विभाग नववा : ई-अंशुमान
ऋष्यमूक - भारतवर्षीय भरतखंडस्थ पंपा सरोवरासमीपचा जो मतंग नामक सामान्य पर्वत आहे त्याचें शृंग. हा अनागोंदीपासून आठ मैलांवर आहे. येथें मतंग ऋषिचा आश्रम असे. हा पर्वत मतंगच्या शापामुळें वालीस गमनार्थ वर्ज्य होता म्हणून, सुग्रीव आपल्या सचिवांसह यावर राहून कालक्रमण करीत असे. मतंगपर्वतास, ऋष्यमूकाप्रमाणेंच मलय नांवाचें दुसरेंहि एक शृंग होतें. (वा. रा. किष्किं. स. १-२)