विभाग नववा : ई-अंशुमान
एकादशी - प्रत्येक पंधरवड्यांतील अकरावी तिथि. एकादशीच्या दिवशी उपवास करावयाचा असून दुसर्या दिवशीं त्या व्रताची पारणा करतात. हें व्रत काम्य व नित्य (नेहमीं करावयाचें) असें आहे. एकादशींत स्मार्त व भागवत असे दोन भेद आहेत. या स्मार्त व भागवत अशा प्रकारच्या एकादशा नेहमीं येत नाहींत. त्यांच्यांतील ठोकळ भेद म्हणजे असा कीं, ज्या वेळीं दोन एकादशा येतील त्या वेळीं स्मार्त पूर्व दिवशीं व भागवत एकादशी दुसर्या दिवशीं येते. भागवत एकादशी नेहमीं द्वादशीविद्ध असते. स्मार्त व भागवत या एकादशा केव्हां मानावयाच्या यासंबंधीं माहिती धर्मसिंधु, निर्णयसिंधु इत्यादि ग्रंथांत सविस्तर दिली आहे.
दर महिन्याच्या दोन एकादशा याप्रमाणें वर्षाच्या चोवीस एकादशांचीं नांवें निराळीं आहेत. त्यांपैकीं शुक्लपक्षांतील बारा एकादशांचीं नांवें चैत्रमहिन्यापासून अनुक्रमें कामदा, मोहिनी, निर्जला, शयनी, पुत्रदा, परिवर्तिनी, पाशांकुशा, बोधिनी, मोक्षदा, प्रजावर्धिनी, जयदा, आमलकी हीं असून कृष्णपक्षांतील एकादशांचीं नांवें चैत्रमहिन्यापासून अनुक्रमें पापमोचनी, वरूथिनी, अपरा, योगिनी, कामिका, अजा, इंदिरा, रमा, फलदा, सफला, षटतिला, विजयी हीं होत.
एकादशीच्या उत्पत्तीसंबंधीं पद्मपुराणांत (उत्तरकांड अ. ३८), पुढील कथा आहे:- कृतयुगांत अत्यंत उन्मत्त अशा मुर नामक दैत्याच्या वधाकरितां देवांनीं विष्णूची प्रार्थना केल्यावरून मुर दैत्याचा वध करण्याची प्रतिज्ञा करून विष्णूनें सर्व देवांच्यासह चंद्रावती नगरींत जाऊन दैत्यांशीं युद्ध सुरू केलें. देव तर लागलीच पळून गेले परंतु पुष्कळ वेळ युद्ध करूनहि विष्णूचें कांहीं न चालल्यामुळें शेवटीं तोहि पळून जाऊन बदरिकाश्रमीं एका गुहेंत दडून बसला. मुर दैत्य विष्णूचा पाठलाग करीत त्याच गुहेजवळ आला असतां तेथें त्यास शास्त्रस्त्रांनीं युक्त अशी एक सुंदरी दिसली. तिच्याशींच दैत्य युद्ध करूं लागला असतां त्या स्त्रीच्या हुंकारानेंच तो दैत्य मरण पावला. विष्णूनें हें पाहून त्या सुंदरीस वर मागण्यास सांगितलें असतां ''तिन्ही भुवनांत व चारी युगांत मला श्रेष्ठत्व असावें, सर्व तीर्थाहून मला श्रेष्ठ समजावें, जे कोणी माझ्या (एकादशीच्या) दिवशीं उपवास करून तुझी भक्ति करतील त्यांवर तूं संतुष्ट असावेंस'' असा वर मागितला. विष्णूनें तिचें नांव एकादशी असे ठेवलें.
याशिवाय ज्या पूर्वी बारा महिन्यांतील मोक्षदा वगैरे चोवीस एकादशा सांगितल्या त्या प्रत्येकीसंबंधींहि एक एक लहानशी कथा पद्मपुराणांत पुढें (उत्तरकांड अ. ३९ ते ६६) दिली आहे.