविल्यानें ढेकळें फुटतात एवढेंच नाहीं तर त्यामुळें जमीन साफ होऊन नांगराच्या बैलास त्रास होत नाहीं व नांगरहि प्रत्येक पाळीस खोलखोल जमीन नांगरीत जातो. अशा रीतीनें तिसरणीच्या वेळीं सुमारें १०-११ इंच माती भुसभुशीत होते. हेंच काम म्हणजे नांगरटीपासून सरीपर्यंतचें काम सुधारलेल्या आउतांचा उपयोग केल्यास निम्मे खर्चांत भागतें. हीं आउतें म्हणजे 'गॅलोज' नांगरानें एक नांगरट व नंतर ढेंकळें फोडणें व जमीन नरम व भुसभुशीत करणें. हीं कामें नार्वेंतील कुळव, तव्याचा कुळव वगैरेनीं करून सर्या पाडण्याच्या यंत्रानें सर्या पाडाव्या. उंसाला शेणाचें खत देणें असल्यास दोन नांगरण्या झाल्या म्हणजे दहाबारा कदमांच्या अंतरानें खताच्या गाड्या आणून शेतांत रिचवाव्या. खताचे ढीग शेतांत पडल्यावर ते जमीनीवर सारखे पसरावेत. खत पसरून झाल्यावर तिसरी नांगरणी द्यावी. जमीनीला एका बाजूस उतार असल्यास त्याच्या मगदुराप्रमाणें उताराशीं आडव्या ताली घलाव्यात. कोपर्याची जमीन नांगरली जात नसल्यामुळें ती जागा हातानें खणून काढावी. ताली घालून शेत तयार झाल्यावर वाफ्याच्या पद्धतीनें ऊंस लावणें असल्यास चार बैली नांगरानें २।. ते२॥. फुटांच्या अंतरानें सर्या पाडाव्या. सर्या जितक्या सरळ येतील तितक्या चांगल्या. सर्या पाडून झाल्यावर ११ ते १२ फुटांच्या अंतरानें सर्याशीं आडवे पाट तयार करावे म्हणजे साधारणपणें १० फूट हमचौरस वाफे असावे.
ला व ण्या ची वे ळ :- उत्तर गुजराथेंत ऊंस मे महिन्यांत लावितात. कारण जमीन रेताड असल्यामुळें तेथें उन्हाळ्यांत वाळवीचा फार उपद्रव असतो, तो पावसामुळें कमी होतो. म्हणून तो टाळण्याच्या हेतूनें तिकडे पावसाच्या तोंडी लागण करितात. दक्षिण गुजराथेंत व कर्नाटकांत नोव्हेंबर व डिसेंबर या महिन्यांत लागण करितात व पुणें जिल्ह्यांत जानेवारी ते मार्च महिन्यांत करितात.
वा फे व सा र्या:- वर सांगितल्याप्रमाणें लांब वाफे करण्याच्या ऐवजीं ४-५ फुटांच्या अंतरानें लांबच्या लांब सर्या पाडून लागण केल्यास उसाच्या खुरपणींत व पाण्यांत बरीच बचत होते असें अलीकडे आढळून आलें आहे. जास्त अंतर असल्यानें मध्यें कोळपा फिरवितां येतो. जास्त हवा व जागा मिळाल्यामुळें फूट जास्त होते व ती पोसली जाते. ऊंस बांधणीचें काम हातानें करण्याऐवजीं नांगरानें करितां येतें.
बि या णें :- वाफे अगर सर्या तयार झाल्यावर लागण सुरू करण्याच्या पूर्वी बेणें वरच्यावर पसरावें. लागणीकरितां बेणें चांगल्या जातीच्या उंसाचें असावें. बारीक, रोगट, गाभडी पडलेल्या, रंगलेल्या, उंसाचें नसावें. लागण सुरू करण्याच्या पूर्वी वाफ्यांत पाणी सोडून तें अंमळ जिरत आलें म्हणजे उजव्या किंवा डाव्या हातानें बेणें घेऊन एका पुढें एक असें टाकून त्यावर पाय देत देत सरींतून लागण करावी. पुण्याकडे सर्व उंसाचे तुकडे करून बेण्यास उपयोग करितात. सोलापूर, कोल्हापूर, बेळगांव, सातारा वगैरे ठिकाणीं वाढ्याचा उपयोग करितात. वाढ्याचें बियाणें तिरकस लावावें. कांडीं लावणें तीं डोळे बाजूस ठेवून लावावींत म्हणजे ते दडपून जाणार नाहींत. दोन पेर्यांत दोन ते तीन इंचाचें अंतर ठेवावें. लावणी करितां बियाणें तयार करणें तें सबंध उसाचें अजमासें एक फूट लांबीचें, व प्रत्येक पेर्याला तीन तीन डोळे असलेलें असें असावें. कित्येक ठिकाणीं (अमलसाद- सुरत जिल्हा) सबंध ऊंस लावितात. कित्येक ठिकाणीं नुसतींच वाढीं लावितात. उंसाचा वरचा भाग गोडीला कमी असतो पण लागणीच्या दृष्टीनें तो उत्तम असतो म्हणून उंसाचीं वरचीं तीन कांडीं लागवडीस घ्यावीं. स्थानापरत्वें दर एकरीं तेरा ते अठरा हजार बियाणें लावितात (त्या हिशोबानें एक एकरातील उंसाचे बियाणें दहा ते बारा एकरांस परतें). परंतु अशा पद्धतींत शेतांत अती दाटी होऊन उसाचें उत्पन्न जास्त येत नाहीं; याकरितां मांजरी फार्मवर प्रयोग करून असें ठरलें कीं, दर एकरीं सुमारें नऊ हजार बियाणें पुरें आहे; व यापेक्षांहि बियाणें कमी करण्याबददल प्रयोग चालू आहेत.
पा णी दे णें :- लागण झाल्यावर पांच सहा दिवसांत दोन वेळ पाणी द्यावें. याला अंबवणी व चिंबवणी म्हणतात. नंतर पुढें आठ ते दहा दिवसांनीं पाणी देत जावें. लागण झाल्यापासून सुमारें पंधरा वीस दिवसांत ऊंस उगवून वर येतो. उंसास बारा महिन्यांत अठ्ठावीसपासून तीस वेळ पाणी द्यावें लागतें. मध्यम प्रमाणानें पाणी दिल्यास खताचा अंश धुवून न जातां तो पिकाच्या भागवट्यांस पडतो. व त्यामुळें पीक चांगलें येतें. पाणी जास्त झाल्यास व तें निचरून जाण्याची सोय नसलयास जमीनीवर मिठासारखा लोणा येतो व जमीनी नापीक होतात. अशा हजारों एकर जमीनी निरेच्या कालव्यावर (पुणें जिल्हा) पडीत पडल्या आहेत. इसवी सन १८९५ सालीं मांजरी (पुणें जिल्हा) येथील सरकारी मळ्यांत उंसास किती पाणी दिलें म्हणजे पीक चांगलें येईल याबद्दल अनुभव घेऊन पाहिला. त्यावरून नव्या उंसास भरपूर पाणी पावसाच्या मानानें ९५ इंच व मध्यम पाणी ७३ इंच लागतें. खोडव्यास ८५ व ६३ इंच पाणी पुरें होतें.
वरील अनुमानावरून असें सिद्ध होतें कीं, उंसाचे मळेवाले फार पाणी व्यर्थ खर्च करितात. त्यापासून पिकाला कांहीं फायदा न होतां उलट नुकसान होतें. करितां पाणी देण्याच्याकामीं जास्त काळजी घेतली पाहिजे. ऊंस गाळण्याच्या पूर्वी उसाला भरपूर पाणी द्यावें; असें न केल्यास रस कमी निघतो. ऊंसाला दर खेपेस सरासरीनें उन्हाळ्यांत प्रत्येक आठ दिवसांनीं अडीच इंच पावसाइतकें पाणी द्यावें. हिवाळ्यांत दहा दिवसांनीं दिलें असतां पुरें होतें. तथापि दोन पाण्यांमधील अंतर जमिनीच्या मगदुरावर ठरतें.
च रा ची प द्ध त :- फार पाणी दिल्यामुळें त्या पाण्याच्या अगर पाटाच्या पाझरामुळें कांहीं भागांत उपळ तर कांहीं भागांत लोणा येऊन जमीनी पड टाकाव्या लागतात. अशा जमीनींत चर काढून निचरा केल्यास त्या पिकाऊ करतां येतात. तथापि असे चर निघेपर्यंतहि या जमीनींत विवक्षित मर्यादेपर्यंत ऊंसाचें चांगलें पीक घेतां येतें. जमीन नांगरून एक वर्ष चांगली तांपू द्यावी. नंतर तण काढून टाकावें, सोईवार पाडगीं पाडावीं नंतर जमीनीच्या उताराशीं काटकोनांत येतील असे ४ ते ५ फूट अंतर ठेवून १॥ ते १ फूट खोल असे समांतर चर काढावे व माती मधींल कटांवर पसरावी. फेब्रुवारींत (माघांत) चर काढून १५।२० दिवसांनीं उंसाची लागण करावी. चरांत जास्त ओल अगर पाणी असल्यास थोडी राख टाकावी. लागणीपूर्वीं तळाची माती ६ इंचपर्यंत मोकळी करावी. लावणीपूर्वी पंधरा दिवस शेणखत, लावतेवेळीं सल्फेट ऑफ आमोनिया नंतर दीड महिन्यानें व पांच महिन्यांनीं सल्फेट ऑफ आमोनिया, कर्डीची पेंड व एरंडीची पेंड द्यावी. ऊंस पुंड्यापेक्षां मांजाव जातीचा लावावा. माद्य ते चैत्र लागण करावी. वर्षांतून १४।१५ पाणीं पुरतात. पांच महिन्यांचा झाल्यावर कटावरील माती कुदळीनें अगर साबूल नांगरानें उंसाच्या वुडास भर द्यावी. व आठवड्यास एक प्रमाणें कोळपणी द्यावी. उपळाच्या जमीनींतींल ऊंस पक्का होण्यास तीनचार आठवडे जास्त लागतात. या पद्धतीच्या उंसाचा खोडवा उत्तम व जास्त फायदेशीर होतो.
जो पा स ना :- उंसानें एकदां काडें बांधिलें म्हणजे मग खुरपणी, खांदणी, बधांणी व पाणी याशिवाय त्याचें कांहीं करावयाचें नसतें. जमीनीची मेहनतमशागत चांगली झाली असल्यास खुरपणीचा फारसा त्रास होत नाहीं. तरी तीनपासून पांच खुरपण्या द्याव्या लागतात. सुमारें पांच महिन्यांचा ऊंस झाला म्हणजे त्याची बांधणी करावी म्हणजे दोन उंसाच्या तासांतील वरंबा कुदळीनें फोडून त्याच्या मातीची उंसाच्या सरीस भर द्यावी. इतका वेळपर्यंत जो ऊंउंस सरींत असतो. तो आतां वरंब्यांत येतो. पुण्याकडे बांधणीचें काम मक्त्यानें देतात. त्यास दर एकरीं दहा रूपयें खर्च येतो (मुंबई शेतकी खातें हस्त पत्रक नंबर ८ सन १९१४) तेंच काम लागणीच्या पद्धतींत थोडा फरक करून दोन ते अडीच फूट अंतर दोन ओळींत असतें, तें साडेतीन फुटाचें करून उंसाची लागण सलग ओळींत करावी. अशा पद्धतींत उंसाची बांधणी साबूल नांगराच्या साहाय्यानें सवादोन रुपयांत करतां येते.
ख त :- उंसाच्या पिकांत पाणी व खत या दोहोंचा परस्पर इतका निकटसंबंध आहे कीं, जर एकाचा विचार करूं लागलें तर त्याबरोबर दुसर्याचा करणें भाग पडतें. उंसाला देण्याच्या खतांत मुख्य नायट्रोजनचा विचार केला पाहिजे. उंसाला नायट्रोजन जास्त लागतो. दर एकरीं चांगल्या उंसाचें उत्पन्न ४४ टन धरल्यास तयामध्यें १३० पौंड नायट्रोजन सांपडतो. परंतु यापेक्षां तो जास्त द्यावा लागतो. कारण ऊंस हें पुष्कळ पाण्याचें पीक असल्यामुळें त्या योगानें व इतर कारणानें यापैकीं बराच भाग वाहून जातो. उंसाच्या लागवडींत बहुतकरून गांवखत, मेंढीच्या लेंड्या व सोनखत वगैरेंचा उपयोग करितात. शिवाय पेंडीचीं व मासळीचीं वरखतें देण्याची कालव्यावर पद्धत आहे. कांहीं ठिकाणीं तागासारखीं बेवडाचीं पिकें करून तीं शेणखताऐवजीं आंत गाडून टाकण्याचीहि पद्धत आहे. कर्नाटकांत मेंढ्यांच्या लेंड्या व कारळ्याचें बेवड करण्याची चाल आहे. सुमारें पंधरा सतरा वर्षे मांजरी येथील माळ्यांत प्रयोग करून साधारणपणें असें सिद्ध झालें आहे कीं, हल्लींच्या पद्धतीनें उंसाचें उत्तम पीक मिळण्यास दर एकरीं साडेतीनशें पौंड नायट्रोजन मिळेल इतकें खत दिलें पाहिजे, हें खत इतर शेतकरी देतात त्या मानानें पुष्कळ कमी आहे. शेतकरी पन्नास ते ऐशी गाड्या शेणखत देऊन शिवाय दर एकरीं सुमारें तीन हजार पौंड पावेतों करंजी अगर एरंडी सारख्या पेंडी देतात. पेंड व सल्फेट ऑफ अमोनिआ याचें उसाला खत दिल्यास जास्त फायदा होतो, असें मांजरी फार्मांतील कालव्याच्या पाण्यावर व सातारा जिल्ह्यांतील विहिरीच्या पाण्यावर केलेल्या प्रयोगावरून सिद्ध झालें आहे. एक एकर उंसाला किती व केव्हां खत द्यावें तें खालीं दिलें आहे.
का ल व्या व री ल ऊं स :- शेणखत ३० ते ३५ गाड्या सरी काढण्यापूर्वी. सल्फेट ऑफ आमोनिआ ११२ पौंड पहिली खुरपणी जहाल्यानंतर. करडीची पेंड १२०० पौंड, अगर एरंडीची पेंड २४०० पौंड किंवा तितकीच करंजीची पेंड व २२४ पौंड अमोनियम सल्फेट बांधणीच्या वेळीं.
वि हि री व री ल ऊं स:- शेणखत वीस ते पंचवीस गाड्या सरी काढण्यापूर्वी. सल्फेट ऑफ अमोनिआ ११२ पौंड पहिल्या खुरपणीनंतर. करडीची पेंड ८०० पौंड अगर एरंडीची १६०० पौंड अगर तितकीच करंजीची व ११२ पौंड सल्फेट ऑफ आमोनिआ बांधणीच्या वेळीं. सल्फेट ऑफ अमोनिआनें उंसाला काळोखी फार लवकर येऊन फूट जोरानें होते व पिकाला चांगला उठाव होतो.
जमीनीचा पोत कायम राखण्याकरितां कांहीं तरी भरभरीत खत द्यावें लागतें. हें काम शेणखतानें अगर तागाचें पीक करून गाडल्यानें होतें. परंतु हेंच काम पाचट गाडल्यानें कमी खर्चांत होतें. (उसाच्या वाळलेल्या पानांस पाचट म्हणतात.) एका एकरांत सुमारें चाळीस टन उंसाचें उत्पन्न येत असून त्याचें पाचट पांच टन पावतों येतें. पाचटाचा उपयोग जवळ जवळ शेणखताइतकाच आहे.
मांजरीफार्मवरील प्रयोगाचा दर एकरीं गुळाच्या उत्पन्नाचा तपशील:-
खताचें नांव | सन १९११-१२ | १९१२-१३ | १९१३-१४ |
पौंड | पौंड | पौंड | |
शेणखत ३० गाड्या | ८४८० | ७,७३२ | ९,७२२ |
पाचट ५ टन | ८,१६४ | ७,७४६ | १०,०८० |
(एका एकरांतील) |
ख ता क रि तां पा च ट कु ज वि ण्या ची री त :- खताच्या खड्यांत एक थर पाचट व एक थर माती अशा प्रकारें घालून तें एक पावसाळा कुजूं द्यावें द्यावें व दुसर्या वर्षीं शेतांत पसरावें. अगर उंसापूर्वीचें खरिपाचें पीक काढल्याबरोबर त्याची तागाप्रमाणें लोंखडी नांगरानें गाडणी करावी म्हणजे जमीनींत ओलावा भरपूर असल्यानें ऊंस लागणीपर्यंत हें सर्व कुजून जातें. शेणखताचा कस एक धरून तितक्याच वजनाच्या इतर जातींच्या खतांस ''नायट्रोजन'' चा कस साधारणपणें खालीलप्रमाणें असतो:- (१) शेणखत १, (२) सोनखत २, (३) लेंड्याचें खत २, (४) ओलाताग .॥।., (५) पाचट .॥., (६) तबेल्यांतील खत १।, (७) करडी पेंड १०, (८) भुईमुग पेंड १२, (९) एरंडी पेंड ७, (१०) सरकी पेंड ८, (११) करंजाची पेंड ५, (१२) चिंगळी मासळी १५, (१३) तारळी मासळी १०, (१४) धोत्रा १२, (१५) आमोनियम सल्फेट ३२, (१६)सोडानायट्रेट २५.
बां ध णी :- उंसाची बांधणी झाली म्हणजे उंसाला मजबुती येउन तो वार्यानें अगर पावसानें पडत नाहीं. जमीनीवर लोळलेल्या उंसांत साखरेचें प्रमाण कमी पडतें. बांधणीच्या पूर्वीपासून जसजसा ऊंस वाढतो तसतसा तो त्याच्या आंगच्या मोकळ्या झालेल्या पानांनीं गुंडाळण्याची कांहीं ठिकाणीं चाल आहे. असें केल्यानें उंसाला हवा वगैरे पोंचते. जेथें एकसारखें उंसाचे मळे आहेत तेथें पानें गुंडाळण्यास फार खर्च येतो (दर एकरीं सुमारें ४५ रूपये). परंतु वसई (ठाणें जिल्हा) सारख्या ठिकाणीं जेथें एकएक लहान मळा अलग असतो तेथें उंदीर, घुशी, कोल्हे, रानडुकरें वगैरे श्वापदांपासून बचाव करणें या पद्धतीनें सोपें जातें.
मद्रास इलाख्यांत राजमहेंद्राकडें उसाला धीर देण्याकरितां शेतांत बांबू उभे रोंवून त्याला पुन:आडवे बांबू बांधितात. दर एकरीं सुमारें हजार दीडहजार बांबू लागतात व ते पांच वर्षे टिकतात.
प क्व ता प री क्षा :- ऊंस तयार झाला कीं नाहीं, हें समजण्याचीं अनेक लक्षणें आहेत. पहिलें- उंसाचा चोभा (वाढें) मिळतो म्हणजे खालची बहुतेक पानें पिकून शेंड्यांस दमदार पानें रहातात. दुसरें - उंसाचे डोळे फुगूं लागतात. तिसरें - ऊंस खणखणीत वाजतो. चवथें - ऊंस मोडला असतां कांड्यावर तुकडा पडतो. पांचवें - ऊंस कापून पाहिला असतां त्यांतील साखरेचे कण चमकूं लागतात.
ऊंस तयार झाला किंवा नाहीं, हें पाहण्याच्या अनेक रीती वर नमूद केल्या आहेत; परंतु त्यापैकीं अगदीं खात्रीची अशी एकहि नाहीं. याकरिता सोपी व विश्वसनीय रीत म्हटली म्हणजे उंसाच्या रसांतील कणांचें प्रमाण पक्वतामापकानें (ब्रिक्स सॅकॅरोमिटरनें) किंवा उसाच्या डिग्रीनें पाहणें होय. हें पाहण्याकरितां उंसाची डिग्री उभट ग्लासासह सुमारें चार पांच रूपये किंमतीपर्यंत मांजरी फॉर्मवर मिळते ती घ्यावी. सकाळीं आठ वाजण्याच्या सुमारास जेव्हां रसाची उष्णता सुमारें साडेसतरा अंशांजवळ असते, त्या वेळीं स्वच्छ कपड्यांतून रस गाळून तो उभट ग्लासांत टाकावा. रसांतील बुडबुडे नाहींसे झाल्यावर डिग्री आंत सोडावी, ती ज्यावेळीं वीस अंश दाखवील त्यावेळीं ऊंस गाळण्यास तयार झाला असें समजावें.
खो ड वा :- ऊंस तयार झाला म्हणजे खोडवा ठेवणें नसल्यास तो मूळासकट उपटून काढावा. खोडवा ठेवणें असेल, तर तो जमिनीबरोबर कोयत्यानें अगर कुर्हाडीनें तोडावा व त्याचीं वाळलेलीं पानें सोलून काढून टाकावीं. नंतर उंसाच्या मोळ्या बांधून गाडींतून अगर डोकीवर गुर्हाळाच्या जागेवर न्याव्या. नंतर चरकानें उंसाचा रस काढून तो उथळ कढईंत चुलाणावर आटवून त्याचा गूळ तयार करावा.
च र क :- अगदीं पूर्वीं उंसाचा रस काढण्याकरितां तेलाच्या घाण्यासारखे दगडी घाणे असत. दगडी घाण्याच्याऐवजीं मग लांकडी चरक झाले. लांकडी चरक अजूनहि बरेच प्रचारांत आहेत. या चरकानें शेंकडा पंचावनपर्यंत रस निघतो. सन १८८२-८३ सालापासून लोखंडी उभ्या तीन लाटांच्या देशी चरकांचा पुष्कळ प्रसार झाला आहे. आकारमानाप्रमाणें त्याला १२५ ते २५० रूपये किंमत पडते. या घाण्यानें रसाचें प्रमाण शेंकडा ६४ ते ६६ पडतें. हल्ली पुणें जिल्ह्यांत ऑइल एंजिननें चालणारे उंसाचे चरक (पॉवरक्रशर) चालू आहेत. मांजरीफार्म येथील घाण्यानें रोज देशी सहा सात लोखंडी घाण्याइतका रस निघतो. या घाण्यानें रसाचें प्रमाण शेंकडा ७२ ते ७५ पडतें. असे चरक हल्लीं मद्रास, मध्यप्रांत व म्हैसूर येथें चालू आहेत. सरासरीच्या मानानें या यंत्राच्या चरकानें दर ताशीं अडीच तीन काहिली रस निघतो व २ टन [एक टन = २२४० पौंड] ऊंस लागतो. यंत्राच्या चरकानें व देशी चरकानें रस काढण्यास साधारणपणें खर्च सारखाच येतो; पंरतु यंत्राच्या साहाय्यानें एका दिवसांत चोवीसपर्यंत आधणें पडतात व देशी घाणीनें फक्त चारच पडतात. या यंत्राच्या चरकापासून मुख्य फायदा म्हणजे बराच जास्त रस निघणें व वाढ्याची बचत हा होय. देशी चरकाच्या वेळीं वाढीं रवींतील बैलांस द्यावीं लागतात. दर एकरीं जास्त रसाचा गूळ व वाढें मिळून एकंदर साठ रूपयांचा फायदा होतो. इ. स. १९१४-१५ सालीं निरनिराळ्या देशी व परदेशी उसांच्या चरकांचे मांजरी फार्मवर तुलनात्मक प्रयोग करण्यांत आले त्याचा तपशील खालीं दिला आहे.
गू ळ रां ध णें :- पुणें जिल्ह्यांत गूळ रांधण्याचें काम उक्तें देतात. हें काम पत्करणार्या लोकांच्या टोळ्या असतात. प्रत्येक टोळींत अकरा माणसें असून घाणी ओढण्यास बैल असतात. या टोळीस पुण्याकडे 'रवी' अशी संज्ञा आहे. हींत दोन माणसें महत्वाचीं असतात. एक गुळवा [गूळ रांधणारा] व दुसरा जाळवा [जाळ घालणारा]. गुळवा व जाळवा हीं दोन माणसें. चार माणसें शेतांतील ऊंस पुरविणारीं [फडकरी]. दोन माणसें बैल हांकण्यास. दोन माणसें चरकाजवळ. ऊंस घालण्यास १ व उंसाचीं चिपाटें काढण्यांस १. एक माणूस उंसाचे तुकडे करण्यास त्याला पेरोळ्या म्हणतात. याप्रमाणें एकूण अकरा.
हीं अकरा माणसें रोज दोनशें पौंड गुळाचें एक आधण याप्रमाणें चार आधणें काढितात व रोज सहा रूपये घेतात. सर्व कामावर मालकानें नजर ठेवून आपल्या पदरांत चांगल्या गुळाच्या ढेपा घ्यावयाच्या असा ठराव असतो.
कढई चुलाणावर ठेवण्यापूर्वीं तिला (आंतील बाजूनें रस जळूं नये व गूळ कढईस चिकटूं नये म्हणून) उडदाचें पीठ रसांत कालवून त्याचा लेप करतात, व नंतर कढई चुलाणावर ठेवून तापली म्हणजे आंत गोडें तेल शिंपून एरंडाच्या पानानें चोळतात. याला लाढण असें म्हणतात. हें लाढण एकदां केल्यानंतर पुन्हां पंधरा वीस दिवसांनीं करतात.
वर निरनिराळ्या चरकांत रसाचें प्रमाण कसें पडतें हें सांगितलेंच आहे रस काढून झाला म्हणजे तो गाळून कढईंत घालून चुलाणावर कढवितात. रस कढत असतांना पहिली ढोरमळी निघून गेली म्हणजे आंतील सर्व माळी निघावी म्हणून कित्येक ठिकाणीं रानभेंडीचा रस, दूध वगैरे आंत घालतात. रसांतील आंबटपणा कमी व्हावा म्हणून कांहीं ठिकाणीं दर हजार पौंडास वीस औंस चुना अगर एक औंस सोडा घालतात. पुणें व सातारा जिल्ह्यांत उंसाची लागवड बरीच असून गूळ करण्याची चाल पूर्वीपासूनच आहे. परंतु दोन्ही ठिकाणच्या रस कढविण्याच्या कढ्या व चुलाणीं यांत बराच फरक आहे. पुण्यांतील कढई उथळ असून तिचा व्यास सात फूट व खोली दहा इंच असते व तींत एका खेपेस हजार ते बाराशें पौंड रस काढविला जातो. सातारा व इतर ठिकाणच्या कढईचा व्यास सात फूट असून बाजूची खोली अठरा ते वीस इंच असते. या कढईंत दर खेपेस तेराशें ते पंधराशें पौंड रस कढतो. परंतु रसाची खोली जास्त झाल्यास तो कढविण्यास सर्पण जास्त लागतें. सातारा जिल्ह्यात बिनसोर्याची चुलाणें असल्यामुळें दर एकरामागें वीस ते तीस रूपयाचें पालाचिपाडाशिवाय सर्पण जास्त लागते. याकरिता पुणेचालीच्या चुलाणाचा उपयोग केल्यास जळणाचा वेगळा खर्च येत नाहीं.
चु ला ण :- पुणें चालीच्या चुलाणात खालीं भोइरा व हगरें हीं असतात. हगर्याचें तोंड चुलाणाच्या एका बाजूला काढून दिलेलें असतें. या रचनेमुळें ज्वलनक्रियेस ताज्या हवेचा पुरवठा या हगर्याच्या द्वारें होतो व तो नियमितपणें होतो. खराब झालेली हवा जाळदोरावाटें निघून जाते. चुलाणाचा गाळा सात फूट असून ह्याची उंची जमीनीपासून चार फूट असते. (ह्या चार फुटात सहा इंचाचा गाळा असतो). या चुलाणाची भिंत सातार्याकडील चुलाणाप्रमाणें डेरेदार नसून नीट ओळंब्यात असते. चुलाणाच्या खालचा भोइरा साडेतीन फूट खोल असून तो तळाशीं डेरेदार असतो. तळाशीं त्याचा गाळा साधारणपणें पांच फूट असतो. या भोइर्याच्या तोंडावर एक लोखंडी पत्रा असतो. या पत्र्याला मधोमध औरस चौरस नऊ इंचाचें एक भोंक असतें व त्यांतून राख खालीं पडते. हगरें सुमारें दोन फूट रूंद असून तें वर सांगितल्याप्रमाणें भोईर्याशीं जोडलेलें असतें. याचें तोंड जाळदोराला काटकोनांत एका बाजूला बाहेर जमीनीबरोबर काढून दिलेलें असतें. भेइर्यातींल राख याच तोंडावाटे बाहेर ओढितात. चुलाणाच्या भावेंतालची जागा भरून काढतात. सातार्यातील चुलाणास भोइराहि नसतो व हगरेंहि नसतें. याची खोली पाच फूट असून हें वरच्यापेक्षां खालीं रूंद असतें. पुणें चालीच्या चुलाणास सातारच्या चुलाणापेक्षां जास्त खर्च येत नाहीं.
सु धा र ले लें चु ला ण :- कोणत्याहि चुलाणाचें खरें महत्त्व त्यांत घातलेल्या विवक्षित जळणापासून उत्पन्न होणार्या उष्णतेच्या प्रमाणावर अवलंबून असतें. बहुधा हें जळण म्हणजे पाचट, चिंपाट किंवा अशाच तर्हेचें असतें.
चुलाणाला मुख्यत: महत्त्वाचे तीन भाग असतात:- (१) जाळ घालण्याचें तोंड (जाळेदोर) (२) हवा पुरविण्याकरितां मार्ग व (३) धुराडें. कोणत्याहि चुलाणाची उपयुक्तता वरील तीन गोष्टींवर अवलंबून असते. म्हणून चुलाण असें बांधावें कीं त्यांत, घातलेल्या जळणापासून निघणारी सर्व उष्णता काहिलीला मिळावी.
सातार्याकडील कुंभारी चुलाणांत वरील तीन गोष्टी एका ठिकाणींच असतात. म्हणून जळण जास्त लागतें. पुणेरी चुलाणांत हवा जाण्याकरितां स्वतंत्र सोरा ठेविल्यामुळें जळण अधिक चांगलें जळतें, म्हणून नुसत्या पाचट चिपाटांवरच काम भागतें. सुधारलेल्या चुलाणांत आणखी धुराडें निराळें राखिल्यामुळें व हवा सारखी जोरांत पुरविल्यामुळें जळण फारच उत्तम जळतें; शिवाय धुराड्याकडे जातांना वाटेंत रसाच्या साठ्यांची काहील तापविण्यांत गरम धुराचा उपयोग केल्यामुळें बरेंचसें जळण वांचतें. ज्याप्रमाणें पुष्कळ चरक असल्यानें अगर यंत्राचा नरक असल्यानें रस कमी जास्त निघेल त्याप्रमाणें निरनिराळ्या तर्हेचीं चुलाणें बांधावी. दुहेरी चुलाणांत एक सांठ्याची व एक रस कढविण्याची अशा दोन कढ्यांची सोय केलेली असते. तिहेरी चुलाणांत एक सांठ्याकरितां व दोन कढविण्याकरितां कढ्या असतात. जेथें रोज आठ आधणें काढतात तेथें हें चुलाण सोईचें आहे.
सं यु क्त चु ला ण:- यांत दोन कढ्या रस शिजविण्याकरितां व दोन अगर अधिक सांठ्याकरितां असतात. हें चुलाण जेथें तीन चरक अगर यंत्राचा चरक असेल तेथें उपयोगाचें आहे.
ढे पी पा ड णें:- पुणें चालीच्या पद्धतीनें रस काढण्यास दोन तास लागल्यास साधारणपणें गूळ रांधण्यास तितकाच वेळ लागतो. चुलाणावर गूळ तयार झाला म्हणजे ती कढई उचलून तो थंड होण्याकरितां दुसर्या कढर्इंत ओतितात. या वेळीं मदनाचें उष्णमान ११७०-११८० अंश सेंन्टीग्रेड असतें (धारवाड, खानदेश व निझामचें राज्य येथें निवविण्याचें काम जमिनींत एक घट्ट जमिनीचा वाफा (४X२।) करून बाजूनें त्याला फळ्या लावून त्यांत करितात. व दुसर्या दिवशीं या गुळाचें कापून विटाप्रमाणें लहान तुकडे करितात. मध्यप्रांतांत हें काम लांकडाच्या वाफ्यांत करितात. नंतर गूळ फडक्यांत बांधून टांगून ठेवितात व त्यांतील कांकवी निथळून जाऊन गूळ घट्ट होतो. गुजराथेंत गूळ गाडग्यांत सांठवितात म्हणून तो थोडा अगोदर काहींल उतरून भरतात. व तो साधारणपणें निवाला म्हणजे ढेंपाळ्यांत टाकितात. ढेंपाळें म्हणजे जमिनींत खड्डा घेऊन त्यांत कापड घालितात व त्यांत गूळ टाकून तो तेथें चोवीस तास पावेतों राहूं देतात. एवढ्या अवधींत गुळाची चांगली कणखर ढेप बनते व ती विकण्यास तयार होते. परंतु या पद्धतींत प्रत्येक ढेपेंतून सुमारें एक पौंड पावेंतों काकवी वाया जाते, व जमिनींत ढेपळीं केल्यानें राखण ठेवूनहि गूळ चोरीस जाण्याचा संभव असतो. पत्र्याचीं ढेपाळीं केल्यानें गूळ बंदोबस्ताच्या ठिकाणीं नेऊन ठेवितां येतात. या पत्र्याच्या ढेपळ्यांत किंवा बादलींत बुडाशिवाय आंतल्या बाजूला सुमारें तीन इंश्वावर राहील अशा बेतानें एक भोंक पाडलेली चाळणीवजा तबकडी बसवावी. यांत नेहमींप्रमाणें फडकें घालून वर गूळ टाकावा म्हणजे उतरलेली रशी जमिनींत जिरून जाण्याऐंवजीं बादलीच्या बुडाशीं सांठेल.
का क वी :- ज्यावेळीं गुळाऐवजीं नुसती काकवी करणें असेल त्यावेळीं मदनाचें उष्णमान १०२० सेंटीग्रेड असलें म्हणजे कढई उतरावी व जेव्हां साखर करणें असेल तेव्हां राबाचें उष्णमान ११०० ते ११२० सें. ग्रे. असेल तेव्हां उतरावी.
म ळी :- सध्यां उसाचा रस शिजवितांना प्रथम जी मळी निघते ती पुष्कळ ठिकाणीं तशींच टाकून देतात एका आधणाच्या वीस शेर मळींत सुमारें बाराशेर रस असतो. दर आधणामागें बारा शेर रस वाया जाऊं देणें, म्हणजे दर आधणास चार आणे; म्हणजे दररोज एक रूपया तोटा करून घेण्यासारखें आहे. या हिशेबानें एका एकराच्या गुर्हाळांत साठ आधणें निघत असल्यामुळे पंधरा रूपयांचा रस मळीबरोबर उकिरड्यांत फेंकला जातो. त्याची बचत व्हावीं म्हणून एका विशिष्ट चाळणीचा उपयोग करावा. ही चाळण चौकोनी असून लोखंडी कल्हईच्या पत्र्याची केलेली असते. चाळणीच्या वरच्या तोंडाचें माप २०X२० इंच असते. ती खालीं निमूळती होत गेलेली असून खालच्या तोंडाचें माप १० इंच X १० इंच असतें खालच्या तोंडापासून तीन इंचांवर एक भोकें पाडलेला पत्रा मजबूत बसविलेला असतो. हीं चाळणी लांकडाच्या घडवंचीवर ठेऊन खालीं रसाकरितां एक भांडें ठेविलेलें असतें. चाळणीवर चाळणीच्या पत्र्याला टेंकेल इतका ढिला एक किंतानाचा तुकडा अंथरून त्यावर मळी टाकितात. हा जो रस गळून खालीं येतो तो कल्हईच्या पत्र्याच्या पन्हळीनें कढर्इंत सोडावा. किंतानाचा तुकडा प्रत्येक आधणाच्यापूर्वी धुवावा म्हणजे रस गळण्याचें काम चांगलें होतें.
गु र्हा ळ घ रां त ला ग णा री सा मु ग्री :- चरक अगर लोखंडी घाणी. नांद (मांदण) चरकांतील रस धरण्यास. कढ्या दोन एक रस कढविण्यास व एक गूळ थंड करण्यास. हौद २ रस सांठविण्यास, मळी गाळण्याची चाळणी. वरील चाळणीसाठीं किंतान, ढेंपाळी १२, ढेंपाळ्यांत घालण्याकरितां पडदा (कपडा), तरई (ढेंपाळीं ठेवण्याकरितां लोखंडी वांकडा पत्रा), हा (चरकाजवळ रस वायां जाऊं नये म्हणून ठेवितात), फळ्या ४ नांदीवर ठेवण्यासाठीं, लोखंडी वाट्या २ तेलाकरितां वगैरे, दंडाळीं २ कढई उचलण्याकरितां, शिबीं २ मळी काढण्याकरितां, फावडीं-गूळ थंड होत असतां. हालविण्यास, हात्यालांकडी- गूळ खरवढण्यास, खुरपें, घोडी-दिवा ठेवण्यास, टिनाच्या बत्त्या २ , मोठा दिवा, पांट्या २ चिपाडें राख वगैरे भरण्यास, घमेलें, आढें-चरकाकरितां, लोखंडी घागरी.
नि र नि रा ळ्या प्रां ता ती ल ला ग ण :- निरनिराळ्या प्रांतांतील परिस्थितीप्रमाणें उसाच्या लागणींत फरक आढळतो व त्याचा कांहीं ठिकाणीं उपयोगहि होण्यासारखा आहे म्हणून त्या पद्धतीचें वर्णन पुढें दिलें आहे.
कर्नाटकांतील लागण :- या प्रांमामध्यें जमींन खतावून वगैरे तयार झाल्यावर शेतांत लाब सर्या पाडितात. त्यांत पाणी सोडून उंसाचीं पेरीं लावितात. जमींन जराशी वाळली म्हणजे कुळवानें अगर हलक्या नांगरानें सपाट करितात. उंसाची फूट झाली म्हणजे उसाच्या ओळींत नांगर घालून सर्या पाडतात व नंतर पाणी देण्याकरितां वाफे तयार करितात परंतु कठिण बारीक जात असल्यास जमीन तशींच सपाट ठेवितात. उंसाची बांधणी वगैरे करीत नाहींत; पाणी जमिनीवर सोडून देतात व कित्येक ठिकाणीं ओल बरेच दिवस टिकावी म्हणून शेतांत गवत पसरतात. याच्या योगानें पाणी कमीवेळां पुरतें (मॉलीसन व्हा. ३).
धारवाड जिल्हा :- यांत फेब्रुवारी महिन्यांत नांगरानें सरी पाडून तींत ३ ते ६ इंच अंतरानें १२ ते १५ इंची पेरें, प्रत्येक पेरावर ओंजळभर खत घालून लावितात. दुसर्या तासानें पहिली सरी झांकून जाते. अशी सर्व लागण झाल्यावर शेतांत पाणी सोडितात. जमीन वाळली म्हणजे ऊंस फुटण्यापूर्वी नांगरानें वरंबे फोडतात व ऊंस वरंब्यांत येतात; व लांब सरी पाणी सोडण्यास उपयोगी पडते.
गुजराथ :- दक्षिण गुजराथेत पेरें न करतां सबंध ऊंस लावितात. तिकडे ऊंस पेरण्यासाठीं मोठा जड नांगर असतो. त्याला पेरें टाकण्यासाठीं एक भोंक पाडून व्यवस्था केलेली असते. हा चालत असतांना नांगरावर एक मनुष्य बसून पेरें आंत खुपसतो. व तें तासांत सुमारें सहा इंच खोल गाडलें जातें ही पद्धत चांगली नाहीं. हींत उंसाचे पुष्कळ डोळे खराब होतात. व ऊंसच जर खराब असला तर निवडून काढितां येत नाहीं. लागणीनंतर जमीन सपाट करितात. व पाणी सोडून ती भिजवितात. जमीन वाळली म्हणजे नांगरानें वरील माती सुमारें तीन इंच भुसभुशीत करितात. यानें तण मरतें. ऊंस उगवून वर आला म्हणजे नांगर घालून सर्या व पाणी देण्याकरितां वाफे करितात. दुसरें पाणी दीड ते दोन महिन्यांनीं देतात. इकडे उंसाला पाणी एकंदर १२ ते १५ वेळां देतात.
कोंकणांतील लागण :- वेंगुर्ले या प्रांतांत कोल्हे, कुत्रे, रानडुकरें, गुरें वगैरे जनावरांपासून उंसाचा बचाव व्हावा म्हणून सुमारें चार फूट उंचीच्या मातीच्या भिंती तात्पुरत्या घालितात, व त्या पडूं नयेत म्हणून वर नारळाचे झांप घालितात बहुतकरून गांवांतील लोक, (ज्यांना ऊंस लावायचा असेल ते) सर्व मिळून एका ठिकाणींच मळा करितात. तिकडे उंसाची एकच जात मळ्यांत आढळून येत नाहीं. बहुतकरून दोन तीन जातींची भेसळ असते. पांढरा कबीर्या, पांढरा, पटेरा व तांबडा या चार जातींचे ऊंस एक ठिकाणीं आढळतात. ज्या जमिनींत ऊंस करणें असेल ती जमीन पूर्वी पाणी देऊन ओलवितात. दोन तीन दिवसांनीं ती वाळली म्हणजे उभी आडवी पांच ते सात वेळ नांगरितात. ढेकळें फोडितात व सपाट करून नंतर पाणी जाण्याकरितां दांड राखून मगर्या तयार करितात. या मगर्या कुदळीनें खणून करितात. प्रत्येक मागरी सुमारें एक फूट खोल व नऊ इंच रूंद असते. दोन मगरींमध्यें दोन फूट अंतर असतें. या मगरींत कित्येक ठिकाणीं राब टाकून भाजवण करितात. तशां सोय नसल्यास घरांतील सांठवलेली राख प्रत्येक मगरींत टाकितात व पाणी सोडितात व कुदळीनें हालवून चिखल करितात. व आक्टोबर महिन्यांत वाढें (बियाणें) मगरींत टाकून आंत दाबतात. दुसरें पाणी दुसर्या दिवशीं व तिसरें चवथ्या दिवशीं देतात व पुढें दर चार दिवसांनीं पाणी द्यावें लागतें. एक मुनष्य व एक मुलगा (पाणी देण्याकरितां) रोज आठ तास काम करून ओळीनें (८ ते १० फूट खोल विहीर असते) चार गुंठे जमीन भिजवितो. पीक एक महिन्याचें झालें म्हणजे ताजें शेण पाण्यांत कालवून तें पाणी मगरींत सोडितात. तिसर्या महिन्यांत याप्रमाणेंच पुन्हां एक वेळ शेणाचें पाणी देतात. सुमारें साडे चार महिन्याचें पीक झालें म्हणजे प्रत्येक खोडास ओंजळभर कुजलेलें शेणखत देतात. पहिली खुरपणी पीक दोन महिन्यांचें झालें म्हणजे करितात. याप्रमाणेंच आणखी एक दोन खुरपण्या देतात. जसजसें पीक वाढेल तसतशी मगर्याच्या कडेला ठेवलेल्या मातीची सुमारें चार वेळ उंसाला भर देतात. शेवटची भरणी पीक सात आठ महिन्यांचें झालें म्हणजे देतात. ऊंस तीन महिन्यांचा झाला म्हणजे पुढें उंसाचीं पानें जसजशीं वाळतील तसतशीं काढून तीं मगर्यांत टाकितात. तीं कुजलीं म्हणजे खत होतें. हीं पानें काढलीं म्हणजे हवा मळ्यांत खेळती राहून उंसाला सारखा रंग येऊन लवकर तयार होतो.
रत्नागिरी जिल्ह्यांत मसुरें, बांदिवडें व वेरळ या ठिकाणीं उंसाची लागवड बरीच आहे. बहुतेक ऊंस खाण्यांतच खपतो. बाकी राहिलेल्याचा गूळ तयार करितात. मालवण वेंगुर्ल्याकडील कठीण सालीचा तांबडा ऊंस बहुतेक सर्व मचव्यांतून मुंबईस विक्रीकरितां येतो. दापोलीच्या (रत्नगिरी जिल्हा) बाजूस बारीक कठीण उंसाची लागण फेब्रुवारी महिन्यांत करितात.
खो ड वा :- गुजराथ व कोंकणांत खोडवा घेण्याची बहुतेक चाल नाहीं. सिंध प्रांतांत एक दोन वेळ खोडवा घेतात. कर्नाटकांत एक खोडवा घेतात. कालव्याखालीं एक वेळ अगर अधिक वेळहि घेतात. परंतु जमीन नवी असली म्हणजे एकापेक्षां अधिक वर्षेपर्यंत खोडवे घेतां येतात. मागून शेतांत हरळी, लव्हाळा वगैरे तणें इतकीं माजतात कीं, तीं नांगरटीखेरीज काढणें शक्य होत नाहीं. पुढें पुढें तर जमीन नेहमीं पाणी पिऊन बिघडते.
खोडव्यांत फायदा अनेक तर्हांनीं होतो. तो असा:- (१) मेहनत मशागत बहुतकरून नाहीं. (२) बियाणाचा खर्च वांचतो. (३) खत सुमारें दोन तृतीयांश पुरतें. (४) पाणी कमी लागतें. (५) गूळ गाळण्यास लवकर येऊन तोहि उत्तम प्रकारचा होतो. ''मांजरी फार्म'' वरील सन १८९५।९६ सालच्या अहवालांत सोनखत दिलेल्या नव्या उंसाच्या खोडव्याचे आंकडे खालीं दिल्याप्रमाणें आहेत:- नवा ऊंस, वजन पौं ८०७२० व गूळ पौं. १०४५५; खोडवा वजन पौं. ५५४०५ व गूळ पौं. ७४१०.
सं यु क्त प्रां तां ती ल उं सा ची ला ग व ड :- या प्रातांत मुख्यत्वेंकरून तीन जाती आढळतात. ऊख (तांबडा व पांढरा), गन्ना व पाऊंड्या. या प्रांतात उख जातीची विशेष लागवड असून, या उंसापासून गूळ व साखर तयार करितात. ऊख ही जात कडक व बारीक असल्यामुळें तिचा खाण्याकडे फारसा उपयोग होत नाहीं. याची लागवड कमी खर्चांत होते. ऊंस टणक असल्यामुळें रोगराई हवापाणी वगैरेंपासून फारशी बाधा होत नाहीं.
गन्ना :- या जातीचे ऊंस ऊखपेक्षां जाड असून ते उंच वाढतात. याची लागवड विशेषेंकरून मीरत, रोहिलखंड गोरखपूर आणि बनारस या भागांत करितात. इतर ठिकाणीं याची जुजबी लागवड खाण्याकरितां करितात गन्ना ऊंस पोटीं लवकर रंगतो व या पिकाला कोल्हे व रानडुकरांपासून फार त्रास होतो, तसा वरील ऊख जातीला होत नाहीं.
पाऊंड्या याची लागवड फार खर्चाची असून ती सहाराणपूरजवळ आढळते इतर ठिकाणीं फक्त खाण्याकरितांच ऊंस करितात.
ऊ ख व ग न्ना जा तीं ची ला ग व ड :- जमीन १५-२० वेळां नांगरितात, दर नांगरटीनंतर फळी फिरवितात. दर एकरीं २०० ते ३०० मण शेणखत देतात. पूर्वेकडील कांहीं भागांत मेंढ् बसवितात. पूर्वभागांत उंसाचे तुकडे करून लागण करितात, पंरतु पश्चिमभागांत फक्त वाढेंच लावण्याची चाल आहे. ऊंस उगवण्यास पुरेशी ओल नसल्यास पूर्वी पाणी देतात. पूर्वभागांत ऊंस लावणीच्या वेळीं तीन नांगरांचा उपयोग करितात. पहिला नांगर जमीन भुसभुशीत करीत जातो. त्याच्या पाठोपाठ दुसरा नांगर फाळाला गवताची पेंढीं अगर दोन बाजूला दोन शेणाच्या गोवर्या बाधून रूंद सरी पाडीत जातो. पश्चिम भागांत फाळाला सरी पाडण्यासाठीं माती लोटणारा लांकडी तक्ता लावितात, सरींत एकेक फुटाच्या अंतरानें बियाणें ठेविल्यावर तिसरा नांगर शेजारीं तास पाडून बियाणें झांकित जातो. दोन सरींत सुमारें एक फूट अंतर असतें. दर एकरीं सुमारें ४००० ते ५००० उंसाचें बियाणें लागतें. उंसाची लागण फेब्रुवारी ते एप्रिल पावेतों चालते, पण जास्त लागण मार्च महिन्यांत होते. उंसाला लागणीपूर्वी एक पाणी व नंतर हंगामाप्रमाणें तीन ते सात पाणी देतात. एकंदर ७ ते १४ कोळपण्या व खुरपण्या द्याव्या लागतात. पिकाच्या संरक्षणाकरितां सभोंवार कुंपण किंवा चिखल्याच्या भिंती घालितात. पश्चिम भागांत कांहीं कांहीं ठिकाणीं अंतर्वेदींत खोडवा ठेवण्याची वहिवाट आहे.
दर एकरीं सरासरी खर्च (हाडीच्या पुस्तकावरून).
रू. | आ. | पै. | |
१५ नांगरण्या | १५ | ० | ० |
बेणें | ११ | ० | ० |
लागण | २ | ८ | ० |
७ खुरपण्या व कोळपण्या | ५ | ० | ० |
४ पाणी [विहिरीनें] | १६ | ० | ० |
खत | ६ | ० | ० |
गूळ तयार करणें | ३६ | ० | ० |
शेताचा खंड | १२ | ० | ० |
एकूण रूपये | १०३ | ८ |
उत्पन्न ३५ मण.
मध्यप्रांत :- या प्रांतांत सुमारें ३० वर्षापूर्वीं ४२५५१ एकर उंसाखालीं होते. सन १९१४ सालीं हें क्षेत्र अनेक कारणामुळें १७३९२ एकरांवर गेलेलें आहे. आतां हें क्षेत्र पाटाच्या पाण्यामुळें वाढण्याचा संभव आहे. इकडे कळक्या ऊंसाची जास्त लागवड करतात. त्याचा ३० मण गूळ होतो व सुमारें २०० रूपयापावेतों किंमत येते.
तळ्यावरील खर्च
रू. | आ. | पै. | |
पाणपट्टी | ७ | ० | ० |
खंड व इतर मजूरी | १२० | ० | ० |
ऊंस कापणें व सोलणें | ९ | ० | ० |
एकूण रूपये | १३६ | ० | ० |
या दरानें एक मण उंसास ६.९ आणि पडतात गूळ तयार केल्यास दर एकरीं रूपये १६२ खर्च येतो व गुळाची किंमत २०० रूपये येते, म्हणजे सुमारें दर एकरीं ३० रूपये फायदा राहतो.
मांजरी (जिल्हा पुणें) येथील कालव्याखालील पीकाचें सरासरी उत्पन्न.
एकरीं उत्पन्न पौंड | ||
दर एकरी ऊंस | २५००० | |
उसाचें वजन | ८८००० | |
वाढें | १२००० | |
पाचट | १२००० | |
पावर क्रशरनें काढलेला रस | ६२००० | |
+ गूळ | ११००० | |
खर्च रूपये | ||
खत किंमत | २०० | |
इतर खर्च | २२५ | |
गूळ तयार करणें | ७५ | |
एकंदर खर्च | ५०० | |
गुळाची किंमत रूपये | ७०० | |
निव्वळ फायदा रूपये | २०० |
+ विहिरीखालीं सरासरी ६०००-७००० पौंड गूळ पडतो. फायदा गुळाच्या भावावर अवलंबून असतो तथापि दर एकरीं वरीलप्रामणें शेताची खतमशागत केल्यास १५० ते २०० रूपये फायदा व्हावा असा अंदाज आहे.
कि डी व रो ग:- उंसाला अनेक तर्हेचे रोग होतात. त्यांपैकीं मर, उधई, ऊंस रंगणें व काजळ्या हे मुख्य होत. मर म्हणजे ऊंस अगदीं लहान असतांना कोंबाचे गाभे जळणें होय. या किडीचा अंमल भर उन्हाळ्यांत फार असतो. याकरितां जानेवारी महिन्यांत लागण करून एप्रिल-मे महिन्यांत जर ऊंस जोरांत असला तर मर फारशी लागत नाहीं. खोड किड्यावर उपाय-उंस जानेवारींत लावणें, पृष्ठ जमीन मऊ व मोकळी राखणें, सल्फेट व पेंड लवकर देऊन पीक जोमांत ठेवणें, उन्हाळ्यांत पाणी सावकाश जिरवणीचें देऊन ३ इंच पृष्ठ जमीनींत मुटका वळेल इतकी ओल सतत राखणें, जमीनीच्या खालीं २ इंच किंवा बेण्याच्या टिपरापर्यंत कोंब कापून मर काढणें व शेतांत दिवा ठेऊन फुलपाखरें धरणें हे आहेत. ऊंस रंगणें म्हणजे ऊंस पोटांत तांबडा होऊन आंतील गाभा भेंडासारखा होणें. याला उपाय उंसाच्या जमीनींत पाण्याच्या निचर्याची सोय करणें हा आहे व लागण बिनरोगी बियाची करावी. काजळ्या हा रोग फार करून अगदीं बारीक उंसाच्या जातींत आढळतो. यासंबंधीं पूर्ण माहिती पिकांच्या रोगांवर उपाय या सदराखालीं पहावीं:-
उं सा चें पृ थ क्क र ण:- हें शेंकडा प्रमाणांत पुढें दिलें आहे:-
उसांतील | नायट्रोजन | फास्फोरिक | पोटाश पाला |
(माल) | (नत्र) | (स्फुराम्ल) | (शकर्बित) |
पाचट | ४५५ | .१२४ | .८७०० |
वाढें | .२०१ | .१०७ | .०१८ |
ऊंस | .०४५ | .०५० | .१६० |
दर एकरीं उंसाच्या पिकाला खर्च होणार्या पोषक द्रव्याचा आढावा---(आंकडे पौंडांचे)
नायट्रोजन | फास्फोरिक | पोटॅश | ||
माल | रिअ अॅ. | पा. कर्बित. | ||
साळलेले ऊंस | ९८३०० | ४४.२३ | ४९.१५ | १५७.३० |
हिरवीं वाढें | १४८४० | २९.८३ | १५.८८ | ९१.७१ |
वाळलेलें पाचट | १२५७० | ५७.१९ | १५.५८ | १०९.३५ |
एकूण | १२५७१० | १३१.२५ | ८०.६१ | ३५८.३६ |
सा ख र :- करण्याची पद्धत पूर्वीपासून सर्व हिंदुस्थानभर अवगत होती. ईस्ट इंडिया कंपनीच्या वेळीं बंगाल्यांतून साखर परदेशीं जात असें. पुढें वेस्ट इंडिजमध्यें साखर होऊं लागल्यामुळें बंगाल्यांतील साखरेवर इतका कर बसविला कीं, ती पाठविणें तोट्याचें होऊं लागलें. पुढें इ. स. १८४५ सालीं ग्रेटब्रिटनमध्यें गुळापासून साखर करण्याच्या कारखान्यासाठीं हिंदुस्थानांतील गुळाला मागणी सुरू झाली. हा गूळ मद्रास इलाख्यांतून जात असे. नंतर युरोपियन पद्धतीनें हिंदुस्थानांत साखर करण्याचे कारखाने निघाले या योगानें कांहीं वर्षेपर्यंत हिंदुस्थानांत साखर येणें बंद झालें. परंतु पुढें हिंदुस्थानांत साखरेची आयात वाढून निर्गत अगदीं कमी पडली. पूर्वी साखरेची किंमत फार असल्यामुळें तिचा उपयोग फक्त औषधपाणी व चैनीचे पदार्थ यांकडेसच होत असे. परंतु अठराव्या शतकापासून चहा, कॉफी यांच फैलाव फार जोरानें होऊन साखरेची अवश्य पदार्थांमध्यें गणना होऊं लागली. नेपोलियननें इंग्रजावर साखरेसाठीं अवलंबून रहावें लागूं नये म्हणून देश्य वनस्पतींपासून साखर काढण्यास उत्तेजन दिलें त्याचें फळ बीटपासून साखर काढण्याची कृति होय. इ. स. १८०१ सालीं जर्मनी दिशांत बीट नांवाच्या मुळांपासून साखर करण्याचा कारखाना निघाला. तेव्हांपासून ही साखर व उंसाची साखर यांमध्यें चढाओढ लागून जर्मनी, फ्रान्स, अमेरिका, जाव्हा वगैरे ठिकाणीं रसायनशास्त्र व यंत्रसामुग्री या दोहोंच्या साहाय्यानें साखरेचे कारखाने एवढे प्रचंड चालले आहेत कीं, पूर्वी ज्या हिंदुस्थानांतून इतर देशांस साखरेचा पुरवठा होत होता त्या हिंदुस्थानास स्वत:च्या खर्चास लागणार्या साखरेकरितां दुसर्या देशांतील कारखान्यांकडे धांव घ्यावी लागत आहे. सुमारें २५ वर्षी पूर्वी हिंदुस्थानांत साखरेची आयात दरवर्षी सत्तर हजार टन होती. ती सन १९१८-१९ सालीं आठ लक्ष टन असून तिची किंमत पंधरा कोटी रूपये होती. ती मुख्यत्वेंकरून जावांतून येत असून जपानचा त्या व्यापारांत बराच भाग आहे. उत्पन्न व आयात यांचा विचार केला म्हणजे हिंदुस्थान इतका गूळ होत असून सुद्धा तो न पुरून साखरेची आयात वाढत्या प्रमाणावर आहे. हिंदुस्थानांत पूर्वी साखरेचे बरेच कारखाने होते. इ. स. १९१५ सालीं २६ मोठ्या प्रमाणावर चालणारे होते. त्यांपैकीं ७ बंगल्यांत असून मद्रास इलाख्यांत ५; संयुक्त प्रांतांत ९; बिहार व ओरिसांत १, नेटिव संस्थानांत ३, व पंजाबांत एक. शिवाय लहान लहान कारखाने पुष्कळ होते प्रत्येक मोठ्या कारखान्यांत कमींत कमी ५० माणसें दर काम करीत होतीं (हिंदुस्थानांतील शेतकीचा प्रोग्रेस रिपोर्ट. सन १९१६-१७).
मद्रास इलाख्यांत पारी आणि कंपनीचे नेलीकूपम, सामल, कोटा, व पालघाट येथें साखर तयार करण्याचे कारखाने चालू आहेत व ही कंपनीं पेपरमिंटच्या वड्या वगैरे मिठाई तयार करते. संयुक्त प्रांतांत रोझा व तामकोई हे साखरेचे मुख्य कारखानें आहेत. हिंदुस्थानांतील कांहीं कारखान्यांत गूळ विकत घेऊन साखर तयार करतात. कांहीं कारखान्यांत रम वगैरे मद्यें तयार करण्याची परवानगी आहे, कांहींत सोडावॉटरला लागणारा कर्बद्विप्राणिद वायु तयार करतात. ब्रह्मदेशांत जाड्या उंसाची लागवड चांगली होते. व तेथें क्षेत्रहि मुबलक असल्यामुळें तिकडे साखरेचे पुष्कळ कारखाने निघू शकतात. तंगू जिल्ह्यांत रोज चार टन पांढरी साखर व दोन टन गूळ तयार होईल असा कारखाना आहे. आसामांत लवकरच साखरेचे खाजगी कारखाने निघतील.
संयुक्त प्रांत, आसाम, बिहार, ब्रह्मदेश व म्हैसूर, व मुंबई इलाख्याच्या कांहीं भागांत साखरेचे कारखाने मोठ्या प्रमाणावर निघणें शक्य दिसत आहे. व कांहीं बर्याच ठिकाणीं चालूहि झाले आहेत. नुकताच अहमदनगरजवळ बेलापूर कंपनीचा कारखाना निघाला आहे. सध्यां त्यांत गूळ तयार होत असून लवकरच साखर तयार करण्याची व्यवस्था होईल असें वाटतें. कालव्याच्या पाण्यावर उंसाची लागवड मोठ्या प्रमाणावर करून त्याला जोडून हा कारखाना निघाला आहे याखेरिज बारामती येथें उंसापासून एकदम साखर करण्याचा कारखाना निघाला आहे. गणदेवी येथेहि साखर तयार होते व वर्तकी साखरहि थोड्याफार प्रमाणांत बाजारांत येते. यांचा कारखाना पुण्यानजीक फुरसुंगी येथें हनुमान शुगर फॅक्टरी म्हणून प्रसिद्ध आहे. उंसापासून व त्याचप्रमाणें मद्रासेंत व बंगाल्यांत ताडीच्या रसापासून गूळ व साखर तयार करितात. सन १८५० पर्यंत सर्व साखर उंसापासूनच करीत असत. परंतु हल्लीं सरासरीनें १/२ साखर सहा महिने लागत असून उंसाला नऊ महिने लागतात. उंसाच्या वीस टनांत जितकी साखर सांपडते तितकीच साखर पंधरा टन बीटच्या कंदांत सांपडते. बीट मुळांचें पीक उंसानंतर थोडें खत देऊन अगर पूर्वीच्या तेवढ्या खतावरहि सहज घेतां येतें. पेशावर जिल्ह्यांत शुगरबीटचें पीक मार्च ते जूनपर्यंत करितां येतें व तेथें १५ नोव्हेंबरपासून १५ फेब्रुवारीपावेतों ऊंस मिळतो. अशी परिस्थिति असल्यामुळें तेथें साखरेच्या कारखान्यास सहा महिने चालण्यास पुरेसा माल मिळूं शकेल असा अंदाज आहे. पंजाब प्रांतांत काश्मीर येथें तयार झालेल्या बियांपासून लायलपूर, हांसी व गुरूदासपूर येथें शुगरबीटची लागवड करण्यांत आली व ती चांगली साधली. ही लागवड पंजाबांत वाढल्यास लागवडीसाठीं बियांचा पुरवठा काश्मीष्मीरांतून होऊं शकेल.
क्षे त्र:- हिंदुस्थानांतील उंसाखालीं असलेल्या क्षेत्रापैकीं शेंकडा नव्वद हिस्से क्षेत्र उत्तर हिंदुस्थानांत आहे. याठिकाणीं बहुतेक कठीण व बारीक जातीच्या उंसाची लागवड करतात. उंसात साखरेचें प्रमाण शेंकडा ९ ते १० भाग पर्यंत असतें. अशा जातीच्या उंसांत (जावांत) साखरेचें प्रमाण शेंकडा बारा ते तेरा भाग असतें, व दर एकरी चाळीस टन पावेतों ऊंस पिकतो; तोच संयुक्त प्रांतांत वीस टन येतो, व पंजाबांत अवघें दर एकरीं पंधरा टनाचें उत्पन्न होतें. मुंबई इलाख्यांत उसांत शेंकडा साखरेचें प्रमाण १५ असून उत्पन्न सरासरी ४० टन येतें. जावांत एक टन साखर होण्याला दहा टन ऊंस लागतो व हिंदुस्थानांत १३.८ टन लागतो.
सा ख रे ची कृ ति.- गुळाऐवजीं साखर करण्याची असली म्हणजे काहींल जराशी लवकर उतरावी लागते. त्यावेळीं काहिलींतील मदनाचें उष्णतामान ११०० अंश सेन्टीग्रेंड असतें. या घट्ट झालेल्या रसास राब म्हणतात. ही राब पातळ असतांच ती मडक्यांत भरितात. कित्येक ठिकाणीं हीं गाडगीं घडवंचीवर ठेवितात व त्यांच्या बुडाला बारीक भोंकें पाडून खालीं पडणार्या काकबीकरितां कुंड्या किंवा तरई ठेवितात. मडक्याच्या तोंडावर सुमारें दोन इंच जाडीचा शेवाळाचा थर बसवितात. व वरून पाणी मारितात ती शेवाळ तीन चार दिवसांनीं काढितात. दरम्यान रस खालील कुंडींत पडतो तो काकवीसारखा असतो. व वरील गाडग्यांत शुभ्र साखर तयार होते. ही साखर खुरप्यानें खरडून काढितात व वाळत ठेवितात. वरील थर जास्त शुभ्र असतो. व खालील थर जरासा तांबूस रंगावर असतो.
कित्येक ठिकाणी खोल वाफे करून किंवा वाफ्यांबद्दल मोठमोठ्या कळकाच्या कांबट्यांच्या दुरड्या करून त्यांत राब भरतात यांतील रस किंवा कांकवी धरण्याकरितां मोर्या करून त्या कुंडींत सोडलेल्या असतात. दुरड्यांत किंवा वाफ्यांत शेवाळ घालून पाणी मारतात. दरदोन दिवसांनीं शेवाळ काढून साखरेचा जेवढा थर पांढरा झाला असेल तेवढा काढून घेतात व पुन्हा शेवाळ घालून पाणी मारून ठेवितात; याप्रमाणें सर्व राबाची साखर होईपर्यंत ही कृती चालू असते. याला सुमारें एक महिना लागतो. या साखरेस उत्तर हिंदुस्थानांत खांड साखर म्हणतात.
सा ख र नि घ णा रीं झा डें:- साखर निघणार्या जातींपैकीं कोंकणपट्टींत चार तर्हेचीं झाडें आढळून येतात. पहिलें माड, दुसरें पंखे करितात ती ताडाची जात, तिसरें खजुरी अगर रानखारका व चवथें सुरमाड. सुमारें पाऊण लक्ष एकर जमीनींत ताड व खजुराची लागवड आहे. माडाची चांगली जपणूक केल्यास त्याचे नारळ घेणें फायद्याचें आहे सुरमाड फारच जुजबी सांपडतात. ताड व खजुरी यांचीं झाडें ठाणें व कुलाबा जिल्ह्यांत मुबलक आहेत. खजुरींचीं झाडें उंबरगांव पेटा, साष्टी व सर्व तालुक्याभर समुद्रकिनारीं अजमासें तीन लक्ष झाडें आहेत. हीं झाडें ठाणें व कुलाबा जिल्ह्यांत टेंकड्यावरहि आढळतात. यांपैकीं शेंकडा दहा झाडांचा ताडीसाठीं उपयोग करितात. बाकी सर्व झाडें बहुतेंक व्यर्थ आहेत. तथापि त्यांच्या पानापासून थोडेंसें उत्पन्न होतें. या झाडांपासून बंगाल, मद्रास व ब्रह्मदेश या ठिकाणीं गूळ बनवितात. या झाडांच्या रसापासून गूळ करण्याचा मक्ता गेल्या तीन वर्षे मि. सोराबजी बी. पटेल याला दिला होता, व तो बहुतेक फलद्रूप झाला आहे. शेतकीं खात्यानें उंबरगांव पेट्यांत ताडगांव येथें प्रयोग केले. व त्याकरितां बंगल्यांतून माहितगार माणूस आणलेला आहे. खजुरी व ताडापासून केलेल्या गुळास उंसाच्या गुळापेक्षां किंचीत कमी भाव येतो; तरी तो गूळहि खपतो. दर वर्षी एका झाडापासून गूळ करण्यास एक रूपया खर्च येतो, व दोन रूपये उत्पन्न होतें.
साखर हा गोड पदार्थ आहे म्हणून तो सर्वांस आवडतो. दरमाणशीं वार्षिक खपाचे आंकडे स्थळवार खालीं दिले आहेत.
इंग्लड | ८६ पौंड |
यु. स्टे. (अमेरिका) | ६४ '' |
डेनमार्क व स्वित्झर्लंड | ४५ '' |
जर्मनी, फ्रान्स, हॅलंड | ३० '' |
हिंदुस्थान. | २२ '' |
इटली, ग्रीस, टर्की | ७ '' |
साखरेसंबंधीं विस्तृत विवेचन साखर या स्वतंत्र लेखांत दिले आहे. (साखर पहा) [रा. ब. ग. के. केळकर].