विभाग नववा : ई-अंशुमान
एक्स - हें शहर फ्रान्स देशांतील आग्नेय भागांत बोशेड्यूर्होन विभागांत असून मार्सेलिसच्या उत्तरेस आगगाडीनें १८ मैलांवर आहे. येथील लोकसंख्या १९०६ सालीं १९४३३ होती. कूर्स मिराबो या सुंदर रस्त्याच्या योगानें शहराचे दोन निरनिराळे भाग झालेले आहेत. या रस्त्यांत तीन कारंजी लागतात व दुतर्फा झाडें लावलेलीं असून प्रेक्षणीय इमारती आहेत. उत्तरेकडील भाग जुना असून त्यांत सोळाव्या शतकापासूनच्या इमारती आढळतात. या शहरांत एक्स मार्सेलिस या विद्यापीठाचें कायदा व वाड्:मयशास्त्रांचें पीठ आहे. या शहरांत प्राचीन काळच्या बर्याच इमारती व शिल्पकामाचे नमुने आढळतात. सेंट सौवूरचें कॅथीड्रल ही प्राचीन व पहाण्यासारखी इमारत आहे. येथें उन्हाळीं आहेत. त्यांत चुना व कर्बाम्लवायु असतो. येथें आर्चबिशपचें स्थान, अपील र्कार्ट, अकॅडमी, शिक्षकविद्यालय, धंदेशिक्षणाची शाळा व पदार्थसंग्रहालय (त्यांत प्राचीन अवशेष, चित्रें, प्राणी, वनस्पती वगैरे आहेत). असून ऑलिव्ह तेल काढण्याचे, लोखंडाचे, टोप्यांचे वगैरे कारखाने आहेत. या शहराची स्थापना ख्रि. पू. १२३ मध्यें सेक्स्टिअस क्लॅव्हिनस या रोमन कॉन्सलनें केली इतका या शहराचा इतिहास जुना आहे.