विभाग नववा : ई-अंशुमान
एबल सर फ्रेडरिक - (१८२७-१९०२) हा इंग्रज रसायनशास्त्रज्ञ १८२७त लंडन येथें जन्मला. हॉफ्मान याच्या लंडन येथील रॉयल कॉलेज ऑफ केमिस्ट्रींत त्याचें शिक्षण होऊन तो रॉयल मिलिटरी अकॅडेमींत रसायन शास्त्राचा अध्यापक झाला. व पुढें लष्करी खात्यांतील रसायनज्ञाच्या जागेवर त्याची नेमणूक झाली. तेथें तो १८८८ पर्यंत होता. तेथें असतांना त्यानें स्फोटक द्रव्यांसंबंधीं (एक्स्प्लोझिव्हज) बरेच शोध लावले. त्याच्या महत्त्वाच्या शोधांपैकीं गनकॉटन तयार करण्यासंबंधींचा शोध महत्त्वाचा होता. त्यानें त्या कापसाचा लादा (पल्प) करण्याची युक्ति काढली त्यामुळें त्या कापसाला पाहिजे तो आकार देतां येऊं लागला व त्यामुळें त्याची उपयुक्तता वाढली व त्यावरूनच पुढें १९व्या शतकाच्या अखेर उपयोगांत आलेल्या बिनधुराच्या दारूचा (स्मोकलेस पॉवडर) शोध लागला. तसेंच पेट्रोलियमचा चमकबिंदु (फ्लॅशपॉइंट) ठरविण्याच्या यंत्राचा शोध यानेंच लाविला.