विभाग नववा : ई-अंशुमान
एपिक्यूरस - या तत्त्ववेत्त्याचा जन्म सॅमॉस येथें ख्रि. पू. ३४१-३४२ मध्यें झाला. याचा बाप निओक्लिस हा शिक्षक होता. एपिक्यूरिन पंथाच्या तत्त्ववेत्त्यांच्या मतांप्रमाणें पाहतां हा स्वयंशिक्षित होता. परंतु इतर चरित्र लेखकांच्या मतें पँफिलस व नॉसिफॅनिस हे याचे शिक्षक असावेत. या बाबतींत स्वत: एपिक्युरसचें असें म्हणणें आहे कीं, तो १४ वर्षांचा असतां जेव्हां हेसियड या कवींची काव्यें वाचतांना त्याच्या शिक्षकांस त्याचें शंकासमाधान करतां येईना तेव्हां त्यानें केवळ स्वत:च्या बुद्धिमत्तेच्या जोरावर आपला पुढील अभ्यासक्रम सुरू ठेवला. व पुढें यानें अध्यापनाचा धंदा स्वीकारिला.
प्रथम मिलिटिन, नंतर लँर्पेस्कस व शेवटीं अथेन्स येथें तो शिकवीत असे. अथेन्स येथें त्यानें एक शाळा काढली व मरेपर्यंत म्हणजे ख्रि. पू. २७० पर्यंत आपल्या मताचें अध्यापन केलें. याच्या मतांचा जो पंथ निघाला तो त्याच्याच नांवानें प्रसिद्ध आहे.
याच्या शिष्यांपैकीं मेट्रोडोरस हेमार्कस, डायोनिसिअस व बॅसिलाइडस् हे प्रमुख होते.
या चें त त्त्व ज्ञा न :- यानें तत्त्वज्ञानाची ''मानवजीवित सुखप्रद करण्याची कला'' अशी व्याख्या केली आहे. हा भाग नीतिशास्त्राचा आहे व म्हणूनच एपिक्युरसच्या तत्त्वज्ञानांत नीतिशास्त्रसच प्रामुख्य दिसून येईल. या पंथांतील लोक तर्कशास्त्रास प्रमेयशास्त्र (कॅनोमिक्स) म्हणत असत; कारण ज्ञानप्राप्ति व सत्यान्वेक्षणाची प्रमेयें शोधून काढणें हेंच तर्काचें कार्य होय. व्यवहारादृष्ट्या जरी सुख व दु:ख यांच्या योगानेंच ''सत्याची''. जाणीव होते तरी सत्याची परीक्षा संवेदने (सेन्सेशन) वर अवलंबून असते असें त्याचें मत होतें. पदार्थ विज्ञानशास्त्राच्या बाबतींत हा डेमॉक्रिटसप्रमाणे ''परमाणुवादी'' (अटॉमिस्ट) होता. परमाणूंच्या अंगीं एक स्वयंनिर्णयशक्ति असते व तिच्या योगानें ते आपले मार्ग वितात हें नवीन मत त्यानें ठरविलें. जीवसृष्टीच्या उत्पत्तीसंबंधीं याचें असें मत आहे कीं, प्रथम पृथ्वीपासून सर्व तर्हेचे भेसूर व क्रूर प्राणी उत्पन्न झाले व विकासवादाच्या (एव्होल्युशन) नियमाप्रमाणें जे योग्य होते ते जगले व बाकीचे नाश पावले. हा म्हणे कीं, धर्माची वाढ नैसर्गिक आहे व धर्माचा पाया मनुष्याचे अज्ञान व त्याच्या मनांतील भीति यांत आहे. याच्या मतें मानवदेह इतर प्राण्यांपेक्षां उच्च प्राकरच्या परमाणूंपासून बनलेला आहे व हे कण अग्नि, हवा, वाफ व चौथें एक अशा चार महाभूतांचे आहेत. याचें नीतिशास्त्र म्हणजे ''सुखवाद (हेडॉजिझम) होय. सुखाची व्याख्या त्यानें ''निर्विवाद, चांगलें'' अशी केली आहे.