विभाग नववा : ई-अंशुमान
एमडेन - ओल्डेनबर्गच्या वायव्येस रेल्वेनें ४९ मैलांवर असलेलें प्रशियाच्या हॅनोव्हर प्रांतांतलें एम्स नदीच्या मुखाजवळील शहर. लोकसंख्या (१९०५) २०७५४. पूर्वी एम्स नदी शहराच्या भिंतीजवळून वहात होती. परंतु आतां तिचा प्रवाह दोन मैलांच्या अंतरावर गेल्यमुळें शहरापासून नदीपर्यंत एक रूंद व खोल कालवा खणलेला आहे. या कालव्यावर अंतर्वर्तीं व बहिर्वतीं अशीं दोन बंदरें आहेत. यांपैकीं दुसरें ३/४ मैल लांब, ४०० फूट रूंद व ३८ फूट खोल असल्यामुळें सर्वांत मोठें जहाज देखील याच्या धक्क्याजवळ येऊं शकतें. शहरांतून बरेच कालवे काढलेले असून त्यांच्या योगानें पूर्व फ्रीझलंडच्या बहुतेक सर्व शहरांशीं येथून दळणवळण ठेवितां येतें. या कालव्यामुळें एमडेनला पुरातन डच शहराचें स्वरूप आलेलें आहे. अँटवर्पच्या नगरभवनाच्या धर्तींवर बांधलेलें येथें १६ व्या शतकांतील एक नगरभवन आहे. त्यांत आयुधें व चिलखतें यांचा संग्रह केलेला आहे. येथें व्यापार, तारायंत्र व नौकानयन यांच्या शिक्षणाच्या शाळा असून दुसर्याहि अनेक शिक्षणसंस्था आहेत. शहरांत दोन पहाण्यालायक अजबखाने आहेत. शेतकीपासून उत्पन्न होणारे धान्यादि जिन्नस, घोडे, इमारती लांकूड, चहा व मद्य यांचा येथें व्यापार चालतो. यंत्रें, सिमेंट, तारांच्या दोर्या, तमाखू, कमावलेलें कातडें इत्यादि जिन्नस येथें तयार होतात. जर्मनी आणि इंग्लंड व उत्तर अमेरिका यांनां जोडणार्या पाण्याखालून जाणार्या तारायंत्राचें हें एक महत्त्वाचें स्टेशन आहे.
इ. स. १२ व्या शतकांतील दप्तरांत एमडेनचा पहिल्यानें उल्लेख केलेला आढळतो. त्यावेळीं तें एम्सच्या काउन्टची राजधानी होतें. १२५२ त या काउन्टचे अधिकार मन्स्टरच्या बिशपला विकण्यांत आले. १४ व्या शतकाच्या शेवटीं गोथलंडहून हुसकून लावलेल्या चांचे लोकांस येथें व्यापार करण्याची परवानगी दिल्यामुळें या ठिकाणचा व्यापार वाढला. मध्यंतरीं कांहीं वर्षें हॅम्बर्ग व पूर्वफ्रीझलंड यांच्याकडे राहून, १५९५ त हें हॉलंडच्या छत्राखालीं साम्राज्यांतील एक स्वतंत्र शहर बनलें १७४४ मध्यें पूर्व फ्रीझलंड व त्याबरोबर हें शहर प्रशियास मिळालें.
१८१५ त तें हॅनोव्हरला दिले गेलें. परंतु १८६६ त प्रशियानें हॅनोव्हरबरोबर या शहरासहि आपल्या राज्यास जोडलें.