विभाग नववा : ई-अंशुमान
एटूरिया - हा इटलीचा एक प्राचीन प्रांत होय. प्राचीन काळीं या प्रांतांत टैबरपासून तो आल्प्सपर्यंतच्या उत्तर इटलीच्या मुलुखाचा समावेश होत असे. ख्रि. पू. ५ व्या शतकाच्या अखेरिस या प्रांताचा विस्तार बराच कमी करण्यांत आला. ख्रि. पू. १०० व्या वर्षी यांत अॅपेनाइन्सपासून टैबर पर्यंतचाच टाप मोडत असे. ऑगस्टस बादशहाच्या कारकीर्दीत इटलीचे जे सात भाग पाडण्यांत आले त्यांत एट्रूरिया हा सातवा भाग गणला जाऊन त्याच्यामध्यें मॅक्रा नदीपर्यतचा उत्तरेकडील भाग समाविष्ट झाला.
इ ति हा स : एट्रूरियाचा विश्वसनीय इतिहास फारच अल्प आहे. इतर राष्ट्रांप्रमाणेंच या राष्ट्राचीहि एकवार सद्दी होती; व ख्रि. पू. ६ व्या शतकापूर्वी एट्रूरियन लोकांनीं स्वार्या करून, उत्तरेकडील मँटुआ, फोल्सिना, मेलपम इत्यादि ठिकाणें व दक्षिणेस लॅटियम व कॅंम्पेनिया हीं ठिकाणें काबीज करून त्यांवर आपली सत्ता प्रस्थापित केली होती. रोमच्या प्राचीन इतिहासांत, एट्रूरियाच्या लोकांनीं महत्त्वाची कामगिरी बजावली होती. रोम शहरांत ज्या तीन महत्त्वाच्या जातींच्या लोकांचें वर्चस्व होतें त्यांत एट्रूस्कन अगर एट्रूरियन लोकांची गणना होते. टार्क्विन राजाच्या अमदानींत एट्रूरियाची चांगली भरभराट झाली होती.
पण टार्क्विन राजांची ज्या वेळीं हकालपट्टी झाली त्या वेळेपासून एट्रूरियाला उतरती कळा लागण्यास प्रारंभ झाला. पूर्ववैभव मिळविण्यासाठीं एट्रूरियानें खटपट केली नाहीं असें नाहीं; पण एट्रूरियानें पूर्वीचा जम पुन्हां बसवितां आला नाहीं. कांहीं कांहीं भागावर विशेषत: टिर्हेनियम समुद्रावर यांची सत्ता होतीं असें दिसतें. पण ख्रि. पू. ४७४ सालीं सिरॅक्यूजच्या हीरो राजानें एट्रूस्कन लोकांच्या आरमाराचा विध्वंस केला; व एट्रूस्कन लोकांची आरमारी सत्ता नष्टश्ट केली. पुढें गॉल लोकांनीं, एट्रूरिया सरकमपदना म्हणजे राव्हेना व हॅड्रिया वगैरे प्रांत बळकावून घेतले. ख्रि. पू. ४२३ मध्यें कॅम्पेनिया हें सॅमनाइट्स लोकांनीं ताब्यांत घेतलें व व्हीइ शहर हें ख्रि. पू. ३९६ मध्यें रोमन लोकांच्या हातीं आलें. व्हॅडीमोनियन सरोवरावरील लढाईनें (ख्रि. पू. ३०९) तर एटुस्कन लोकांची सत्ता जवळ जवळ नष्ट झाल्यासारखीच झाली. पुढें एकदोन शतकें एट्रूस्कन लोक कसेबसे कांहीं शहरांवर आपला अंमल गालवीत होते; पण त्यानंतर एट्रूरिया हें रोमचाच एक भाग बनून गेलें.
लो क :-एट्रूस्कन लोक एट्रूरियांतील मूळचे रहिवाशी नव्हते. प्रथमत: ते लीडियामधून आले असावेत असें दिसतें. तत्पूर्वी उत्तरेकडून रसेना नांवाच्या जातीच्या लोकांनीं एटुरियामध्यें वस्ति केली होती, व नंतर पूर्वेकडून लीडियन लोकहि त्या ठिकाणीं आले असावेत. या दोन्ही जाती मिळून हल्लीचें एट्रुस्कन लोक झाले असावेत असा विद्वानांचा अभिप्राय आहे.
श ह रें व शा स न सं स्था :- एट्रूरियामध्यें व्हीइ, टार्क्विनी, कॅलेरी, केरे, वोल्सी, बोत्सिना, क्रूशियम, अरेटियम, कोर्टोना, पेरूशिया, वोल्टेरा, रसेले, पॉप्यूलोनियम, व फेशूले इत्यादि शहरें मोडली जात होतीं. या शहरांमध्यें दाट वस्ती असावी असें त्या टापूंत सांपडलेल्या नष्ट वस्तूंवरून दिसून येतें. एट्रूरियाची राज्यव्यवस्था लोकनियुक्त राजावडे सोपवली जात असे. पण राजाला देखील त्या प्रदेशांतील सरदार लोकांच्या तंत्रानें व त्या प्रदेशांतील शहरांच्या पुढार्यांच्या तंत्रानेंच राज्यकारभार चालविणें भाग पडे. पुढें तर या राजांची सत्ता नष्ट होऊन प्रत्येक शहराची व्यवस्था पहाण्याचें काम त्या त्या शहराचा जो नगराध्यक्ष त्याच्याकडेच आलें व त्यानंतर, या नगराध्यक्षांच्या ताब्यांतील सत्ता लोकांकडे आली. रोमची शासनपद्धति एट्रूरियाच्या शासन पद्धतीचें अनुकरण करून बनली असावी असें दिसतें. एट्रूरियांतील १२ शहरांचा एक संघ असून त्याची बैठक बोल्टम्माच्या देवळांत भरली होती असें लिव्हीनें लिहिलें आहे. त्यावरून त्यावेळीं लोकशाहीची कल्पना रूढ असावी असें दिसतें. प्रत्येक शहराची राज्यव्यवस्था निरनिराळीं खातीं पाडून चालविली जात असें. एट्रूरियन लोकांचे 'लिब्री डिसिप्लिने एट्रुस्के' या नांवाचे एक कायदेपुस्तक असून त्यांत राज्यकारभारासंबंधींची माहिती विस्तृत रीतीनें पहावयास मिळते.
चा ली री ति :- एट्रुस्कन लोकांच्या चित्रकलेचे जे अवशेष व्हीइ, कॉर्नेटो क्लशियम इत्यादि ठिकाणीं पहावयास मिळतात, त्यांवरून या लोकांच्या चालीरीतीविषयीं थोडी फार माहिती मिळते. हे लोक फार चैनी असावेत असें दिसून येतें. त्यांचा प्रदेश फार सुपीक असल्यामुळें चैनीला पुरण्याइतका पैसा त्यांना जमीनीच्या उत्पन्नावर मिळत असे. त्यांचीं घरें मोठमोठ्या वाड्याएवढीं असून, ती नेंहमीं शृंषृंगारलेलीं असत. सोन्याचांदीच्या भांड्यांची घरांत समृद्धि असे. ख्यालीखुशालींत हे लोक आपला वेळ घालवीत असत. वेश्यांचा त्यावेळीं फार भरणा असे. रोमन लोकांप्रमाणेंच एट्रुस्कन लोकांचा पोषाख होता. फक्त त्यांचे जोडे मात्र निराळ्या पद्धतीचे होते. जोड्यांचा खालचा भाग लांकडी असून वरचा भाग कातड्याचा असे. शिकार करणें, निरनिराळे मर्दांनी खेळ खेळणें, इत्यादि त्यांचे व्यवसाय असत. नृत्यगीतांची त्यांना फार आवड असे.
उ द्यो ग धं दे :- एट्रुस्कन हे जातीचे लढवय्ये लोक असल्यामुळें त्यांच्यांत व्यापारी वृत्तीचा बराच अभाव होता. देशोदेशीं आपला माल खपविण्यासाठीं हिंडण्याची त्यांना मुळीच संवय नसे. परदेशचे व्यापारीच एट्रुरियामध्यें येऊन तेथील माल खरेदी करीत असत. शेतकी व जंगल यांपासून त्यांना मुबलक धनप्राप्ती होत असे. निरनिराळ्या प्रकारच्या धातूचीहि या प्रदेशांत पैदास होत असे. सोन्याच्या अगर कथलाच्या खाणी जरी एट्रुरियांत नव्हत्या तरी, एट्रुरियाच्या बाजारांत चोहों दिशेचे व्यापारी जमत असल्यामुळें सोन्याचा व इतर धातूंचा व्यापार या ठिकाणीं मोठ्या प्रमाणावर होत असे. धातूंची भांडीं तयार करण्याचें काम या ठिकाणीं फारसें होत नसे; इतर देशाचे व्यापारीच निरनिराळीं नक्षीदार भांडीं तयार करून एट्रुरियाच्या बाजारांत आणीत असत.
क ला कु स रीं चीं का में :- एट्रूरियामध्यें कलाकुसरींचीं कामें फारशीं होत नसत. एट्रूरियामध्यें ज्या कुसरीच्या वस्तू आढळल्या त्यांजवरून एट्रूरियन लोकांमध्यें कलाकुसरींचीं कामें होत असत असें समजलें जात असे. पण शोधाअंतीं आतां असें सिद्ध झालें आहे कीं एट्रूरियामध्यें ज्या कलाकुसरींच्या वस्तू सांपडत असत त्या एट्रुस्कन लोकांनीं तयार केलेल्या नसून ग्रीक अगर सिसिलियन लोकांनीं तयार केलेल्या होत्या. एट्रुस्कन लोकांचीं जीं अस्थिपात्रें अगर खडकांमध्यें खोदलेलीं थडगीं उपलब्ध झालीं आहेत तीं पाहिलीं असतां, एट्रुस्कन लोकांचीं घरें कशा प्रकारची होतीं त्याची कल्पना करतां येते. या थडग्यांची बांधणी लक्षपूर्वक पाहिली तर तीवरून या लोकांचीं घरें अगदीं साधीं असलीं पाहिजेत असें प्रत्ययास येतें. शिल्पकौशल्य यांत मुळींच आढळून येत नाहीं. देवळांच्याकडे पाहिलें तर ग्रीक लोकांच्या शिल्परचनेची हीं केवळ नक्कल होत असें स्पष्ट दिसते. नाटकगृहें, अगर सभागृहें देखील शिल्पशास्त्राच्या दृष्टिनें शिल्पकौशल्यहीन दिसतात. खोदकाम, सोन्याचांदीचे दागिने तयार करणें इत्यादि. दुय्यम प्रकारच्या कलाकुसरींच्या कामांत मात्र यांनीं थोडीफार प्रगति केली होती. भांडीं तयार करण्याच्या कलेंत देखील त्यांनीं ग्रीक व आयोनियन लोकांचें अनुकरण केलेलें दिसतें. ब्राँझ धातूचा उपयोग मोठ्या प्रमाणावर केला जात असे. या धातूंचीं हत्यारें व ढाला केल्या जात असत. या हत्यारांवर व ढालींवर निरनिराळीं चित्रें खोदलीं जात असत. ब्राँझ धातू व लांकूड यांवर खोदकाम करण्याचा प्रघात असे. अशा प्रकारें ब्राँझ धातू ओतून तयार केलेले अनेक पुतळे एट्रूरियांत सांपडले आहेत व ते एकदरींत बरे साधलेले आहेत. संगमरवरी दगडाची वाण असल्यामुळें संगमरवरी दगडांचा उपयोग खोदकामासाठीं क्वचितच करण्यांत येई. चित्रकलेच्या बाबतींत मात्र यांनीं बरीच प्रगति केलेली दिसते. टार्क्विनी, व्होल्सी, व्हीइ इत्यादि शहरांतील भिंतींवर जीं चित्रें काढलेलीं आढळतात तीं चित्रकलेच्या दृष्टिनें उच्च दर्जाचीं आढळतात. या बाबतींत देखील ग्रीक चित्रकलेची छटा दिसून येते.
ध र्म :- 'चांगले व वाईट, पाप व पुण्य, या द्वंद्वांचें अस्तित्व या जगांत आहे असें हे लोक मानीत. इष्ट गोष्टी करणारा ज्याप्रमाणें देव, त्याप्रमाणें सैतान नामक अनिष्ट गोष्टी घडवून आणणारी एक शक्ति आहे असा याचा समज असे. या दुष्ट शक्तीच्या आज्ञेनेंच धरणीकंप, वादळ इत्यादि भयंकर गोष्टी घडून येतात; यांचें निवारण करण्यासाठीं या शक्तीला मनुष्याचा बळी देऊन संतुष्ट केले पाहिजे अशी यांची समजूत आहे. देवतांचे 'डी कन्सेंटीस' अगर गौण देवता व 'डी इनव्होल्यूटी' अगर प्रधानदेवता असे दोन वर्ग पाडलेले दिसतात ज्यूपीटर, जूनो, मिनर्व्हा या देवता गौण होत. ग्रीक देवता अगर मध्य एशियांतील देवतां यांनां देखील त्यांनीं आपल्या देवतासंघांत स्थान दिलेलें आढळतें. अशा प्रकारें देवतांचा भरणा या लोकांच्या धर्मांत असल्यामुळें एट्रूरियामध्यें उपाध्यायांचा खर्च बराच मोठा होता; व त्या काळीं एट्रूरियन उपाध्यायांची प्रसिद्धि फार दूरवर पसरलेली होती असें दिसतें.
भा षा :- एट्रुस्कन लोक आपल्या भाषेला रसेना म्हणून म्हणत असत असें डायोनिशियस हलिक यानें म्हटलें आहे. या एट्रुस्कन भाषेचा प्रसार, निरनिराळ्या भागांत झाला होता असें दिसतें. दक्षिणेकडील एट्रुस्कन भाषा व उत्तरेकडील एट्रस्कन भाषा असे या भाषेचे दोन नमुने आढळून येतात. ख्रि. पू. ३०० ते १५० या काळाच्या दरम्यान इटलीच्या उत्तर भागांत एट्रुस्कन भाषा दोन प्रकारच्या अक्षरपद्धतींत लिहिलेली आढळते. १८८५ मध्यें लेमनॉस बेटांत ग्रीकपूर्व काळांतील थडग्यांतील लेख सांपडला आहे. त्या थडग्याच्या बांधण्याच्या पद्धतीवरून. व त्या थडग्यावरील लेखांतील अक्षरांचे एट्रुस्कन अक्षरांशीं साम्य दिसत असल्यामुळें तो लेख प्राचीन एट्रुस्कन भाषेंत लिहिला आहे असें विद्वानांनीं ठरविलें आहे.
एट्रुस्कन भाषेंतील शिलालेख हल्लीं बरेच उपलब्ध झालेले आहेत. लेप्सियस यानें प्रथमत: एट्रुस्कन भाषेंतील अक्षरें किती आहेत हें ठरविलें त्या भाषेंत १९ अक्षरें आहेत व त्यांपैकीं कांहीं अक्षरें निरनिराळ्या ठिकाणीं निरनिराळ्या तर्हेनें लिहिलीं जातात असें त्यानें सिद्ध केलें.
अशा रीतीनें एट्रुस्कन भाषेंतील अक्षरें स्थूल रीतीनें निश्चित झाल्यानंतर त्या भाषेंतील व्याकरणाकडे विद्वानांचें लक्ष वेधलें. एट्रुस्कन भाषेंशीं साम्य असलेल्या इतर भाषांच्या व्याकरणांच्या आधारें या भाषेंतील वाक्यरचना वगैरे कशी आहे हे ठरविण्याचे प्रयत्न सुरू झाले पण त्यांत फारच थोडें यश आलें. कारण वरील प्रकारची व्याकरण ठरविण्याची दिशा चुकीची होती. याच्या उलट, डीके, पॉली इत्यादी विद्वानांनीं या भाषेंतील शिलालेख व इतर वाङ्मय परस्परांशीं ताडून पाहून तद्वारां व्याकरण निश्चय करण्यास सुरूवात केली व त्याला हळू हळू यश येत चाललें आहे. त्यावरून एट्रुस्कन भाषा हीं इंडोयूरोपीय भाषा नाहीं असें सिद्ध झालें आहे.
[संदर्भग्रंथ- डेनिस-सिटीज अँड सिमेट्रीज ऑफ एट्रूरिया; मेरीव्हेल-हिस्टरी ऑफ रोम; ड्राकबरो-हिस्टरी ऑफ रोम].