विभाग नववा : ई-अंशुमान
एकर - (एक्का अथवा सेंट जीन द एकर) हें पॅलेस्टाईन मधील एका जिल्ह्याचें मुख्य शहर आहे. एकरच्या उपसागराच्या उत्तरटोंकावरील एका भूशिरावर हें शहर वसलेलें आहे. एकरची लोकसंख्या सु. ११००० आहे. पैकीं ८००० मुसुलमान व बाकीचे यहुदि व ख्रिस्ती आहेत. किनार्यावर असल्यामुळें व इतर कारणांनीं याला 'पॅलेस्टाईनची किल्ली' म्हणत असत. येथील व्यापार मंद होत चालला असून, शहराचा वारंवार नाश झाल्यामुळे येथें पाहाण्यालायक इमारतीं मुळींच नाहींत. येथील पडलेली भिंत धर्मयुद्धाच्या वेळची असून, मशीद जेझरपाशानें बांधली आहे. एकर हें बाबिस्ट धर्मपंथाचें मुख्य ठिकाण आहे.
इ ति हा स - तिसर्या टेथमोसि (थॉथमिस १५०० इ. स. पूर्वी.) याच्या खंडणीच्या यादींत एआक नांव आहे व कदाचित हें एकर असावें असा तर्क आहे. परंतु टेल-एक-अर्मना पत्रव्यवहारांतील एक्का, व सांप्रतचें एकर यांत कांहींच फरक नाहीं. हिब्रू लोक याला एक्को म्हणत व त्यांच्या वेळेस या शहराचा संबंध सीरिया प्रांतांशीं फार असें. इ. स. पूर्वी ७२५ व्या वर्षी एकर हें चवथ्या शलमनेसरच्या विरूद्ध सिडन व टायर यांच्या बाजूनें बंडांत सामील झालें. ग्रीक इतिहासकार या शहराला एके म्हणत व टॉलेमी सोटर यानें या शहराला टालेमेक असें नांव दिलें असावें. ख्रिस्तीशतकापूर्वी १६५ व्या वर्षी सायमन मकाबीअसनें सीरियन सैन्याचा पराभव पुष्कळ ठिकाणीं करून त्यांना टालेमेसमध्यें हांकून दिलें. इ. स. पूर्वी १५३ व्या वर्षी सीरियाच्या गादीवर हक्क सांगणार्या डेमेट्रिअसचा प्रतिस्पर्धी अलेक्झांडर बालस (अँटायोकस एफिफेनिसचा मुलगा) याला एकर येथें आश्रय मिळाला होता. अलेक्झांडर जेगाऊस, व क्लिओपाट्रा यांनीं हें शहर हल्ला करून घेतलें होतें. सेंटपाल या शहरीं एक दिवस राहिला होता. अरबांनीं हें शहर ६३८ त घेतलें. पण १११० त धर्म योद्ध्यांनीं परत घेतलें. सल्लाउद्दीननें हें ११८७ सालीं घेतलें. गाय दि लुसिग्नाननें ११८९ त याला वेढा दिला. व इंग्लंडच्या पहिल्या रिचडनें ११९१ त हें जिंकून घेतलें सुलतान सेलिमाच्या अधिपत्याखालीं तुर्कांनीं हें शहर १५१७ त काबीज केलें. १८ व्या शतकाच्या शेवटीं येथील शेख धाहर-एल-अमिरच्या अंमलाखालीं या शहराची भरभराट झाली. याच्यामागून जेझरपाशानें येथें तटबंदी केली. १७९९ त नेपोलियनने दोन महिने याला वेढा दिला होता. तरी सर डब्ल्यू सिडने व ब्रिटीश खालाशी यांच्या मदतीने तुर्कांनी त्याला दाद दिली नाहीं. जेझरचा मुलगा सुलेमान याच्या वेळेस पुन्हां या शहराची भरभराट झाली. १८३१ त इब्राहिमपाशानें वेढा देऊन या शहराची फार नासाडी केली. १८४० त ब्रिटीश आस्ट्रियन व चेंफ्र या मित्र संघांनीं तोफा डागून हें शहर घेतलें व एक वर्षानें तुर्कांच्या स्वाधीन केलें.
ए क र ची ल ढा ई :- ११८९ त झाली. जरूसलेमचा राजा गाय लुसिग्नाननें यास वेढा दिला असतां सल्लाउद्दीननें वेढा उठविण्यासाठीं फौज पाठविली तिचा पराभव या लढाईंत झाला.