विभाग नववा : ई-अंशुमान
एक्स-ला-चॅपेल - कोलोनच्या पश्चिमेस ४४ मैलांवर बेल्जियम व डच सरहद्दीजवळ एका रमणीय खिंडींत वसलेलें प्रशियाच्या राज्यांतील जर्मनीचें एक शहर आहे. या शहराच्या स्थानिक स्वराज्याची सीमा दोन्ही देशांच्या सरहद्दींनां जाऊन भिडली आहे. शहराच्या आसमंताद्भागीं खनिजोदकाचे झरे आहेत. लोकसंख्या (१९०५) १४३९०६ होती. येथून पूर्वेस कोलोनशीं व ड्युसेल्डॉर्फशीं, आणि पश्चिमेस लीज-ब्रुसेल्सशीं व मेस्ट्रिच-अँट-वर्पशीं, लोहमार्गांनीं दळणवळण ठेवतां येत असल्यामुळें, या ठिकाणचा व्यापार फार भरभराटींत आहे. मध्यभागीं कसबा असून, त्याच्या सभोंवतीं असलेला जुना कोट पाडून त्याठिकाणीं आतां सहल करण्याकरितां मार्ग केले आहेत. या रस्त्याच्या पलीकडे नवें शहर व उपनगरें वसलीं आहेत. एक्स-ला-चॅपेल येथें एखाद्या जुन्या मध्ययुगीन शहरापेक्षां आधुनिक तर्हाच अधिक दृष्टोत्पत्तीस येते.
नगरभवन ही १४ व्या शतकांत चार्लेमॅग्नेच्या राजवाड्याच्या जागेवर बांधलेली गॉथिक पद्धतीची एक इमारत आहे. नगरभवनाच्या मागें ग्रॅसहाउस नावांची जी इमारत आहे. तिच्यांत रोमनलोकांचा राजा कार्नवालचा रिचर्ड याचा दरबार भरत असे. हल्लीं या ठिकाणीं स्थानिक स्वराज्याचे जुने कागदपत्र ठेविले आहेत. येथील कॅथीड्रल ही ऐतिहासिक व शिल्पकलेच्या दृष्टीनें फारच महत्त्वाची इमारत आहे. हिच्यांतील जो जुना भाग आहे तो बांधण्यास इ. स. ७९५ मध्यें चार्लेमॅग्नेच्या देखरेखीखालीं सुरूवात झाली. हिच्या गाभार्याखालीं चार्लेमॅग्नेची कबर होती असें म्हणतात. त्या बादशहाच्या अस्थी कॅथीड्रलच्या एका भागांत अजून जतन करून ठेविल्या आहेत. याशिवाय येथें आणखी कित्येक पुरातन गोष्टींचे अवशेष आहेत. त्यापैकीं जे विशेष महत्त्वाचे आहेत ते दर सातव्या वर्षी दाखवावयास काढतात.
याशिवाय येथें जर्मन डच व प्लेमिश चित्रकारांच्या उत्तम उत्तम कामांचा संग्रह असलेला अजबखाना, सार्वजनिक ग्रंथसंग्रहालय, खाणीचें व विद्युच्छास्त्राचे काम शिकविण्याची पाठशाळा, नाटकगृह, पोस्टऑफिस नवें रेल्वेस्टेशन आणि कलाविज्ञानाची शाळा या दुसर्या कांहीं पाहण्यालायक गोष्टी आहेत. याठिकाणीं जीं कांहीं सुरेख सार्वजनिक स्मारकें आहेत त्यांत बाजार चौकांत असलेलें कारंजें व चार्लेमॅग्नेचा पुतळा आणि नाटकगृहासमोरचा पहिल्या विल्यम बादशहाचा ब्राँझ धातूचा अश्वारोही पुतळा, ह्याची गणना होते.
येथील गंधकयुक्त ऊन पाण्याचे झरे रोमन लोकांस माहीत होते. त्याचें पाणी कित्येक शतकांपासून संधिवात, वातरक्त व गंडमाळा या विकारांवर रामबाण औषध समजलें जात आहे. येथें एकंदर ६ झरे आहेत. त्यांपैकीं एकाचें उष्णमान फॅरेनहीटचे १३६० इतकें असतें. यापेक्षांहि अधिक ऊन पाण्याचे झरे आसमंतात आहेत.
व्यापारांत व उद्योगधंद्यांत या शहराचा दर्जा बराच वर लागतो. येथें सुती व रेशमी वस्त्रें करण्याचें मोठमोठे कारखाने आहेत. आसपास कोळशाच्या बर्याच चांगल्या खाणी निघाल्यामुळें, याठिकाणीं बहुतेक सर्व प्रकारच्या लोखंडी कामाचे कारखाने आहेत. याशिवाय मद्य व रासायनिक द्रव्येंहि येथें तयार होतात. धान्य, कमावलेलें कातडें, मद्य व इमारतीचें लांकूड हे येथील व्यापाराचे जिन्नस आहेत. येथें नांमांकित विमाकंपन्या आहेत व शहरांत मोठ्या प्रमाणावर सावकारी चालते.
आठव्या शतकांत चार्लेमॅग्नेनें येथें एक भव्य राजवाडा बांधला व आपल्या साम्राज्यांत याला दुसर्या प्रतीचें शहर केलें, इतकेंच नव्हे तर त्यावेळीं कांहीं काळपर्यंत हें शहर पाश्चात्य ज्ञान व सुधारणा यांचें केंद्रस्थान होतें. या शहराला महत्त्व येण्याचें हेंच कारण होय. ८१३ पासून १५३१ पर्यंत येथें जर्मन राजांचे व बादशहांचे राज्याभिषेक समारंभ होत असत. इ. स. १३०० त या शहराच्या भोवतालचा कोट बांधून तयार झाला. १४ व्या शतकांत हें रोमन साम्राज्यांतील एक स्वतंत्र शहर झालें. सोळाव्या शतकांत एक्स-ला-चॅपेलच्या हालास सुरवात झाली. हें फ्रान्सच्या सरहद्दीला लागूनच असल्यामुळें सुरक्षित राहणें शक्य नव्हतें. यूरोपांतील धार्मिक सुधारणेमुळेंहि या शहरास पुष्कळ त्रास झाला. १८०१ मधील लुनेव्हिले च्या तहानें हें फ्रान्सकडे आलें. परंतु पुढें व्हिएन्नाच्या काँग्रेसनें तें प्रशियाला दिलें गेलें.
याठिकाणीं एकंदर तीन महापरिषदा भरल्या:-(१) १६६८ च्या मेच्या २ र्या तारखेस जी येथें प्रतिनिधिसभा भरली होती तिच्यांत प्रक्रांति युद्धा [बॉर ऑफ डेव्होल्यूशन] नंतर झालेल्या तहावर सह्या झाल्या. (२) दुसरी परिषद आस्ट्रियन वारसासंबंधीं चाललेल्या युद्धाचा निकाल लावण्याकरितां, ता. २४ एप्रिल सन १७४८ रोजीं येथें झाली. आणि (३) तिसरी व शेवटची परिषद इ. स. १८१८ मध्यें, फ्रान्समधून दोस्तराष्ट्रांचें सैन्य काढून घ्यावयाचें किंवा नाहीं, व याउपर ग्रेटब्रिटन, आस्ट्रिया, प्रशिया, व रशिया या राष्ट्रांचे एकमेकांशीं, व फ्रान्सशीं कोणत्या प्रकारचे संबंध रहावयाचे या दोन प्रश्नांचा विचार करण्याकरितां भरली.