विभाग नववा : ई-अंशुमान
एटना - एटना हा ज्वालामुखी पर्वत सिसिली बेटाच्या पूर्व किनार्यावर आहे. १९०० सालीं याची उंची मोजली ती १००५८ फुट भरली; १८६१ त ती १०८०० होती. यानें ४६० चौ. मे. (जागा) क्षेत्रफळ व्यापलें आहे. याचा आकार छिन्नशंक्काकृति असून पश्चिमेकडे एक ३ मैल रूंदीचें खिंडार आहे. याशिवाय आजूबाजूस अनेक शंक्काकृति टेंकाडें आहेत. याचे वनस्पतींच्या वाढीच्या दृष्टीनें तीन भाग पडतात. सर्वांत खालचा (३००० फूट पर्यंत). अत्यंत सुपीक असून तेथें वस्तीहि बरीच दाट आहे. याच्या वरील भागांत देवदार व बचवुड, ओक, चेस्टनट इ. झाडें बरींच आहेत. तिसर्या व शेंवटल्या कक्षेंत झाडी कमीच आहे व आल्पसमधील वनस्पतींचा येथें पूर्ण आभाव आहे. येथें प्राणी मुळींच दृष्टीस पडत नाहींत. कारण येथें बरेच दिवस बर्फ असतें. उन्हाळ्यांत किंवा पावसाळ्यांत वर चढणें सोईस्कर असतें. निकोलोसी गांवापासून वर पोंचण्यास ८ तास लागतात. याचा खालीं दिलेल्या सनांत स्फोट झाला होता. ख्रि. पू. १२५, १२१, ४३ ख्रिस्तोत्तर - १६२९, १८३०-५२-६५-७९-८३-९२-९९ व १९१०.
व्हेसुव्हियसहून एटना हा अधिक प्राचीन आहे. या पर्वताच्या पूर्व पायथ्यावर टेझा येथें जे-बॅसॉल्टिक (हा एक मऊ व लोखंडासारखा काळा दगड असून भूगर्भांतून किंवा ज्वालामुखींतून बाहेर पडणार्या उष्णप्रवाही पदार्थांपासून उप्तन्न होतो.) दगड सांपडतात त्यांवर प्रस्तरीभूत वनस्पतीसह मातीचा थर दिसतो. एटनाचे प्रथमचे स्फोट मध्य व उत्तर यूरोपांतील ग्लेशियर कालाहूनहि जुने आहेत. फार प्राचीन कालापासून हा पर्वत म्हणजे एक दंतकथांचा विषयच होऊन बसला आहे.