विभाग नववा : ई-अंशुमान
एनॅमल - (कांच मिना)(अ) कांचमिना देणें म्हणजे कांचेच्या रसानें एखादें पात्र मढविणें होय. हा सिलिका, शेंदूर (मिनिअम)आणि पोट्याशच्या रासायनिक मित्रणानें बनलेला रस धातूंच्या प्राणिदांशीं भट्टींमध्यें द्रवरूप असतां मिश्र करून निरनिराळ्या रंगांत तयार करतां येतो. हल्लीं एनॅमल म्हणजे अशा कांचरसानें भांड्यावर काढलेलीं रंगीत चित्रें वगैरे समजतात.
(आ) धातूंवरील कांचमिना अगर एनॅमल हें मातीवरील मिन्यासारखेंच असतें, पण त्यांत पुढीलप्रमाणें थोडे फरक दाखवितां येतील:-मातीवरील मिना थंड अथवा कच्च्या स्थितींत करतां येतो व धातूवर मिना करणें झाल्यास भट्टींतून गरम स्थितींतच करावा लागतो. केव्हा केव्हा जाहिराच्या पाट्या तयार करतांना लोखंडावर निन्याच्या कामाचें मिश्रण मातीवरील कच्च्या कामाप्रमाणेंच कलेलें आढळते.
प्राचीन असुरियन व ईजिप्शियन मातीचीं भांडीं व विटा यांवरील एनॅमलिंगमध्यें बरीच प्रगति झाली होती अद्यापपावेतों टेल-एल-येहूदिया येथील तिसर्या रामेसिसचा राजवाडा व बाबिलोनियांत सांपडलेल्या निमरूडच्या राजवाड्यावरील धातूचें एनॅमलिंग काम नि:संशय उच्च दर्जाचें गणेलें जात आहे.
अंगावर घालावयाच्या दागिन्यांत व इतर शोभेच्या वस्तूंत कांचमिना वापरल्याचीं उदाहरणें जुन्या ग्रीक व रोमन लोकांतून आढळून येतात. चवथ्या शिल्पकारांनीं ख्रि. पू. चवथ्या व पांचव्या शतकांत कांचमिन्यावर जास्त परिश्रम केल्याचें दिसतें. जुन्या रोमन लोकांत प्राचीन ग्रीक लोकांचें अनुकरण करण्याची प्रवृत्ति जास्त असल्यानें ही कांचमिन्याची कला फार वाढली नाहीं. तथापि रोमन व एट्रुस्कन लोकांनीं केलेल्या कांचमिन्याच्या कामांत बरीच कल्पकता दाखविली आहे. बहुश: प्राचीन कांचमिन्याचीं कामें हीं सर्व सोनें व रूपें या धातूंवर केलेलीं आढळतात. पुढें या असल्या कामास ग्राहकांची वाण पडूं लागली व उच्च दर्जाचें सोन्यारूप्यावरील कांचमिन्याचें काम जवळ जवळ लुप्त झालें.
सहाव्या शतकापासून नवव्या शतकापर्यंत इंग्लंडमध्यें केल्टिक व सॅक्सन् लोकांचीं कांचमिन्यांचीं कामें दृष्टीस पडतात. आयर्लंडमधील डब्लिन येथील पदार्थसंग्रहालयांत असलेला विख्यात आरडाव पेला हें सॅक्सन लोकांचें या कलेंतील कौशल्याचें स्मारक होय. या पेल्यासारखीं दुसरीं पुष्कळ कामें केलीं गेलीं होतीं पण त्यांतील मिन्यांत कौशल्य नसून फक्त मिन्याच्या कलेची प्राथमिक अवस्था आढळते. ब्रिटीश पदार्थसंग्रहालय अथवा अजबखान्यांत एक ढाल आहे. तीवरील लाल कांचमिन्याचें काम अवर्णनीय आहे.
मिन्याची कला आयर्लंडमधून बिझांशिअममध्यें गेल्याचें दिसतें. या ठिकाणीं ही कला बरीच वाढीस लागली होती. इ. स. ११०५ सालचें अत्युत्तम मिन्याचें काम म्हणजे ''पाल डी ओरो'' (व्हेनिस येथील सेंट मार्कच्या देवळाकरितां पडदा) कान्स्टान्टिनोपलहून आणल्याचा दाखला आहें. हें काम क्लॉइसोन मिन्याचें आहे.
कां च मि न्या चे रं ग :- कांचमिन्यांतील रंगांत लाल, निळा आणि पिंवळा हे रंग थोड्या सफेत व काळ्या रंगाशीं मुख्यत: मिश्रित असतात. यांतून केव्हां केव्हां हिरवा व करडा हे दुय्यम रंग म्हणून वापरतात. बिझांशिअममधील सर्व कांचमिन्याच्या कामांतून सूक्ष्म रंगाच्या नाजूक छटा आढळून येत नाहींत. तशीच कांचमिन्याची पद्धत पण थोडी निराळी असल्याची दिसते. बिझांशिअम पद्धतींत रंग नेहमीं निरनिराळें खांचे पाडून एकमेकांशेजारीं भरलेले दिसतात व जवळ येणारे रंग द्रवरूप असतांना देखील ते परस्परांत मिसळत नाहींत. बिझांशिअमचीं कांचमिन्याचीं कामें यूरोपमध्यें सर्वत्र दृष्टीस पडतात.
पंधराव्या शतकाच्या अखेरीस या कलेंत झपाट्यानें वाढ झाली. इतकेंच नव्हे तर तिच्या पद्धतींतहि बरेच बदल झाले. १५ व्या शतकापर्यंत मिन्याचें काम करावयाचें म्हणजे धातूच्या पात्रावर खांचा पाडाव्या लागत व त्यांत मिना रहात असे, ही कल्पना रत्ने किंवा खडे बसविण्यासारखीच होती याच सुमारास असें आढळून आलें कीं, धातूला मिना चढवावयाचा असल्यास तो राहण्याकरितां धातूंत खांचा पाडून कोंदणें करण्याची जरूर लागत नाहीं. त्याऐवजीं खाचांच्या दोहों बांजूस मिना देऊन नंतर या मिन्यावर दुसरें मिन्याचें पूट द्यावें म्हणजे झालें. या दुसर्या पुटानें पहिल्या मिन्याला धक्का पोंचत नाहीं.
आतांपर्यंत बहुतेक कांचमिन्याच्या चित्रांत काळ्या पुष्ठभागावर पांढर्या रंगांत काम केलेलें असे. हा पांढरेपणा ज्या ठिकाणीं दाट मिना असेल तेथें विशेष दिसत असे आणि पातळ थर बसलेल्या भागावर तेंच एनॅमिल किंचित् करडें दिसें. या योगानें प्रकाश व छाया यांचें कांहींसे द्दश्य दिसत असे. या प्रकाराला ग्रिसाइल म्हणत; परंतु केवळ हाच प्रकार बराच काळपर्यंत रूढ झाला नाहीं व पुढें तर मिन्यांतील चित्रें व वेलबुट्टी जास्त जास्त नकशीदार होऊं लागली, तथापि या कामांत भांड्याची किंमत मुख्य असून चित्र हें गौण असे. ग्रिसाइल पद्धत ही मातीच्या भांड्यावर एनॅमल करावयाच्या 'पाटे सुरपाटे' या नांवाच्या पद्धतीसारखीच होती व तिच्यांतील चित्ताकर्षकपणा बराचसा भांड्याच्या धातूंवर व आकारावर अवलंबून असे.
असुरी व इजिप्शिअन संस्कृतीच्या कालापासून कांच मिन्याच्या कलेंत मधून मधून प्रगति व लुप्तावस्था अशा क्रिया एकामागून एक अनेक वेळां चाललेल्या दिसतात; परंतु या कलेचें जेव्हां जेव्हां पुनरूज्जीवन झालें त्या प्रत्येक वेळीं या कलेंत मागील सर्व गोष्टी येऊन थोडीफार वाढ होत गेली. पांचशें वर्षांपूर्वीं अखेरचें पुनरूज्जीवन होऊन त्याबरोबर एनॅमल कलेचा नवा जन्म झाला. ही कला पुढें एक शतकपावेतों वाढत गेली. पुढें ही कला पुन:श्च अस्तंगत होऊन बरीच वर्षे लुप्तावस्थेंत राहिली. अलीकडे एनॅमल कलेंत पुष्कळच सुधारणा झाली आहे. शास्त्रीय ज्ञानाच्या प्रगतीमुळें एनॅमलमधील निरनिराळ्या क्रियांचें व कृतींचें ज्ञान वाढत चाललें आहे. कांचमिना हा पदार्थ तयार करणें व तो धातूंवर चढविणें, या क्रिया अधिक चांगल्या होऊं लागल्या आहेत. मुख्य धातू व त्यांचीं इतर धातूं बरोबर मिश्रणें यांच्या ज्ञानाच्या वाढीबरोबर अशुद्ध धातूंपासून शुद्ध धातू कशी तयार करावी व इच्छित आकाराचें भांडें व त्याचा इष्ट त्या आकाराचा पुष्ठभाग कसा तयार करावा हें बरोबर समजूं लागलें आहे. त्याचप्रमाणें दगडी व लांकडी कोळशाऐवजीं वीज व धूर हीं उष्णता देण्याचीं नवीन साधनें उपलब्ध झाल्यामुळें वाटेल तितकें उष्णमान उत्पन्न करता येतें.
कांचमिना हा पदार्थ तयार करण्यांतहि पुष्कळ प्रगति झाली आहे. पूर्वी रंगाचे प्रकार व छटा फार मर्यादित असत; पण आज वाटेल तितक्या जाती व अनेक निरनिराळ्या पाहिजे त्या छटा तसेंच पूर्ण पारदर्शक व अपारदर्शक, कठिण, मऊ असे अनेक गुणधर्म एनॅमलमध्यें सांपडतात. आतां फक्त दोनच असे रंग आहेत कीं, जे अद्यापि आढळले नाहींत. ते म्हणजे कांचरूपांतील स्थितींत असलेला एक अपारदर्शक हिंगुळी व दुसरा लिंबाचा पिंवळा. हल्लीचें एनॅमल शुद्ध चकचकीत व टिकाउ असतें, याचें कारण एनॅमलमधील सर्व घटक पदार्थांचें व त्यांच्या मिश्रणांच्या प्रमाणाचें पूर्ण ज्ञान आज उपलब्ध आहे हें होय.
एनॅमलचा पहिला थर रंगहीन, पारदर्शक व कांचमय मिश्रणारूपाचा असतो. याला फ्लक्स म्हणतात. हा वाळू, शेंदूर आणि पोटॅश यांच्या मिश्रणास आंच देऊन तयार करतात. ह्या फ्लक्स अगर मूळ थरास तो द्रवरूप असतांच निरनिराळ्या धातूंच्या प्राणीदांच्या योगानें रंग देतात. व हा रंग फ्लक्सच्या सर्व भागांत सारखा पसरतो. एनॅमल कठिण अगर मृदु असणें हें वाळूच्या इतर पदार्थांशीं (शेंदूर व पोट्याश) असलेल्या प्रमाणावर अवलंबून असतें. कठिण एनॅमल वितळविण्यास फार आंच द्यावी लागते. एनॅमल जितकें जास्त कठिण असेल तितका त्यावर हवेचा परिणाम कमी होतो. नरम एनॅमल असेल तर हवेचा परिणाम प्रथम पृष्ठभागावर होतो, आणि नंतर सर्व एनॅमलवर तो दृष्टीस पडतो. म्हणून सर्व प्रयोगांतून कठिण जातीचें एनॅमल वापरणें हें जास्त इष्ट होय. त्याकरितां एनॅमल करावयाचीं भांडींहि शुद्ध धातूंचीं वापरणें चांगलें; कारण त्यांवर एनॅमल उत्तम रीतीनें टिकूं शकतें.
ए नॅ म ल म धी ल घ ट का व य व :- जर एनॅमल द्यावयाच्या धातूंत हीन धातूचें मिश्रण जास्त असेल, तर ती धातू एनॅमल लावतांच वितळेल, अगर धातू आणि एनॅमल चिकटून राहणार नाहींत. तसेंच ज्या एनॅमलमध्यें सोडा अथवा पोटॅश जास्त प्रमाणांत व शेंदूर कमी प्रमाणांत असेल त्याला चिरा पडण्याची जास्त भीती असते व तें धातूला चांगलें चिकटूनहि रहात नाहीं.
शुद्ध सोन्याचें अथवा शुद्ध तांब्याचें पातळ भांडें एनॅमल करावयास उत्तम. रूप्याचें भांडें सहसा वापरूं नये व वापरावयाचेंच असल्यास काळजीपूर्वक शुद्ध केलेल्या चांदीचें घ्यावे.
ए नॅ म ल म धी ल रा सा य नि क द्र व्यें :- एनॅमलची चकाकी ही त्यांतील पदार्थांच्या योग्य प्रमाणावर, त्यांचें मिश्रण पूर्णपणें एकजीव होण्यावर अवलंबून असते. मिश्रणाचा पूर्ण एकजीव होणें हें भट्टीला सारखी एकच प्रमाणांत उष्णता मिळण्यावर अवलंबून असतें. यासाठीं उत्तम रीतीनें बनविलेला फ्लक्स अथवा कच्चा एनॅमल रस घेऊन त्यांत आपल्यास ज्याप्रमाणें दाट किंवा फिकट रंग पाहिजे असेल त्या मानानें प्राणिद घालावें. एनॅमलचे रंग कांहीं वेळा प्राणिदांच्या रंगांपेक्षां फ्लक्समधील पदार्थांच्या निरनिराळ्या प्रमाणामुळें बदलतात. उदाहरणार्थ वैडूर्य निळा रंग बनवावयाचा असल्यास कृष्णताम्रप्राणिद (ब्लॅक ऑक्साइड ऑफ कॉपर) मध्यें बर्याच मोठ्या प्रमाणंत सिंधुकर्बित (कारबोनेट ऑफ सोडा) मिसळावा लागतो आणि पिंवळट हिरवा करावयाचा असल्यास त्याच प्राणिदाशीं शेंदुराचें प्रमाण वाढवावे लागतें. कोणतेंहि पारदर्शक एनॅमल आपारदर्शक करणें असल्यास कथिल आणि शिसें यांचें भस्म (कॅल्क्स) त्यांत मिसळावें. पांढरें एनॅमल करावयाचें असल्यास फ्लक्समध्यें स्टॅनिक व आर्सेनिअस अॅसिड घालावें. या अॅसिडच्या कमीअधिक प्रमाणानें एनॅमल दाट अगर पातळ होतें.
ए नॅ म ल च्या प द्ध ती चा वि चा र :- एनॅमल तयार केल्यानंतर त्याचा चुरा करावा लागतो. ह्यासाठीं एनॅमल एका दगडी खलांत टाकून त्यांत पाणी घालतात. नंतर वरूप लांकडी मुसळीनें घाव देतात. त्यानंतर खल घट्ट धरून त्यांत बत्त्यानें जोरानें घोटून एनॅमलची बारीक पूड करतात. या भुकटीस पुष्कळ पाण्यानें धुवून काढल्यानंतर तींत असणारे बारीक कण काढून टाकितात यानंतर ज्यावर एनॅमल करणें आहे त्या भांड्यास अॅसिड आणि पाणी यांनीं धुवून काढावें लागतें. तांब्यावर नैट्रिक अॅसिड, रूप्यावर सलफ्यूरिक अॅसिड व सोन्यावर हायडोक्लोरिक अॅसिडचा प्रयोग करितात. हा धातूवरील अॅसिडचा अंश प्रथमत: पाणी व कुंचलींनें धुवून काढितात; नंतर ते ओक लांकडाच्या भुशानें पुसतात.
ए नॅ म ल च ढ वि णें :- नंतर एनॅमलची पूड ज्या भांड्याच्या ज्या भागांवर चढविणें असेल, तितक्या भागावर काळजीपूर्वक व सारख्या प्रमाणांत वाजवीपेक्षां जास्त थर कोठेंहि होऊं नये अशा रीतीनें पसरतात. नंतर तें भांडें भट्टीपुढें धरून सुकवितात. सुकविल्यानंतर त्यास सावकाश रीतीनें मुशींतून अगर लोखंडी तगटावर ठेवून भट्टींत घालतात व त्याखालीं चांगली उष्णता देऊन त्यावर काळजीपूर्वक लक्ष ठेवावें लागतें. एनॅमल धातूवर सर्वत्र चकचकीत झालेलें दिसताच तो पदार्थ भट्टींतून काढून घ्यावयाचा. एनॅमल करण्यासाठीं थोडा वेळच आंच द्यावी लागते.
ए नॅ म ल प द्ध ती :- एनॅमलिंगचे चँप्लीव्ह, क्लाइसोन, बॅस्सेटेल, प्लिक-आजूर, रंगीत, एनक्रस्टेड इत्यादि अनेक प्रकार आहेत. हे सर्व प्रकार वर दिलेल्या अनुक्रमानें निरनिराळ्या काळीं प्रचारांत आले. हल्लीं या सर्व प्रकारांत बरीच प्रगति झाली आहे. यांखेरीज नवीन प्रकार अद्यापि प्रचारांत आला नाहीं. वरील प्रकारापैकीं महत्त्वाचे म्हणजे रंगीत एनॅमल, क्रस्टेड एनॅमल, आणि प्लीक-आ-जूर हे होत.
(अ) चॅम्प्लीव्ह, या पद्धतींत पत्र्यावर खांचा पडून धातूचा भाग बाजूंनीं वर आलेला असतो. या खांचांत एनॅमलची पूड घालून नंतर तापवितात नंतर ते कुरूंदाच्या दगडाच्या कानसीनें कानसून प्युमिस दगडानें गुळगुळीत केल्यावर पिंवळ्या रंगाच्या भुकटीनें व वाटोळ्या दगडानें त्यावर जिल्हई चढवितात.
(आ) क्लाइसोन, या पद्धतींत धातूच्या पत्र्यावर धातूच्या बारिक तारा अगर पट्ट्या चित्राच्या अगर नमुन्याच्या सर्व बाजूंना बसवितात. व त्या रूप्याच्या डाकानें अगर एनॅमलनें धातूस चिकटवितात. ह्या तारा चित्राच्या बाजूंच्या वर असल्यानें खांचा तयार होतात. त्यानंतर एनॅमल करण्याची पद्धत वरीलप्रमाणेंच होय.
(इ) बॅस्सेटेल, या पद्धतींत धातूवर कोरींव नकशीदार काम असतें व त्यावर एनॅमल चढविलेलें असतें. ह्या पद्धतींत बहुधा सोनें अगर रूपें या धातू वापरतात. ह्यांवर चित्र काढून मग उठावदार नकशीप्रमाणें कोरतात. यावर एनॅमल चढवितांच तें एनॅमल बिनकोरलेल्या भागाबरोबरच्या पातळींत येतें. त्यावरील चित्र हें पारदर्शी एनॅमलमधून दिसूं लागतें.
(ई) रंगीत एनॅमल, ही पद्धति वरील सर्व पद्धतीहून कृतींत व दिसण्यांत निराळी दिसते. ह्या पद्धतींत वापरावयाचे धातू तांबे, रूपें व सोनें हे होत विशेषेकरून तांबेंच जास्त वापरातात. प्रथमत: याचे कात्रीनें कापून जरूर त्या आकाराचे पत्रे अगर ताटें, तबकें वगैरे बनवितात. नंतर तीं पात्रें पाणी व अॅसिडनें धुवून काढतात. नंतर पृष्ठभागावर वरून, खालून एनॅमलच्या पुडीचा सारखा थर पसरतात, आणि नंतर त्यास आंच देतात. एनॅमलचें पहिलें पूट बसतांच, वरील चित्र काडून घेतात व त्यावर प्रथम शुभ्र एनॅमल अथवा दुसरें एखादें अपारदर्शक एनॅमल चढवितात. नंतर त्यावर दुसरें रंग चढविणें सोपें जातें.
(उ) ग्रिसाइल रंगित एनॅमल, ह्यापद्धतींत शुभ्र एनॅमलमध्यें पाणी अगर टरपेन्टाइन अथवा लव्हेन्डरचें तेल अगर पेट्रोलियमचा अर्क मिसळून झाल्यावर नंतर शुभ्र एनॅमलचा फिकट भाग पाहिजे असेल तेथें दाट व काळसर भाग पाहिजे असेल तेथें पातळ थर देतात. या योगानें प्रकाश व छाया यांचें प्रमाण बरोबर साधतें. अनेकवर्णी रंगित एनॅमल ह्या पद्धतींत ग्रिसाइल पद्धतीनुरूप रंगविलेल्या पदार्थावर पांढरा पारदर्शक एनॅमल सर्वत्र पसरल्यावर पाहिजे येथें सोनेरी छटा देतां येतात. इतर रंगहि निरनिराळे वर्ख लावून साधतां येतात. यावर पारदर्शक एनॅमलची पूड ठेऊन आंच देतात.
(उ) प्लिक-आजूर, या पद्धतीचें एनॅमल अर्धपारदर्शक (क्लॉइसन) पद्धतीप्रमाणेंच करतात.
आ ण खी कां हीं प द्ध ती :- वरील वर्णन केलेल्या पद्धतीशिवाय आणखी दोन पद्धती सध्यां प्रचलित आहेत.
प हि ली प द्ध त:-प्लिक-आ-जूर-पद्धतींत जशा भांड्यावर खांचा लागतात तशा हींत लागत नाहींत व दुसर्या पद्धतींत रंगीत एनॅमलचीं उठावदार चित्रें काढतात. ह्या पद्धतींत पदार्थावरील एनॅमल विशेष चकचकीत दिसत नाहीं. तर गिलाव्यांत काढलेल्या चित्राप्रमाणें किंचित खरबरीत दिसतें. यांत वापरावयाचें एनॅमल फार उत्तमप्रतीचें व सुंदर असतें. यांतील विशेष हाच कीं, रंगीत शिल्पांत ज्याप्रमाणें रंगाचा एकच सर्वत्र सारख्या मिलाफ दिसतो, व त्यांतील रंग पदार्थावरून चोपडल्यासारखा दिसत नाहीं. या पद्धतींत उठावदार चित्राचे निरनिराळे भाग कोणकोणत्या एनॅमलमध्यें तयार करावयाचें हें प्रथम पसंत करून ठरवितात. नंतर हीं सर्व प्रकारचीं एनॅमलें उठावदार चित्राच्या सांच्यांत वितळवितात व नंतर जडावाच्या कामांतील हत्यारांनीं वरील पृष्ठभागास तकाकी आणतात.
रंगीत एनॅमलमध्यें पुष्कळ प्रगति झाली आहे. ह्या पद्धतींत पदार्थावर एनॅमल दोन्ही बाजूंनीं करावयाचें असतें. यासाठीं या पद्धतींत तयार करावयाचा धातूचा पत्रा बाह्यगोल करितात, म्हणजे अर्थात् आंतील बाजू अंतर्गोल बनते. त्यामुळें भट्टींत ठेवतांना तें भांडें ज्या तगटावर ठेवतात त्या तगटावर भांड्याचें फक्त कांठच टेंकतात. आंतलें अंग लागत नाहीं. यामुळें या भांड्याच्या कडा आंत वळत नाहींत व पुन्हां पुन्हां भट्टींत घातलें तरी दोहोंबाजूनीं एनॅमल असल्यामुळें त्यास भेगा पडत नाहींत. या पद्धतींत भांडे तयार करण्यांतहि विशेष काळजी घ्यावी लागते. जुन्या एनॅमलमध्यें सूक्ष्मदृष्टीनें पाहिल्यास पांढर्या रंगावर सर्वत्र भेगा पडलेल्या दिसतात तसें होऊं नये म्हणून पुढील गोष्टींत काळजी घेतली पाहिजे. ह्याचा उपयोग त्या पत्र्यावरून दोन्ही बाजूंनीं चढविल्यावर दुसर्या तापविण्याच्या वेळीं तें एनॅमल फुटत नाहीं. हा प्रयोग फार महत्त्वाचा आहे, कारण यापुढें शुभ्र एनॅमल वर चढविण्याच्या वेळीं तें न फुटण्याची तजवीज त्यायोगें होतें. या पद्धतींत आंच देण्याच्या क्रियेकडे बरेंच लक्ष पुरविलें पाहिजे, पण त्याहीपेक्षां पत्रा यांत्रिक पद्धतीनें तयार करण्यांत जास्त काळजी घ्यावी लागते ती अशी:-
(१) पत्र्याचा धातू उत्तम असला पाहिजे. (२) पत्र्याची जाडी सर्वत्र सारखी असून त्याचा आकार सारखा असला पाहिजे. (३) त्याला या टोंकापासून त्या टोंकापर्यंत सारखा बांक असावा. (४) पत्र्यावर प्रथमचें एनॅमलचें पुट नियमित दोन्ही बाजूंनीं सारख्या जाडीचें व पत्र्यावर सर्वत्र पसरलेलें असावें. (५) दुसरें कोणतेहि इतर रंग-सफेतखेरिज-वापरावयाचे असल्यास, सफेत प्रथमत: पुरा सुकल्यावर भांडें भट्टीत घालावें. (६) भट्टीं चांगली पेटलेली असली पाहिजे;(७) भट्टींत ठेवावयाचें तगट कडकडीत तापलेलें पाहिजे; (८) त्यावर ठेवलेल्या पदार्थावर एनॅमल चढवितांच, तो चटकन भट्टींत घालून भट्टीचें दार झटकन लावलें पाहिजे कारण किंचितहि थंड वारा आंत जातां उपयोगी नाहीं. (९) भट्टींत पदार्थावर एनॅमल चढूं लागतांच लहान पदार्थावर हें एनॅमल एका मिनिटांतच चढतें. भट्टीचा दरवाजा थोडासा उघडून त्याला पाहतां आलें पाहिजे; (१०) पदार्थावर एनॅमल सर्वत्र चकचकूं लागतांच तो पदार्थ भट्टींतून काढून घेतला पाहिजे.
ए नॅ म ल व र स फे त रं ग दे ण्या ची क्रि या :- एनॅमलवर सफेत रंग कोणत्या पद्धतीनें द्यावयाचा ही ज्याच्या त्याच्या आवडीची गोष्ट आहे. कोणी एनॅमलमध्यें इतर पातळ पदार्थ मिसळण्यापेक्षां शुद्ध पाणी जास्त पसंत करतात. कोणी टरपेंन्टाइन आणि चरबीयुक्त टरपेंटाइन तेल तसेंच लव्हॅन्डरचा अर्क वगैरे पदार्थ एनॅमलमध्यें मिश्र करण्यास उपयोगांत आणितात. तेलाचें मिश्रण वाळण्यास काळ जास्त लागतो व या योगानें चित्रावर पाण्यांतील एनॅमलपेक्षां जास्त छटा उमटवितां येतात. अशी जरी स्थिती आहे तरी तेलामधील मिश्रणांत बरेंच वैगुण्य आहे. एनॅमलवर सफेती देणें हें विशेष त्रासदायक नाहीं. फक्त पारदर्शी एनॅमलची बारीक केलेली पूड एनॅमल केलेल्या पदार्थावर सारख्या जाडींत पसरावी. म्हणजे झालें ह्या कृतींत मुख्य गोष्ट लक्षांत ठेवावयाची म्हणजे पदार्थाला जास्त आंच पोंहोचतां उपयोगाची नाहीं. नाहींतर मिश्रणापासून सफेतींत स्टॉनिक अॅसिड आणि आरसेनिअस अॅसिड तयार होऊन तीं वायुरूपानें निघून जाऊं लागतात.
प्लीक-आ-जूर पद्धत- ही क्लॉइसोन एनॅमलिंगप्रमाणेंच असते. तथापि या पद्धतीची थोडीशी विस्तृत माहिती येथें दिली आहे.
क्लॉइसोन एनॅमल पद्धतीप्रमाणें या पद्धतींत खांचा करण्यासाठीं धातूच्या तारा किंवा पातळ पट्ट्या एनॅमल करावयाच्या भांड्याशींच डांकानें सांधीत नसून त्या एकमेकांनांच सांधतात. नंतर सांधलेल्या तारा प्लॅटिनम, तांबें, रूपें, सोनें, अगर कठिण पितळेच्या पत्र्यावर नुसत्या ठेऊन देतात, आणि एनॅमल विळून तयार होऊन पुन्हां निवून थंड होऊन घट्ट झाल्यावर या तारा सहज काढून घेता येतात. प्लीक-आ-जूर पद्धतीनें लहान भांड्यावर किंवा पुष्ठभागावर एनॅमल करावयाचें झाल्यास त्याला धातूच्या पत्र्याचीहि जरूरी नाहीं; कारण एनॅमलचे कण लवकर वितळूं लागून ते एकमेकांस धरतात व निवून घट्ट बनतात. आणि बाहेर काढून ठेवतांच कठिण बनतात.
संप्रत चालू असलेली एनॅमलकलेंतील व्यापारोपयोगी चढाओढ पूर्वी कधीच इतक्या थराला पोहोंचली नव्हती. आज सर्व यूरोपभर जपान व अमेरिकेतील संयुक्त संस्थानें यांतून एनॅमलचीं कामें फार मोठ्या प्रमाणावर चालू आहेत. हल्लीं हलक्या प्रकारच्या एनॅमलच्या वस्तूंची फार मागणी आहे. हलकें जवाहीर, घड्याळांचीं घरें, एनॅमलचीं चित्रें, भांडीं वगैरे जिन्नस एनॅमलचे तयार होतात.
ही कला यूरोपमध्येंच फार वाढली आहे व एनॅमल केलेल्या जिनसांचा खप यूरोपमध्येंच फार आहे. यामुळें या कलेंत प्रावीण्य मिळविलेले लोकहि तिकडेच आहेत. त्यांपैकीं कांहींचा उल्लेख करावयाचा म्हणजे क्लॉडियस, पोपेलिन, ऑलफ्रेड मेयर, पॉल ग्रँढोम, फरनार्ड थेसमर, अलेक्झांडर फिशर हे होत.
[सं द र्भ ग्रं थ:- या विषयावर नेरी व सेलिनी यांच्या ग्रंथांखेरीज इतर अनेक जुने ग्रंथ आहेत. नव्या उपयुक्त पुस्तकांत एच. कनिंगहॅमकृत 'आर्ट ऑफ एनॅमेलिंग ऑन मेटल्स' (१९०६); ढल्पेराट-लिमोजेसि एनॅमेल्स; अलेक्झांडर फिशर-दि आर्ट ऑफ एनॅमेलिंग अपॉन मेट्ल (१९०६) इत्यादि सांपडतील].