विभाग नववा : ई-अंशुमान
ऋणमोचन :- वर्हाड. जिल्हा व तालुका उमरावती. दर्यापूर तालुक्यांतील धनोरा गांवाबरोबर इ. स. १८४० सालीं मिळालेला हा एक जाहागिरीचा गांव आहे. येथून खोलापूर ४-५ मैलावर आहे. ऋणमोचनाचें क्षेत्रफळ २९५ एकर ६ गुंठे आहे. हें हिंदू लोकांचें पवित्र स्थान असून येथें पौष महिन्यांतील दर रविवारीं जत्रा भरतें. येथील पूर्णा नदींत स्नान केलें म्हणजें मनुष्यश्य ऋणमुक्त लवकर होतो असें म्हणतात. येथें पूर्णा नदी पूर्ववाहिनी असल्यामुळें आणि तीरावर महादेवाचें लिंग असल्यामुळें या ठिकाणीं स्नानाचें महत्त्व आहे, अशी कित्येकांची समजूत आहे. वरील दर्शविलेली ऋणमुक्तता व्यावहारिक नसून पितृऋणमुक्तता ही आहे.