विभाग नववा : ई-अंशुमान
ऋतु - ऋग्वेदसंहिंतेंत शरद, हेमंत इत्यादि ऋतूंचीं नांवें पुष्कळ आलीं आहेत, व ऋतु शब्दाचा उल्लेखहि आढळतो. तथापि यजुर्वेदांत व बहवृच ब्राह्मणांत तो जसा फार वेळ आला आहे तसा ऋग्वेदांत आढळत नाहीं.
तैत्तिरीय संहितेंत मधुश्च माधश्च वासंतिकावृतू शुक्रश्च शुचिश्च ग्रैष्मावृतू नभश्च नभस्यश्च वार्षिकावृतू इषश्चोर्जश्च शारदावृतू सहश्च सहस्यश्च हैमंतिकावृतू तपश्च तपस्यश्च शैशिरावृतू' (तै. सं ४.४, ११) याप्रमाणें महिनें आणि ऋतूंचीं नांवे दिलीं आहेत. मात्र येथें ऋतु शब्द जवळ जवळ मासवाचक वापरल्यासारखा दिसतो. त्याप्रमाणेंच 'वड्रात्रिदीक्षित:स्यात् षड्वा ऋतव: संवत्सर:' (तै. सं. ५, ६, ७.) याप्रमाणें वर्षाचे सहा ऋतू असतात असा स्पष्ट उल्लेख आला आहे. याशिवाय तैत्तिरीय संहितेंत सहा ऋतूंचीं नांवें एक लगत पुष्कळ ठिकाणीं आलीं आहेत (४. ३, २; ५.६, २३; ७.५, १४) वरील पहिल्या उल्लेखांतील वाक्यें वाजसनेयी संहितेंत निरनिराळ्या मंत्रांच्या आरंभीं आलीं आहेत (१३.२५; १४ ६; १५; १६; २७, १५. ५७.)
कांहीं ठिकाणीं पांच ऋतु असतात असेंहि विधान आढळतें. पंचशारदीयेन यजेत । पंच वा ऋतव: संवत्सर: (तै. ब्रा. २.७, १०) 'द्वादशमासा: पंचर्तवो हेमंतशिशिरयो:समासेन' (ऐ. ब्रा. १. १.). यावरून पांच ऋतू मानीत व तेव्हां हेमंत आणि शिशिर यांचा एकत्र अंतर्भाव करीत असत असें दिसतें. याद्दल तैत्तिरीयसंहिता, तैत्तिरीय ब्राह्मण, शतपथ ब्राह्मण यांतहि उल्लेख आहेत. क्वचित ऋतु तीन असाहि उल्लेख आढळतो. एका ठिकाणीं अग्निऋतु: सूर्य ऋतुश्चंद्रमा ऋतु: (तै. ब्रा. ३. १०, ) असा उल्लेख आहे.
वेदांत सहाहि ऋतूंचा निर्देश जेथें जेथें एकत्र केला आहे तेथें तेथें वसंतापासून आरंभ केला आहे. याशिवाय ऋतूंत वसंत मुख्य होय अशीं स्वतंत्र विधानेंहि आहेत. ‘मुखं वा एतदृतूनां । यद्वसंत:' (तै. ब्रा. १.१, २). तस्यते वसंत: शिर:। ग्रीष्मो दक्षिण:पक्ष:| वर्षा: पुच्छं शरदुत्तर पक्ष: हेमंतो मध्यम् (तै. ब्रा. ३. १०, ४) यासारखींच वाक्यें आणखीहि काहीं स्थलीं आहेत. यांत संवत्सर हा एक पक्षी कल्पून वसंत शिर, ग्रीष्म उजवा पक्ष, वर्षा पुच्छ, शरद डावापक्ष व हेमंत मध्य अशी कल्पना केली आहे. 'उभय तोमुखमृतुपात्रं भवति कोहि तद्वेद यदृतूनां मुखं' (तै. सं. ६. ५, ३). ऋतुपात्रास दोहोंकडे तोंड असतें. ऋतूचें मुख कोणतें हें कोणी जाणलें आहे? म्हणजे कोणत्या ऋतूचा आरंभ केव्हां होतो हें नक्की समजत नाहीं. ऋतू सूर्याच्या स्थितीवर अवलंबून आहेत. एका वर्षी सौरमासाचा आरंभ एका चांद्रमासाच्या आरंभीं झाला तर पुढच्या वर्षी तो शुक्ल द्वादशीच्या सुमारास व तिसर्या वर्षी कृष्ण अष्टमीच्या सुमारास होतो. तेव्हां ऋत्वारंभ एका तिथीच्या संबंधें अनियमितच होय. इतकेंच नाहीं, तर सौरमासासंबंधेंहि तो थोडा बहुत अनियमित असतो. स्थलभेदानेंहि ऋत्वारंभांत फेर पडतो. आतां हा फरक दहा पांच दिवसांचा असावयाचा हें उघड आहे. चंद्रसूर्यांच्या गतींचें सूक्ष्म ज्ञान नसेल आणि काल मोजण्याचीं साधनें नसतील तर पक्षसंधि आणि ऋतुसंधि यांचें सूक्ष्म ज्ञान होणें फार कठिण आहे. याबद्दल पौर्णिमासेष्टि आणि दर्शेष्टि या यागांनीं पौर्णमासी आणि अमावस्या हीं पर्वें निश्चित केलीं व चातुर्मास्य यज्ञांनीं ऋतुसंधि व्यवस्थित केले असा उल्लेख आहे (श. ब्रा. १. ६, ३) आश्वलायन श्रौतसूत्रांत एका ठिकाणीं ऋतूंचा संबंध आला आहे. तेथें वसंतापासून आरंभ आहे (श्रौ. सू. ४. १२). महाभारतांत अश्वमेधपर्वांत ऋतव:शिशिरादय: (अश्व ४४) असें म्हटलें असून ऋतूंत शिशिर ऋतूस अग्रस्थान दिलें आहे; तथापि महाभारतांत अनेक ठिकाणीं वसंतादि ऋतूंचा उल्लेख आहे. उदगयनारंभीं वर्षारंभ केला म्हणजे ऋतू शिशिरादि किंवा हेमंतादि असलेंच पाहिजेत. परंतु एकंदर उल्लेख पाहतां 'चैत्रवैशाख वसंतऋतु' हीच परिभाषा तेव्हां होती हें सिद्ध होते. ऋतूंबद्दल विवेचन बुद्धपूर्व जग वेदकालांतील शब्दसृष्टि (पृ. २००) व विज्ञानेतिहास ज्योतिषशास्त्राचा इतिहास (पृ. २९३) या ठिकाणींहि केलेलें आहे.
सध्यां जरी चैत्रवैशाख वसंतऋतु अशी आपण ऋतूंची गणना करितों. तरी ऋतु हे चांद्रमासांवर अवलंबून नसून सौरमासांवर म्हणजे संक्रातींवर अवलंबून असतात. तेव्हां हल्लीं वसंतऋतूचा आरंभ चैत्रशुद्ध प्रतीपदेस न होतां मीन राशींस सूर्य गेला असतां होतो असें समजतात. याप्रमाणें निर्णयसागरीं ग्रहलाघवीय पंचागांत शके १८४३ सालीं वसंतऋतूचा आरंभ फाल्गुन शुद्ध पोर्णिमेस दिला आहे. व पुढें शके १८४४ सालीं ग्रीष्मऋतूचा आरंभ सूर्य वृषभ राशीस जातो त्यादिवशीं म्हणजे वैशाख वद्य तृतीयेस दिला आहे. याप्रमाणें सूर्यानें दोन संक्रांती भोगल्या म्हणजे एक ऋतु पूर्ण होतो व याप्रमाणें एक वर्षांत सहा ऋतू होतात.
अलीकडे पाश्चात्त्यदेशांत व तदनुरोधानें इकडेहि चार ऋतू मानतात. आपण याअर्थी उन्हाळा, पावसाळा व हिंवाळा असे हवामानावरून तीनच ऋतू अथवा काळ मानतों. पाश्चात्त्यदेशांत हवामानाच्या फरकावरूनच वसंत, उन्हाळा, पावसाळा व हिवाळा असे चार ऋतू अथवा 'सीझन्स' मानतात. हे ऋतू पृथ्वीच्या वार्षिक गतीमुळें उत्पन्न होतात; तथापि हा हवामानांतील फरक केवळ वार्षिक गतीवर अवलंबून नसून पृथ्वीचा आंस तिच्या कक्षेच्या पातळांशीं ६६॥ व तिच्या वरील लंबाशीं २३॥ अंशांचा कोन करतो हें त्यांचें मुख्य कारण आहे. हा कोन नेहमीं कायम असतो व आंस पृथ्वीच्या भिन्न भिन्न स्थितींत स्वत:शीं समांतर असतो. पृथ्वी आपल्या सूर्याभोंवतींच्या प्रदक्षिणेंत जून २२ तारखेस अशा स्थितींत असते कीं, त्यावेळीं उत्तरध्रुव सूर्याकडें कललेला असून सूर्यप्रकाश उत्तरध्रुवाच्या पलीकडे जातो. यामुळे उत्तर गोलार्धांतील प्रत्येक स्थलीं बारा तासांपेक्षां कांहींतरी मोठा दिवस असतो व याच्या उलट दक्षिण गोलार्धांत बारा तासांपेक्षां मोठी रात्र असते. यामुळें यावेळीं उत्तरगोलार्धांत उन्हाळा व दक्षिणगोलार्धांत हिंवाळा असतो. पुढें सप्टेंबर २१ तारखेस पृथ्वी अशा स्थितींत असते कीं, दोन्हीहि ध्रुव सूर्याकडे सारखेच कललेले असतात. त्यामुळें उत्तरगोलार्धांत व दक्षिणगोलार्धांतहि सूर्यप्रकाश बरोबर बाराच तास मिळून दिवस रात्र सारखींच असतात व हवामान समशीतोष्ण असतें. या वेळीं आपल्याकडे पावसाळा असतो. नंतर डिसेंबर बावीस तारखेस व जून २२ तारखेस उलट म्हणजे दक्षिण ध्रुव सूर्याकडे कललेला अशा स्थितींत पृथ्वी असते, त्यामुळें दक्षिणगोलार्धांत दिवस मोठा असून उन्हाळा असतो व उत्तरगोलार्धांत रात्री मोठ्या असून हिंवाळा असतो. मार्च २१ तारखेस पुन्हां दिवसरात्र सारखीच असून हवी समशीतोष्ण असते, व उत्तरगोलार्धात वसंतऋतु असतो. हिंदुस्थानांत वसंत व उन्हाळा असे दोन भिन्न ऋतु प्रत्ययास येत नसल्यामुळें येथें उन्हाळा, पावसाळा व हिंवाळा असे तीनच काळ मानण्यांत येतात.