विभाग नववा : ई-अंशुमान

एड्रियन :- या नांवाचे सहा धर्मगुरू (पोप) इतालींत होऊन गेले.

प हि ला ए ड्रि य न :- (७७२-७९५) हा शार्लमेन बादशहाचा समकाकलीन होता. याचें व शार्लमेन बादशहाचें चांगलें सख्य होतें. लँबर्डीक राजानें एड्रियनच्या मुलुखांत स्वारी केली तेव्हां शार्लमेन बादशहानें एड्रियन यास फार मदत केली. जरी या दोन थोर पुरूषांमध्यें ख्रिस्ताच्या मूर्तीची पूजा करावी किंवा न करावी याबद्दल मतभेद होता तरी यांचें सख्य शेवटपर्यंत कायम राहिलें.

दु स रा (८६७ ८७२).- यानें पहिल्या एड्रियनप्रमाणें फ्रान्स देशाच्या बादशहाशीं सख्य ठेवण्याचा प्रयत्‍न केला. पण त्यास फ्रेंचांचा बादशहा दुसरा लुई याच्या मनाप्रमाणें चालावें लागत असे.

ति स रा (८८४-८८५):- हा वर्म्स गांवास जात असतांना वाटेंत मरण पावला.

च व था :- (११५४-११५९):- धर्मगुरूच्या गादीवर बसलेला हा एकटाच इंग्रज होय. याचा जन्म ११०० मध्यें हटफर्ड परगण्यांत लांगले गांवी झाला. हा पॅरिस शहरीं गेला व ११३७ सालीं यास प्रथम प्रायर व नंतर अ‍ॅबट नेमिलें. तिसर्‍या युजोन्सिनें यास अलबानो येथें कार्डीनलची बहुमानाची जागा दिली. ११५२ ते ११५४ पर्यंत हा स्कँन्डिनेव्हियांत होता. ११५४ सालीं हा धर्मगुरू झाला. पुढें हा, रोमची सेनेट सभा व तेथील बादशहा यांमध्यें तंटेबखेडे उत्पन्न झाल्यावरून यास रोम शहर कायमचेंच सोडावें लागलें.

पां च वा :- हा १२६६ मध्यें धर्मगुरू झाला व त्याच वर्षी जुलै महिन्यांत मरण पावला.

स हा वा :- (१५२२-२३):- जन्म (१४५९) युट्रेच शहरीं. लहानपणीं धर्मशास्त्र, ख्रिस्तीधर्माचे कायदेकानुन व तत्त्वज्ञान यांचा यानें अभ्यास केला व त्यांत बरेंच प्रावीण्य संपादन केलें. हा पांचव्या चार्लस बादशहाचा शिक्षक होता. पुढें स्पेन देशांत पाखंडी मताच्या लोकांची चौकशी करणार्‍या सभेचा हा मुख्य होता. या चौकशीसंबंधानें यानें बर्‍याच सुधारणा केल्या. १५२२ सालीं हा धर्मगुरू झाला. यानें धर्मखात्यांत माजलेली अंदाधुंदी नाहींशीं करण्याचा प्रयत्‍न केला. यूरोपांतील ख्रिस्ती राजांत एकी करण्याच्या प्रयत्‍नांत यास यश आलें नाहीं. लथूर यास पाखंडी म्हणून शिक्षा व्हावी असें याचें मत होतें. हा १५२३ सालीं मरण पावला.