विभाग नववा : ई-अंशुमान
ऋत्विज :- यज्ञादिकांमध्यें यजमानाकरितां श्रौतकर्म करणार्या अग्निहोत्र्याच्या घरीं दररोजचा सकाळसंध्याळचा होम देणारा ऋत्विज (अध्वर्यु) एकच असतो. परंतु पौर्णिमेच्या व आमावस्येच्या दुसर्या दिवशीं करावयाच्या इष्टींत ऋत्विजांची संख्या चार असते. ते चार ऋत्विज म्हणजे अध्वर्यु, ब्रह्मा, होता व आग्नीघ्न हे होत. चातुर्मास्य यागांत वरील चाराशिवाय प्रतिप्रस्थाता नामक एक जास्त ऋत्विज असतो पशसंबंधीं (निरूढ अथवा काम्य) यागांत वरील पांचाशिवाय मैत्रावरूण नामक आणखी एक ऋत्विज असतो. अग्न्याधानांत (अग्निहोत्र घेते वेळीं) इष्टींतील चार ऋत्विजांशिवाय उद्गाता नामक पांचवा ऋत्विज असतो. अग्निष्टोमादि सोमयागांत वर उल्लेखिलेल्या सात ऋत्विजांशिवाय ब्राह्मणांच्छंसी, अच्छावाक, प्रस्तोता, पोता, प्रतिहर्ता, नेष्टा, उन्नेता, ग्रावस्तुत् आणि सुब्रह्मण्य हे ऋत्विज जास्त असतात. एकूण सोमयागांत प्रत्यक्ष कार्यकर्ते सोळा ऋत्विज असून सदस्य नामक (सदनामक मंडपांत बसणारा) एक सतरावा ऋत्विज असतो.
यज्ञादिकांमध्यें यजमानानें जे ऋत्विज नेमावयाचे त्या संबंधीं ऋ्त्विकवरण नामक विधि करावयाचा असतो. तो आश्वलायन गृह्यसूत्रांत (१.२३) सांगितला आहे. त्याच ठिकाणीं ऋत्विज योजावयाचा तो अव्यंग व तरूण असावा असें सांगितलें आहे.
स्मार्त यज्ञिकांतहि शांति वगैरेंच्या हवनप्रसंगीं आचार्य (अध्वर्यु) व ऋ्त्विकवरणाचा आचार आहे. ऋत्विज् शब्दासंबंधीं जास्त माहितीसाठीं (बुद्धपूर्वजग विभाग ३, पूर्वार्ध पृष्ठ ३२२ पहा.)