विभाग नववा : ई-अंशुमान
ऋषिऋण :- ऋषींच्यासंबंधीं जें ऋण ते ऋषिऋण (म्हणजे स्वाध्याय). तैत्तिरीय संहितेंत (६.३, १०) ''जायमानो वै ब्राह्मण: त्रिभिर्ऋणवा जायते ब्रह्मचर्येण ऋषिभ्यो यज्ञेन देवेभ्य: प्रजया पितृभ्य:' असें वाक्य आहे त्याचा अर्थ असा कीं, जन्मास आलेला मनुष्य हा ऋषि, देव आणि पितर यांचा ऋणी असतो. ते ऋण त्यानें वेदाध्ययनानें ऋषींचें, यज्ञयागांदिकांनीं देवांचे व प्रजोत्पादनानें पितरांचें याप्रमाणें फेडावयाचें असतें. सायणाचार्यांनी ऋषिऋण याचें ''वेदाभ्यासादिभि: अपाकर्तव्यं यदृणं'' असें स्पष्टीकरण केले आहे. या ठिकाणीं ऋण फेडणें यांचा अर्थ संतोष करणें असा दिसतो. व प्राचीन ऋषींनीं जें वाड्:मय निर्माण केलें तें जागृत ठेवून त्या योगें त्यांचा संतोष करणें हा ऋषिऋण याचा स्पष्ठार्थ दिसतो. तेव्हां ऋषिऋण म्हणजे वेदाध्ययन स्वाध्याय. विशेष विवेचनासाठीं 'स्वाध्याय' पहा.