विभाग नववा : ई-अंशुमान
एदलाबाद :- (१). -मुंबई. पूर्व खानदेश. एदलाबाद पेट्याचें मुख्य ठिकाण. लो. सं. सुमारें तीन हजार. मोंगलांनीं हें गांव घेतलें त्यावेळीं हें भरभराटींत असून येथें एक बारमाही पाणी असलेला तलाव होता (१६००). याच्या भोंवती एक. चांगला तट असून येथें एक जुना किल्ला होता असें याचें १७५० मध्यें वर्णन केलेलें आहे. आतां सर्व गांव पडकें दिसतें. येथील किल्ला मोंगलांनीं बांधला असें सांगतात. हल्लीं हा पडून गेला आहे. याखेरीज कांहीं जुन्या इमारतींचे अवशेष व विहिरी आढळतात. येथें महालकरी असतो.
(२) मुंबई धारवाड जिल्हा शेगांवच्या पश्चिमेस चार मैलांवर हें एक ओसाड खेडे आहे. येथें एक पवित्र मानलेली गंगाभावी नावाची विहीर असून जानेवारी महिन्यांत येथें जत्रा भरते व त्यावेळीं २००० पर्यंत यात्रेकरू जमतात. विहिरीच्या आसपास सुंदर आमराई आहे. विहिरींतून एक लहानशा ओझ्याचा उगम झाला आहे. कामेश्वराचें देऊळ असून त्यांतील लिंग स्वयंभू आहे असें मानतात. विहिरीच्या वायव्येस एक लेणें असून त्या ठिकाणीं जन्हू साधु राहत असे असें म्हणतात. याविषयीं आख्याइका अशी आहे कीं, हा साधु विहिरीचें सर्व पाणी पिऊन ती कोरडी ठणठणीत करीत असे व पुन्हा कानावाटे पाणी ती पूर्ववत् करीत असे. या देवळास इनाम जमीन असून ती देवाची पूजा करणार्या व देवळांत दिवा लावणार्या पुजार्याकडे आहे. मकरसंक्रांतील येथें जत्रा भरते. या विहिरींत स्नान करून देवाची पूजा केली असतां तापानें पछाडलेला रोगी बरा होतो असा समज आहे.