विभाग नववा : ई-अंशुमान
ए - मराठीं वर्णमालेंतील आठवें अक्षर. पण संस्कृत वर्णमालेंतील अकरावें; कारण तींत ऋृ, लृ, लृ, हीं तीन अक्षरें ऋ व ए यांमध्यें येतात. या वर्णाला संध्यांचें स्वरूप प्राप्त होण्याला पांच अवस्थांतून जावें लागलें आहे. पहिली अवस्था अशोकाच्या गिरनार लेखांत, दुसरीं इ. स. ६ व्या शतकांतल्या उष्णीषविजय धारणीच्या ताडपत्री पुस्तकांत, तर तिसरी त्याच शतकांतील महानामनच्या बुद्धगया येथील लेखांत आढळते. चवथी धार येथील शिरेवरील परमार भोजाच्या कूर्मशतक काव्यांत स्पष्ट दिसते; हिचा काळ इ. स. ११ वें शतक हा आहे. यानंतर या अक्षराला अर्वाचीन स्वरूप [पांचवें] प्राप्त होण्याला फार वेळ लागला नाहीं.