विभाग नववा : ई-अंशुमान
एफेसस - एफेसस हें प्राचीन आयोनियन शहर आशियामायनरच्या पश्चिम किनार्यावर आहे. ऐतिहासिक कालीं हें शहर कोरेसस व प्रायन या टेकड्यांच्या उतारावर होतें. येथील प्रसिद्ध आर्टेमिस अथवा डायाना देवीचें मंदीर मैदानांत एक मैलावर पूर्वईशान्येस आहे.
ग्रीक लेखकांच्या मतें येथील प्राचीन रहिवाशी 'अमेझॉन' होत. इ. स. ११ व्या शतकांत कोड्रस नांवाच्या अथेन्सच्या राजाचा मुलगा अंड्रोक्लस यानें येथें वसाहत केली. त्याच्या वेळेपासून ग्रीक एफेससचा इतिहास सुरू झाला. एफेससची ग्रामदेवता आर्टेमिस होती वेगवेगळ्या काळांत तिचीं निरनिराळीं रूपांतरें झालीं.
इ. स. पूर्वी ७००-५०० च्या दरम्यान या ग्रामदेवतेनें दोन वेळां शहराचा बचाव केला; पहिल्या वेळेस सिमेरियन लोकांनीं आशियामायनर उध्वस्त करून आर्टेमिशनसुद्धां जाळून टाकलें; पुन्हां क्रोससनें जेव्हां एफेससला वेढा दिला त्या वेळेस क्रोससनें मंदिरास बर्याच देणग्या दिल्या व तें बांधण्याच्या कामीं साहाय्य केलें. पुढें अथेन्स येथील एका पंडिताच्या मदतीनें एफेसस येथें कायदे करण्यांत आले. त्याचप्रमाणें येथें तत्त्वज्ञान व काव्य या विषयांत तज्ज्ञ असे विद्वान् निर्माण झाले. लिडियाच्या क्रोससच्या अंमलानंतर येथें इराणच्या सायरसचा अंमल चालू झाला. क्सक्सींझ व इराणी राजे यांनां या मंदिराबद्दल फार आदर वाटत असे. युरिमेडन येथें इराणी फौजेचा मोड झाल्यावर एफेसस अथेन्सला कारभार देत असे. ४ थ्या शतकारंभीं पुन्हां इराणी अंमल चालू झाला. ३३४ त अलेक्झांडरनें येथें येऊन लोकसत्ताक राज्यपद्धति चालू केली. त्याच्या मरणानंतर लिसिमॅकसनें ग्रीक वसाहतवाले आणिले. ह्यानें आपली बायको ओमिओ इचें नांव शहरास दिलें. परंतु जुनेंच नांव जास्त प्रचारांत होतें. ग्रीक अमलांत एफेसस फार भरभराटीस आलें होतें. येथें बरींच नाणीं सांपडतात. रोमन लोकांनीं सीरियाच्या अंटायोकस दि ग्रेटचा पराभव करून हें शहर परगॅममचा राजा युमेनिस याला दिलें. परगॅममच्या तिसर्या अॅटलसनें एफेसस हें रोमन लोकांस मृत्युपत्रांत लिहून दिलें. र्पोनृसच्या मिथ्रिडाटीझ युपेटरच्या कारकीर्दीखेरीज हें रोमन लोकांच्या ताब्यांत होतें. पहिल्या शतकामध्यें झालेल्या यादवींत एफेससनें दोनदां पराभूत पक्षास मदत केलीं. त्यामुळें याला चांगलाच दंड भरावा लागला.
संपत्ति व आर्टेमिसची पूजा व बाबतींत एफेससची सारखी भरभराट होत गेली. सेंटपॉलनें येथें चर्च स्थापन करून कांहीं चमत्कार दाखविले. त्याचप्रमाणें येथें जादूविषयक ग्रंथ जाळण्यांत आले. तथापि आर्टेमिसची पूजा येथें चालूच होती. आशियांतील पहिल्या प्रतीच्या शहराचा मान मिळावा म्हणून स्मर्ना व परगामम यांच्याशीं एफेससची स्पर्धा होती. रोमन सुभेदार प्रथम येथें उतरून आपल्या हुद्याचीं वस्त्रें घेई. गॉथ लोकांनीं २६२ त शहर व मंदिर लुटून फस्त केलें. ४३१ त येथें ख्रिस्ती धर्माची सर्वसाधारण सभा भरली होती. यानंतर एफेससचा र्हास झाला. जवळच असलेल्या शहरांत लोकवस्ती झाली.
वुड साहेबानें १८६३-७४ च्या दरम्यान येथें खणून शोध लाविलें. आर्टेमिशनचा शोध त्याला १८६९ त लागला. वुडच्या नंतर आस्ट्रियन पुराणवस्तुसंशोधक मंडळानें खालील मुख्य इमारती शोधून काढल्या. त्या (१) भव्य नाटकगृह, (२) हेलेनिस्टीक आगोरा (चौक) व (३) रोमन अगोरा या होत.
सध्यांचें तुर्की शहर अयासोलुक हें प्राचीन शहराच्या ईशान्येस १ मैलापेक्षां जास्त अंतरावर आहे. ऐरिन रेल्वेमुळें हें सध्यां भरभराटीस आलें आहे. १३७५ त सेल्जुक, दुसरा इझाबे यानें बांधिलेली मषीद येथेंच आहे.