विभाग नववा : ई-अंशुमान
ऋषिपंचमी - भाद्रपद शुद्ध पंचमीस ऋषिपंचमी म्हणतात. या दिवशीं काश्यपादि सप्तऋषि व अरूंधती याचें पूजन करतात. नद्यांच्या संगमावर अथवा समुद्रस्नान या दिवशीं करावें व स्नानाच्या पूर्वी आघाड्याच्या काड्यांनीं दंतधावन करावें असा विधि आहे. उपवास करून बैलाच्या श्रमावांचून उत्पन्न केलेल्या खाद्यपदार्थांचा नैवेद्यास उपयोग करितात. हें व्रत ऋतुस्नात होणार्या (रजोदोष शमनार्थ) स्त्रियांनीं करावयाचें असते. कोणी पुरूषहि हें व्रत करतात. या व्रतासंबंधीं ब्रंह्मांडपुराणांत कथा आहे ती अशी:-
सिताश्व राजानें विचारल्यावरून ब्रह्मदेवानें सांगितलें कीं, विदर्भ देशांत उत्तंक नांवाचा एक ब्राह्मण रहात असून सुशीला नांवाची त्याची एक पतिव्रता स्त्री होती. त्याला सुंविभूषणनामक पुत्र असून वैधव्य प्राप्त झालेली अशी एक कन्या होती. आपल्या पुत्रास घरीं ठेवून विधवा कन्येसह तो अरण्यांत रहात असे. एके रात्रीं तीं विधवा कन्या एका दगडावर निजली असतां तिच्या अंगावर अनेक कृमी उत्पन्न झालेले उत्तंकाच्या शिष्यानें पाहिले, व उत्तंकाच्या स्त्रीस सांगितलें. तिनें मुलीच्या अंगावर उत्पन्न झालेले कृमी पाहून एकाएकीं असे कृमी उत्पन्न होण्याचें कारण आपल्या भर्त्यास विचारलें असतां 'हीं पूर्वजन्मीं ब्राह्मणस्त्री असून रजस्वला झाली असतां दूर न राहतां ती तशीच गृहांत वावरत असे या पातकामुळें या कन्येच्या शरीरावर नित्य रात्रीं असे कृमी उत्पन्न होऊन सकाळीं नाहींसे होतात असें सांगितलें. पत्नीनें विचारल्यावरून उत्तंक म्हणाला कीं स्त्रियानीं रज:संपर्क दोष नाहींसा होण्याकरितां अरूंधतीसहित कश्यपादि सत्पऋषींचें पूजनरूप ऋषिपंचमी नामक व्रत करावें म्हणजे रज:संपर्क दोष नाहींसा होतो.
भविष्योत्तरपुराणांतील कृष्णानें धर्मास सांगितलेलीं ऋषिपंचमीची कथा अशी:- पूर्वी इंद्रानें वृत्राला मारिलें. वृत्रासुर ब्राह्मण असल्यामुळें ब्रह्महत्येचें पातक घडलेला इंद्र लज्जित होऊन ब्रह्मदेवास शरण गेला असतां ब्रह्मदेवानें त्या ब्रह्महत्येचे चार विभाग करून एक भाग अग्नीच्या प्रथम ज्वालेत, दुसरा भाग नदीला प्रथम आलेल्या पुरांत, तिसरा भाग पर्वतशिखर व वृक्षजातींमध्यें आणि चवथा भाग स्त्रियांच्या रजांत ठेविला. यासाठीं रजस्वला स्त्रीस स्पर्श करू नये. ती प्रथम दिवषीं चांडाली, दूसर्या दिवशीं ब्रह्मघातिनी, तिसर्या दिवशीं परटिणीप्रमाणें असून चौथ्या दिवशीं शुद्ध होते.
समजून अथवा न समजून झालेल्या रज:संपर्कानें होणार्या पापाचें क्षालन ऋषिपंचमी व्रतानें होतें असें सांगून यासंबंधीं श्रीकृष्णानें धर्मास आणखी एक कथा सांगितली आहे ती अशी:- विदर्भ देशांत सुमित्र नांवाचा एक विद्वान ब्राह्मण रहात होता. त्याची जयश्री नामक अत्यंत पतिव्रता पत्नी असून परिवार मोठा असल्यामुळें गृहकृत्यें करूनहि स्वत: आपल्या शेतांतील कामें ती करीत असे. एकदां ती रजस्वला असतां अस्पृश्य न राहतां घरांत तशीच वावरली. या पातकामुळें मृत्यूनंतर ती कृत्रीच्या जन्मास गेली. सुमित्र स्वत: पातकी नसतां पातकी स्त्रीच्या सहवासामुळें त्यास मृत्यू नंतर बैलाचा जन्म आला. पूर्व जन्मीच्या कांहीं सुकृत्यामुळें त्या दोघांना त्यांचा पूर्व जन्मीचा मुलगा जो सुमति त्याच्याच पदरीं राहण्याचा प्रसंग आला. एकदा सुमतिच्या बापाचा श्राद्धदिन आला असतां त्याच्या स्त्रीनें श्राद्धाकरितां स्वयंपाक तयार केला. त्या स्वयंपाकांतील पायसांत त्या स्त्रीच्या न कळत सर्पानें गरळ टाकलेलें थोड्या अंतरावरच असलेल्या कुत्रीनें पाहिलें आणि हा पायस भक्षण केल्यानें ब्राह्मणांना मृत्यु येईल हें जाणून त्या कुत्रीनें स्वयंपाकास स्पर्श केला. सुमतीच्या बायकोनें हें पाहून अतिशय रागानें त्या कुत्रीच्या डोक्यांत जळकें लांकूड मारलें आणि तो सर्व स्वयंपाक टाकून देऊन दुसरा स्वयंपाक तयार केला. स्वयंपाक विटाळल्यामुळें कुत्रीस त्या दिवशीं नित्याप्रमाणें खावयास कोणी न घातल्यामुळें तिला उपवास घडला. तिला व बैल झालेल्या तिच्या पतीला पूर्व जन्मीचें स्मरण असल्यामुळें ती दोघेंहि आपापल्या भाषेंत एकमेकांशीं बालत असत. शेतांतून बैल घरीं आल्यावर कुत्रीनें घडलेली हकीकत बैलास निवेदन केली. बैलानेंहि ''माझ्या मुलानें आज दिवसभर माझ्याकडून कष्टाचें काम करून घेऊन मला कांहींच खाऊ घातलें नाहीं आणि कामाची कसूर झाल्यास मारहि देण्यास कमी केलें नाहीं. आज मुलानें माझें श्राद्ध केले परंतु मी बुभुक्षितच असल्यामुळें तें श्राद्ध व्यर्थ होय.'' असें सांगितलें. कुत्री व बैल यांचें हें भाषण जवळच असलेल्या सुमति ब्राह्मणानें (त्याला जनावरांची भाषा कळत असल्यामुळें) ऐकल्यावरून मातापितरांच्या या अवस्थेबद्दल त्याला अत्यंत दु:ख झालें आणि या माता पितरांनां ही स्थिति कां प्रात्प झाली व ती कोणत्या उपायांनीं नाहींशी होईल हें त्यानें अत्यंत ज्ञानी अशा सर्वतपा नामक ऋषीला विचारलें असतां त्या ऋषीनें त्याच्या मातापितरांची पूर्व जन्माची हकीगत सांगून, हा रज:संपर्क दोष नाहींसा होण्यास ऋषिपंचमी नामक व्रत करावयास सांगितलें. नंतर सुमतीनें यथासांग व्रत केल्यावर त्याच्या मातापितरांची पशुयोनीपासून मुक्तता झाली.