विभाग नववा : ई-अंशुमान
ऋग्वेद :- चारहि वेदांत ऋग्वेद हा मोठा व त्यांतील अगदीं प्राचीन असा ग्रंथ आहे. या वेदाचीं आठ अष्टकें आहेत. प्रत्येक अष्टकांत आठ आठ अध्याय असतात. मिळून एकंदर अध्याय ६४ आहेत. अध्यायांच्या पोटभागास वर्ग म्हणतात. वर्गांत ऋचा असतात. हे वर्ग सुमारे दोन हजार आहेत. मंत्रद्रष्टे ऋषी यांनीं रचिलेले मंत्र निरनिराळे आहेत, ऋषींवरून ऋग्वेदाचे एकंदर दहा भाग केले आहेत. या भागांस मंडल असें नांव आहे. प्रत्येक मंडलांत अनुवाक असतात. अनुवाकांच्या पोटांत सूक्तें, व सूक्तांत ऋचा असे ऋग्वेदाचे विभाग केले आहेत. मंडलें दहा आहेत. अनुवाक ८५. सूक्तें (११ वालखिल्यें धरून) १०२८ आहेत. एकंदर ऋचा १०५८०॥ आहेत. पदें १५३८२६, आणि अक्षरें ४३२००० आहेत गृत्समद, विश्वमित्र, वामदेव, अत्रि, भरद्वाज आणि वसिष्ठ हे अनुक्रमें २ ते ७ मंडलांचे ऋषी आहेत. या ऋषींनां माध्यम' म्हणतात त्यांच्या मंडलांत विशेष रचनापद्धति दिसून येते. स्वत:च्या गोत्राकरितांच त्या ऋषींनीं आपापले मंत्र निरनिराळे केले असावेत. यज्ञांत पशूच्या अंगयागापूर्वी 'आप्री' नावांचे मंत्र म्हणवयाचे असतात, ते प्रत्येक ऋषीचे वेगवेगळे आहेत. हेच मंत्र त्यांनीं म्हणावेत, दुसर्या ऋषींचे मंत्र म्हणूं नयेत असें ऐतरेय ब्राह्मणांत (२-४) सांगितलें आहे. या मंडलांत पहिल्यांदा अग्नीविषयीं व नंतर इंद्रादिकांच्या ऋचा येतात. ह्या व इतर कारणांवरून हीं मंडलें अगोदर रचलीं असावींत, असा अजमास आहे. पहिल्या मंडलांत अनेक ऋषींचीं सूक्तें आहेत. त्यांत कण्व व कण्वगोत्रज ऋषींचीं सूक्तें बरींच आहेत. या ऋषींस शतचीं म्हणतात. कारण त्यांनीं शंभर शंभर ऋचा केल्या आहेत. आठव्या मंडलास प्रगाथ म्हणतात. यांतहि कण्वऋषीचीं सूक्तें बरींच आहेत. या सूक्तांत आणि पहिल्या मंडलांतील कण्वांच्या सूक्तांत बरेंच साम्य आहे. नववें मंडल, पहिलीं आठ झाल्यावर झालें असावें. यांत फक्त पवमानसोमाचें वर्णन आहे. वर सांगितलेल्या ऋषींनीं केलेलीं पवमानसूक्तें यांतच ग्रथित केलीं आहेत. दहावें मंडल शेवटीं झालें. यांत क्षुद्रसूक्तें व महासूक्तें आहेत. यांत पूर्वीच्या मंडलांत येणार्या विषयांपेक्षां निराळे विषय आले आहेत. रूद्र, अग्नि आणि विशेषत: विश्वदेव, मन्यु, श्रद्धा इत्यादि देवतांचें वर्णत यांत आहे. शिवाय विवाह, र्और्ध्वदेहिककर्म, सृष्टीची उत्पत्ति, तत्त्वज्ञान आणि वशीकरण वगैरेचे मंत्र इ. नवीन विषय या मंडलांत आले आहेत. अनेक देवता आहेत, ही कल्पना कमी कमी होत जाऊन एकच देव आहे ही भावना समाजांत जागृत झाली असावी असें या दहाव्या मंडलांत दिसतें.
ऋग्वेद हा हौत्रवेद असल्यामुळें होतृऋत्विजानें म्हणावयाचे मंत्र यांत आले आहेत. देवतांची स्तुति व त्यांचें महात्म्य, वैभव, तेजस्वीपणा, औदार्य, शहाणपणा इत्यादि गुणांचें वर्णन यांत आलेलें आहे. तसेंच आम्हास गोधन द्या, संतति द्या, आमची भरभराट होऊं द्या, युद्धांत आम्हांस जय मिळो, आमच्या शत्रूंचें निसंतान होवो, आमचें वैभव वाढो, आणि आम्ही दीर्घायु होवो ! अशा प्रकारच्या प्रार्थना या वेदांत आल्या आहेत.
ऋग्वेदांत ३३ देवाचें वर्णन आलेलें आहे. परंतु फक्त सुमारें २० देवांचें वर्णन ३ किंवा तीनहून अधिक सुक्तांत झालेलें आढळतें. पर्जन्य, वात आणि यम यांचीं प्रत्येकाचीं फक्त तीनच सूक्तें आहेत. इंद्राचीं सूक्तें २५० आहेत. अग्नि आणि सोम यांची सूक्तें अनुक्रमें सुमारें २०० ते १०० आहेत. इंद्र, अग्नि (मित्र व मातरिश्वन्) सोम, सूर्य यांचीं पांच स्वरूपें मित्र, अर्यमा, विष्णु, सविता आणि पूषा. अश्विनीकुमार, उषस्, वरूण, रूद्र, मरूत्, वायु, पर्जन्य, यम, प्रजापति, द्यौ [आकाश] इत्यादि देवतांच्या पराक्रमादिगुणांचें वर्णन, त्यांची स्तुती प्रार्थना व अशा अनेक गोष्टी ऋग्वेदांत आल्या आहेत.
ऋग्वेदाविषयी बरेंचसें विस्तृत विवेचन वेदविद्या व बुद्धपूर्वजग या प्रस्तावनाखंडांतील दुसर्या व तिसर्या विभागांत केलें आहे. त्या विवेचनाची येथें पुनरूक्ति करण्याचें कारण नाहीं परंतु उल्लेख करणें अवश्य आहे. वेदविद्या या विभागांत वेदवाङ्मयांत ऋग्वेदाचें स्थान, ऋग्वेद संहितेची रचना, ऋग्वेदांतील सूक्तांच्या कालासंबंधीं भाषाविषयक व छंदविषयक, भौगोलिकज्ञानविषयक व सामाजिक गोष्टींसंबंधीं, उदाहरणार्थ पशुपालवृत्ति, शास्त्रें, कला वगैरेची प्रगति, स्त्रियांचा दर्जा, तात्कालीन लोकांची नीतिमत्ता, ग्रंथभाषेची दुर्बोधता वगैर गोष्टींवरून उपलब्ध होणारा पुरावा व त्यावरून निघणारीं अनुमानें, ऋग्वेदपुराणकथाभ्यासास महत्त्व, त्यांतील पुराणकथांचा उगम व वाढ, असुर व दासांसंबंधीं कल्पना, ऋग्वेदांतील यम व अवेस्तांतील यिम यांचें साम्य, ऋग्वेदांत देवता व भक्त यांमध्यें दिसून येणारा संबंध, वरूण, इंद्र, अग्नि, उषा, वायु वगैरे देवतांच्या स्तुतिपर सूक्तें, यज्ञविधिविषयक सूक्तें, आप्रीसूक्तें, संस्कारसूक्तें आध्यात्मिक सूक्तें, आख्यानसूक्तें, मांत्रिकीसूक्तें, लौकिक सूक्तें दानस्तुतिसूक्तें, कूटसूक्तें, वगैरे ऋग्वेदसंहितेंत अंतर्भूत झालेले निरनिराळे विषय यांचें विवेचन प्रकरण २ मध्यें केलें आहे.
यानंतर नवव्या प्रकरणामध्यें वेदकालाचा निर्णय करतांना ऋग्वेदसंहितेची रचना इतर वाङ्मयाशीं सापेक्षतेनें केव्हां झाली असावी याविषयीं उहापोह केला आहे व मॅक्समुल्लरची याचें ज्योति:शास्त्रमूलक विवेचन, ओल्ढेनबर्गचें संस्कृतिप्रगतीच्या गतीवर बसविलेलें अनुमान, व लो. टिळकांचें संपातचलनावरून ज्योति:शास्त्राधारें काढलेलें अनुमान हीं दिलीं आहेत. वरील गोष्टीस व्य. बा. केतकर यांनीं तैत्तिरीय ब्राह्मणांतील उतार्यावरून दिलेली पुष्टि परिशिष्ट ‘अ’ मध्यें दिली आहे.
वैदिक वाङ्मय, बाह्मणजाति व यज्ञसंस्था या प्रकरणांतहि संहितीकरणाच्या व यज्ञसंस्थेच्या व त्याबरोबरच ब्राह्मण जातीच्या विकासाचा परस्पर संबंध कसा होता, ऋग्वेदांत तीन निरनिराळीं संस्करणें अथवा संहितीकरणें कशीं स्पष्ट दिसतात, ऋग्वेदी ब्राह्मणांच्या शाखा कोणत्या व कोठें आहेत, अथर्ववेदाचें त्रयीपासून पृथक्करण कसें झालें, ऋग्वेदीय सूक्तांचा उपयोग करणारा मुख्य ऋत्विज होता याचें स्थान निश्चित व पृथक कसें झालें, होता व सामक यांचा संबंध, व समाजांतील चार वर्णांची उत्पत्ति वगैरे विस्तृत विवेचन आढळेल.
यानंतर दैवतेतिहास या बाराव्या प्रकरणांत ऋग्वेदांतील देवतांसंबंधी यास्क व सायण यांमधील मतभेद, व ऋग्वेदांत आढळणार्या ऋग्वेद व अथर्ववेद यांत सामान्य असणार्या देवतांची यादी दिली आहे. नंतर वैदिक दैवतांविषयीं सामान्य विवेचन करून वेदांतील देवतांचें इतर देशांतील कोणत्या देवतांशीं साम्य दिसून येतें त्याची तुलना केली आहे. यापुढें इन्द्र देवतेचें स्वरूप, तिचे शत्रू असुर, इन्द्राचा त्रित आदित्य वगैरेशीं असलेला संबंध, इन्द्र व मरूत, इन्द्र व सोम, इंद्र व वायु, इंद्र व बृहस्पति, इंद्रव गंधर्व, इंद्र व अग्नि, इंद्र व विष्णु, इंद्र व त्वष्टा, इंद्र व ऋभू, इंद्र व वसू वगैरे एकत्र आढळणारीं देवतायुग्में, इंद्रानें जगदुत्पत्तीसाठीं केलेले प्रयत्न वगैरे या प्रमुख देवतेचें वर्णन सविस्तर केलें आहे. यानंतर इतर देवता वरूण, अग्नि, सोम, द्यौ:, मित्र, विष्णु, आदित्य, अर्यमन्, भग, अंश, दक्ष, विवस्वत्, सूर्य, सविता, पूषन्, मरूत्, रूद्र, आदिती, दिति, वायु, अश्विन, उषा, त्रित आप्त्य अजएकपाद, आप, पर्जन्य, अपान्नपात्, अहिर्बुघ्न्य, सरस्वती, पृधिवी, बृहस्पती, इतर स्त्रीदेवता, आणि ऋभु, अप्सरा, गंधर्व इत्यादि कनिष्ठ देवता, इतर इष्ट देवता, देवतायुग्में देवतासंघ वगैरेंचें विवेचन केलें आह. त्याचप्रमाणें वेदांतील देवतांचें सामान्य गुणवर्णन, वैदिक नीतिमत्ता, एकंदर देवतांची संख्या, त्यांचें यास्कांनीं केलेलें वर्गीकरण वगैरेसंबंधी माहिती दिली आहे.
वे द का ली न इ ति हा स:- यज्ञ संस्थेचा अधिक इतिहास, या प्रकरणांत यज्ञसंस्थचें ऋग्वेदांत दिसणारें स्वरूप लक्षांत यावें म्हणून ऋग्वेदांत आढळणारीं व सूत्रोक्त प्रयोगाशीं जुळणारीं यज्ञिय पात्रें, यज्ञिय विहार, ऋत्विग्जनांचीं नांवें, शास्त्रें पठण करितांनां मध्यें भरावयाचे निविद, शस्त्रें, स्तोत्रें, यज्ञीय हवी यांचें ऋग्वेदांतील सामान्य, पशुयागासंबंधीं, चातुर्मास्यांतर्गत महापितृयज्ञ, सोमयागासंबंधीं, सोमपानासंबंधी व ऋतुयाजनामक यागासंबंधी सुमारें ९३ उल्लेख मूळमंत्र व अर्थासह दिले आहेत. त्याप्रमाणेंच ऋग्वेदंमंत्रांत आढळणार्या परंतु सूत्रोक्त यज्ञांमध्यें न दिसणार्या क्रिया दाखविणारे ४४ उल्लेखमंत्र व अर्थांसह दिले आहेत. व त्यांवरून निघणारीं अनुमानें दिलीं आहेत. तसेंच अध्वर्युप्रमुख ९६ ऋत्विजांपैकीं कोणकोणत्या ऋत्विजाचा ऋग्वेदांमध्यें किती वेळां उल्लेख येतो याचें कोष्टक व ऋग्वेदांसंबद्ध मुख्य ऋत्विज होता याचें ऋग्वेदमंत्रावरून दिसणारें कार्य दाखविण्याकरितां मंत्रोल्लेख दिले आहेत व त्यांवरून होता तहा यज्ञ करणार्यांचा संप्रदाय असावा असें दाखविलें आहे.
तसेंच अध्वर्यूसंबंधींचे सर्व मंत्रोल्लेख देऊन अध्वर्यूचा यज्ञविधि सोमप्रधान असून त्यांत अनेक क्रिया असत व मंत्राबरोबर तंत्रहि बरेंच वाढलें होतें हें दाखविलें आहे. ज्याअर्थी यजूंचा यज्ञविधि हवि:प्रधान अशी परिस्थिति होती त्याअर्थी यजू अध्वर्यू यांचें एकत्व ऋग्वेदकालीं झालेलें नसावें. पोता, नेष्टा, वगैरे इतर ऋत्विजासंबंधीं उल्लेख देऊन त्यांचें कार्य स्पष्ट केलें आहे व ऋग्वेदांत, गायत्री, अर्की, उक्थी, ब्रह्मेवगैरे संप्रदाय दृष्टीस पडतात व होते, अध्वर्यू, ब्रह्मे वगैरेंनीं आपापल्या क्रिया पृथक करून यंज्ञसंस्थेची वाढ केली हें दाखविलें आहे. त्याप्रमाणेंच एकंदर ऋग्वेदांतील मंत्र व त्यांचा निरनिराळीं ब्राह्मणें व श्रोतसूत्रें यांनीं कोणकोणत्या क्रियांकडे व कितपत उपयोग केला यासंबंधीं विवेचन केलें आहे, व याचें पृथक्करण परिषिष्ट (उ) मध्यें दुसर्या कोष्टकांत दिलें आहे.
यानंतर चवदाव्या प्रकरणांत ऋग्वेदांतील अतींद्रियस्थितीसंबंधानें कल्पना दिल्या आहेत. त्यांत आत्मा, स्वर्ग, नरक, पितर, यम वगैरेसंबंधीं विवेचन केलें आहे. तसेंच परिशिष्ट 'इ' मध्यें ऋग्वेदांमधील ज्या भागाचा हौत्राकडे उपयोग होत नाहीं असा किती आहे तें दाखविलें आहे.
बुद्धपूर्वजग या विभागांत तिसर्या प्रकरणामध्यें असुरराष्ट्रसंस्थापनेपासून तदनंतरच्या इतिहासार्थ वेदावलोकन केलें आह. त्यांत आर्यन या काल्पनिक जातीविषयी व आर्य या वेदभाषीं जाती विषयींच्या कल्पना दिल्या आहेत व आर्य शब्दाचा अनेक ऋग्वेदांतील व अथर्ववेदांतील उतारे देऊन अर्थ निश्चित केला आहे. त्याप्रमाणेंच दस्यु व दास यासंबंधींचे उतारे देऊन त्या शब्दांचेहि अर्थ निश्चित केले आहेत. त्याप्रमाणेंच राजारामशास्त्री भागवत यांच्या देव, पूर्वदेव वगैरेसंबंधींच्या कल्पना दिल्या आहेत. नंतर मंत्रद्दष्टकालाचे इंद्रवृत्रादि पौराणिक कथांचा काल, अर्धवट ऐतिहासिक कथांचा काल व दाशराज्ञयुद्धाचा काल असे तीन कालविभाग पाडले आहेत. नंतर ऋग्मंत्रांत दिसणार्या समाजाचें स्वरूप देऊन पूर्वीच्या ग्रंथकारांचें आर्यदस्युयुद्धविषयक मत व आमचें आजचें मत दिलें आहे, व त्यावरून ऋग्मंत्रवाङ्मय हें सर्व भारतीय आर्यन लोकांचें नसून काहींशा उत्तरकालीन आलेल्या भारतीयांचे वाङ्मय आहे आणि ब्राह्मणें हे वाङ्मय जुनें सूतवाङ्मय व नवें मांत्रवाङ्मय यांस जोडणारें आहे असा सिद्धांत काढला आहे, व त्यांचीं कारणें व पद्धति दिलीं आहेत. नंतर ऋग्वेद व दाशराज्ञयुद्ध यांचा संबंध स्पष्ट केला व हें केवळ आर्यन् आणि नॉन आर्यन यांमधील युद्ध नव्हतें हें सुदासाच्या शत्रूंच्या यादीवरून दाखविलें आहे. नंतर दाशराज्ञयुद्धविषयक उल्लेखांचा त्यांत येणार्या व्यक्तींवरून अन्योन्यश्रय दाखविला आहे.
अशा प्रकारें दाशराज्ञयुद्धविषयक सूक्तांत प्रत्यक्ष उल्लेखिलेल्या व तत्संबद्ध एकंदर ऋग्वेदांत आढळणार्या व्यक्ति घेऊन त्यांची माहिती दिली आहे व तीवरून बहुतेक ऋग्वेदीय सूक्तांची युध्दोत्तरता सिद्ध केली आहे. शेवटीं अशा एकंदर ज्ञातसंबंध व अज्ञातसंबंध व्यक्तींचा आढावा घेतला आहे व प्रत्येक सूक्ताची दाशराज्ञयुद्धाशीं सर्वानुक्रमणी व वरील उल्लेखांच्या सहाय्यानें उत्तरकालीनता दाखविणारें कोष्टक दिलें आहे. यानंतर ऋग्वेदमंत्रांतील इतिहासाची स्थूल रूपरेखा व आयुष्यक्रम दिला आहे.
चवथ्या प्रकरणांत दाशराज्ञयुद्ध अथवा भरतदिग्विजयाचें सविस्तर वृत्त व त्यांतील प्रमुख व्यक्तिीचें मंत्रोल्लेख देऊन सविस्तर विवेचन केलें आहें व शेवटीं त्यावरून निघणारीं अनुमानें दिलीं आहेत.
पांचव्या प्रकरणांत ऋग्वेदसह चारी वेदांतील शब्दांचें विषयवार वर्गीकरण करून व त्यांवर विस्तृत टीपा देऊन तत्कालिन संस्कृतीचें योग्य ज्ञान होण्याची सर्व साधनसामग्रीं तयार करून ठेवली आहे.
ब्राह्मणाचा इतिहास या सहाव्या प्रकरणांत ऋषींच्या सूक्त कर्तृत्वाविषयीं मंत्रांतील पुरावा देऊन सर्वानुक्रमणीकारांनीं दिलेल्या सूक्तद्रष्ट्यांपैकीं किती ऋषींचा मंत्रांत उल्लेख आहे हें दाखविलें आहे. नंतर ब्राह्मणांत उल्लेखिलेले सूक्तद्रष्टे देऊन सर्वानुक्रमणी व ब्राह्मणें यांतील या बाबतींतील भेद नजरेस आणला आहे. ज्या देवतांस सूक्तद्रष्टे ठरविलें आहे त्याहि वेगळ्या काढून दाखविल्या आहेत, तसेंच सूत्रांमध्यें गोत्रें म्हणून उल्लेखिलेल्या ऋषींपैकीं सर्वांनुक्रमणीकारांनीं मंत्रद्रष्टे म्हटलेल्या ऋषींचा नामनिर्देशष केलेला आहे. नंतर मंत्रकालीन पौरोहित्य व राजाश्रय या प्रश्नाचें कोणत्या ऋषीस कोणत्या राजानें काय काय देणग्या दिल्या त्यांची यादी देऊन विवेचन केलें आहे. नंतर आंगिरसादि मुख्य कुलांचा अंशसंबंध ऋग्मंत्रांवरून कितपत सिद्ध होतो तें दाखविलें आहें. तसेंच आप्रीसूक्तें व गोत्रें यांचा संबंध काय होता तें दाखविलें आहे. शेवटीं गोत्रांचा वेदाध्यायाशीं संबंध काय होता हें स्पष्ट केलें आहे.