विभाग नववा : ई-अंशुमान

एबनी (अबनूस) - हें लांकूड उष्णकटिबंधांत सर्वत्र आढळतें. याच्या अनेक जाती आहेत. उत्तम प्रकारचें अबनूस अतिशय जड, काळेंभोर व गाभ्यांतलें असतें. याचा रंग, टिकाऊपणा, कठिणपणा व चकाकी (पॉलीश)येण्याचा गुण या कारणांमुळें चाकूच्या मुठी, पियोनाच्या पट्ट्या यांसारख्या नाजूक व कांतकामांत अबनुसचा उपयोग करितात. दक्षिण हिंदुस्थानांत व सिलोनांत त्रिंकोमालीच्या पश्चिमेस असणार्‍या सपाट प्रदेशांत उत्तम अबनूस होतें. याचें झाड बुंध्यांत फारसें रूंद नसतें; साल काळी कुळकुळीत व जळल्यासारखी दिसते; पण तिच्या आंतलें लांकूड गाभ्यापर्यंत अगदीं पांढरें असतें; या झाडाच्या गाभ्यांतील लांकडाचें ठोकळे जरी पाहिजे असले तरी ते १ ते ३ फूट व्यासाचे सहज मिळूं शकतात. ईस्ट इंडियन एबनी म्हणजे बहुतेक कारोमांडल किनार्‍यावरील एबनी होय. हें झाड ६० ते ८० फूट उंच व ८ ते १० फूट परिघाचें असतें. याची साल तुरट असून ती हगवणीवर मिर्‍यांत मिसळून देतात. सिलोनमधील कालामंदिर नांवाचें अबनूस फार कठिण व पिंगट रंगाचें असतें. त्याचें मौल्यवान् लांकडी सामान होतें. अंगोला, जमेका वगैरे ठिकाणचें अबनूस निरनिराळ्या रंगांचें व गुणधर्माचें असतें.

टायरला येणार्‍या व्यापारी जिनसांत एबनी असे असें एझेकील (२७. १५) वरून दिसतें. इथिओपियन लोक दर तीन वर्षांनीं एबनीचे २०० ठोकळे इराणला खंडणी म्हणून पाठवीत असें हिरोडोटस (३.९७) लिहितो. हिंदुस्थानांतला एक जिन्नस म्हणून व्हर्जिलला याची माहिती होती (जॉर्जिक्स, २. ११६). टिकाऊपणाबद्दल सायप्रेस व सेडर यांच्या तोडीची एबनीची ख्याति होती (प्लिनीनॅच. हिस्ट, १२, ९; १६. ७९). राजदंड व मूर्ती करण्याकडे हिंदुस्थानचे राजे याचा उपयोग करीत व विषावर रामबाण म्हणून याचे पिण्याचे पेले बनवीत असें सोलिनस लिहितो (पॉलिहिस्टॉर ५. पा. ३५३, पॅरिस, १६२१). ‘एबनील फळें पानें येत नाहींत व सूर्यप्रकाशांत असलेलें तें कधींहि दिसणार नाहीं’ ही पासॅनिअसनें सांगितलेली व सौदेनें थाल्बामध्यें (१. २२) उल्लेखिलेली आख्यायिका या लांकडांच्या रंगावरून व कठिणपणावरून निघाली असावी.