विभाग नववा : ई-अंशुमान
ऋषि :- 'ऋषयोमंत्रद्रष्टार: वसिष्ठादाय:' म्हणजे ज्यांनां मंत्र प्रथम दिसले ते ऋषी. वेदवाङ्मयांतील मंत्रभागाबद्दल अशी समजूत आहे कीं, मंत्र अपौरूषेय आहेत, तें कोणत्याहि मनुष्यानें केलेले नसून तीं ईश्वराचीं नि:श्वसितें आहेत. हे मंत्र ज्या व्यक्तींस दैवी प्रेरणेनें दिसले त्यांस मंत्रद्रष्टे असें म्हणतात व त्या मंत्रांस प्रथम ते केवळ ऐकिले गेले म्हणून श्रुति असें म्हणतात. या श्रुतीस शब्दप्रामाण्य आहे. म्हणजे त्यांतील विधानांची सत्यता इतर बाह्य प्रमाणांवरून सिद्ध करावी लागत नाहीं अशी भारतीयाची श्रद्धा आहे. स्मृतिवाड्:मय हें मानवप्रणीत असल्यामुळें त्याला श्रुतीइतकें प्रामाण्य नाहीं. यास्कानें 'यस्य वाक्यं स ऋषि:' असें ऋषि शब्दाचें स्पष्टिकरण केलें आहे. याचा अर्थ ऋग्वेदांतील मंत्र ज्याच्या तोंडी असेल तो त्या मंत्राचा ऋषि होय. या व्याख्येप्रमाणें अनेक देवता वगैरेकडेहि ऋषित्व येतें. शौनकप्रणीत सर्वानुक्रमाणीमध्यें प्रत्येक ऋग्वेदीय सूक्ताचा अथवा ऋचेचा ऋषि कोण हें सांगितलें आहे. बुद्धपूर्वजग पृ. ८७ वरील कोष्टकांत ऋग्वेदसूक्तकार ऋषि सर्व दिले आहेत. इतर ऋषिनामें वेदकालांतील शब्दसृष्टि या प्रकरणांत पृ. ४२७ वर दिलीं आहेत व पृष्ठ ४२८ वर विस्तृत टीप आहे ती पहा. देव, ब्राह्मण व राजे यांपैकीं जे ऋषी असीतल त्यांस अनुक्रमें देवर्षि, ब्रह्मर्षि व राजर्षि असें म्हणत. महर्षि व कांडर्षि असेंहि ऋषीमध्यें आणखी भेद केलेले दिसतात. त्यापैकीं महर्षि म्हणजे ऋग्वेदाच्या सहा मंडळांचे जे गृत्ससद, विश्वामित्र, वामदेव, अत्रि, भरद्वाज व वसिष्ठ इ. ऋषि व कश्यप हे असावेत. भगवद्गीतेंत (अ. १० श्लोक १६) पूर्वीच्या सात ऋषीनांच महर्षि म्हटलें आहे. तैत्तिरीय संहितेचीं जीं ५ कांडें आहेत त्यांच्या द्रष्ट्यांना कांडर्षि म्हटलें असून त्यांचा कांडर्षि या नांवानें उल्लेख सत्याषाढ व बौधायन गृह्यसूत्रांत उपाकर्मप्रसंगीं आला आहे. तीं नावें प्रजापति, सोम, अग्नि, विश्रवेदेव व स्वायंभू हीं होत.
रा. राजवाडे ऋषि या शब्दाचे इंग्रजी रश = जोरानें जाणें या धातूशीं साम्य कल्पितात व ऋषि शब्दांत ऋष = जोरानें जाणें असा धातू कल्पून त्याचा अर्थ ईश्वराकडे जोरानें जाणारा मांत्रिक (सोर्सरर) असा करतात. शतपथ ब्राह्मणांत (गौतम, भारद्वाज, विश्वमित्र, जमदग्नि, वसिष्ठ, कश्यप व अत्रि यांचा सप्तर्षि म्हणून उल्लेख केला आहे. बृहदारण्यकोपनिषदांतहि हींच नांवें आढळतात. महाभारतांत शल्यपर्वांत (४९.५२ दक्षिण प्रत) व अनुशासन पर्वांत (१४१ द. प्र.) वरील नांवें सप्तर्षि म्हणून आढळतात; पण शांतिपर्वांत (३४३३० द. प्र.) मरीचि, अत्रि, अड्गिरा पुलस्त्य, पुलह, ऋतु, वसिष्ठ अशीं नांवें दिलीं आहेत. मनूनें या सातांस व दक्ष किंवा प्रचेता, भृगु व नारद यांस प्रजापति म्हटलें आहे.