विभाग नववा : ई-अंशुमान

एमॅन्युअल व्हिक्टर (दुसरा) - या राजाचा जन्म ट्यूरिन येथें १४ मार्च १८२० रोजीं झाला. सार्डीनिआचा राजा चार्लस अल्बर्ट याचा हा मुलगा होय. पिडमाँटच्या कांहींशा उत्साहभंग करण्याच्या व नानाप्रकारच्या दुराग्रहीपणानें पूरित झालेल्या वातावरणांत वाढल्यामुळें लष्करी व धार्मिक शिक्षणाबरोबरच जें बौद्धिक शिक्षण त्यास मिळावयास पाहिजे होतें तें मिळालें नाहीं. इ. स. १८४२ सालीं याचें लग्न आस्ट्रियाच्या आर्चड्यूक रेनरच्या मुलीशीं झालें. या मुलींचें नांव एडिलेड होतें. आस्ट्रियाशीं आपला असलेला संबंध दृढतर करण्याच्या इच्छेनें राजानें हें लग्न घडवून आणलें. परंतु यामुळें व्हिक्टर एमॅन्युअलचें वैवाहिक आयुष्य कष्टाचें गेलें आपला बाप जिवंत असेपर्यन्त व्हिक्टरनें राजकारणांत फारसा भाग घेतला नाहीं. परंतु लष्करी बाबतींत मात्र तो उत्सुकतेनें पुढाकार घेत असे. १८४८ सालीं आस्ट्रियाशीं लढाई झाली त्यावेळीं आतां आपणांस आपलें शौर्य दाखवावयास मिळेल म्हणून व्हिक्टरला आनंद झाला. यानें गॉयटो येथें चांगलाच पराक्रम दाखविला. मार्च १८४९ मध्यें नोव्हरा येथें पराभव पावल्यानंतर चार्लस आलबर्ट यानें आपल्या पत्राला राज्यावर बसवून आपण राज्यसंन्यास केला. नंतर तो पोर्तुगालमध्यें जाऊन राहिला. व तेथें कांहीं महिन्यांनीं मरण पावला. जोराच्या प्रतिरोधास न जुमानतां व्हिवटरनें इटलीची पूर्वीचीच राज्याची घटना कायम ठेविली. यामुळें लोकांत त्याचा ‘ इटलीच्या स्वातंत्र्याचा वाली’ असा बोलबाला झाला. १८५० सालीं काव्हूर हा याचा मुख्य प्रधान झाला, व मध्यंतरीचीं कांहीं वर्षें वगळल्यास मरेपर्यन्त काव्हूर हाच त्याचा मुख्य प्रधान होता. व्हिक्टरला आपलें कार्य करण्यास परिस्थिति एक प्रकारें प्रतिकूल होती. कारण त्याच्या सैन्याची शिस्त बिघडलेली होती, खजिन्यांत शिल्लक मुळींच नव्हती, लोकांनां एकप्रकारचें नैराश्य आलें होतें, स्वत: व्हिक्टरबद्दल गैरसमज पसरलेला होता व त्याच्या बापाप्रमाणें त्याच्यावरहि बेइमानपणाचा आरोप आलेला होता. अशा बिकट परिस्थितींत व्हिक्टरला आपलें कार्य करावयाचें होतें.

व्हिक्टरला काव्हूरसारखा मुख्य प्रधान मिळाला हें त्याचें मोठेंच भाग्य होय कारण त्याच्यासारखा विशालबुद्धीचा राजकारणी पुरूष जर तेथें नसतां तर इटली स्वतंत्र होणें केवळ अशक्यच झालें असतें. १८५०-५९ हीं वर्षें सार्डिनीयाची सांपत्तिक स्थिति सुधारण्यात, सैन्याची पुनर्घटना करण्यांत व जुन्या संस्थांना नवीन स्वरूप देण्यांत गेलीं. १८५५ सालीं व्हिक्टरची आई, बायको व भाऊ हीं तिघेंहि थोडथोड्या दिवसांच्या अंतरानें मरण पावलीं. या सालीं याच्यावर ही मोठीच सांसारिक आपत्ति आली.

व्हिक्टर एमॅन्युअलचें ध्येय इटलीमधून आस्ट्रियानांना घालवून द्यावयाचें व पिडमाँट प्रान्ताचें एफ छोटेसें राष्ट्र बनावयाचें हें होतें. परंतु इटलीचें एकत्रीकरण करणें ही गोष्ट निदान त्यावेळीं तरी शक्य आहे असें त्याला वाटत नसे. तरीहि या दिशेनें इटलींत चळवळ चालू होतीच. इ. स. १८५९ सालीं काव्हूरच्या दूरदर्शीपणानें व उद्योगानें तिसरा नेपोलियन ऑस्ट्रियाच्या विरूद्ध पिडमाँटला मिळूं शकला. परंतु त्यांत व्हिक्टरला सॅव्हाय प्रान्त सोडून देणें व आपली मुलगी कॉथिल्ड ही नेपोलियनच्या मुलाला देणें या दोन अप्रिय गोष्टी कबूल कराव्या लागल्या. सॅव्हाय प्रान्त ही त्याच्या कुटुंबाची वंशपरंपरेची राहण्याची जागा होती. व आपल्या मुलीवर त्याचें विशेष प्रेम असल्यानें नेपोलियनच्या मुलासारख्या नादान मनुष्याला मुलगी देणें हेंहि त्याला आवडलें नाहीं. परंतु राष्ट्राकरितां स्वत:च्या वैयक्तिक मनोभावना बाजूस ठेवण्याची त्याची केव्हांहि तयारी होती. काव्हूरनें आपलें बुद्धिसर्वस्व खर्च करून नेपोलियन आपल्या बाजूस वळवून घेतला. परंतु फ्रान्सच्या सरहद्दीवर इटलीचें मोठें साम्राज्य व्हावें ही कल्पना नेपोनियनला सहन होऊना. म्हणून इटलीला जय मिळण्याची आशा असतांना देखील आस्ट्रियाशीं तात्पुरता तह करावा असा नेपोलियननें हट्ट धरिला. प्रसंग पाहून नेपोलियनचा हट्ट व्हिक्टरला पुरविणें भाग झालें व व्हिलाफ्रांका येथें तात्पुरता तह करण्यांत आला. काव्हूरला ही गोष्ट आवडली नाहीं. परंतु या बाबतींत व्हिक्टरनें जास्त दूरदशींपणा दाखविला यांत शंका नाहीं. १८५९-६० सालीं ज्या घडामोडी झाल्या त्यांचा परिमाण असा झाला कीं, टस्कनी व रोमाग्ना हे प्रान्त पिडमाँटला जोडले गेले गॅरिबाल्डीनें सिसिलीवर स्वारी करण्याचें ठरविलें. तेव्हां व्हिक्टरनें त्याला शक्य त्या बाजूनीं मदत केली. होतां होतां रोम व व्हेनिस या दोन शहरांखेरीज बाकीचा सर्व इटली प्रान्त एकत्र होऊन १८ फेब्रुवारी १८६१ रोजीं व्हिक्टर एमॅन्युअल हा संयुक्त इटली प्रान्ताचा राजा असें जाहीर करण्यांत आलें.

या पुढचीं कांहीं वर्षें व्हेनिस शहराचें स्वातंत्र्य परत मिळविण्यांत गेलीं, व इ. स. १८६६ सालीं झालेल्या ऑस्ट्रियन लढाईमध्यें इटलीच्या सैन्याला जरी फारसें यश आलें नाहीं तरी व्हेनिस प्रान्त त्यांच्या राज्याला जोडला गेला एवढी गोष्ट त्यांनीं मिळविली.

आतां फक्त रोमचा प्रश्न राहिला. परंतु पिडमाँटला १८५९ सालीं जरी नेपोलियननें मदत केली होती तरी रोममध्यें पाऊल घालण्यास तो इटलीला संमति देईना. शिवाय त्यानें तेथें पोपचें रक्षण करण्याकरितां शिबंदीहि ठेविली होती. पुढें प्रशियाशीं लढण्याचा प्रसंग येतांच नेपोलियनला इटलीच्या मदतीची जरूर लागली. परंतु रोममध्ये अप्रतिबंध शिरकाव झाल्याखेरीज व्हिक्टर एमॅन्युअल या गोष्टीस, संमति देईना, व अगदीं कंठाशीं येऊन ठेपेपर्यन्त नेपोलियनच्या मनांत ऐकण्याचें आलें नाहीं. फ्रान्सचा पराभव होत असतां या शूर व उदार राजानें एक लाख सैन्याची मदत फ्रान्सला केली, परंतु फ्रेंच सेनापति थायर्स याला तीं स्वीकारितां न आल्यामुळें इटलीला तटस्थ रहावें लागलें. अखेर ता. २० सप्टेंबर १८७० रोजीं फ्रेंच सैन्य रोममधून माघारें आलें  व इटालिअन सैन्य तेथें गेलें. आणि ता.२ जुलै १८७१ रोजीं व्हिक्टर एमॅन्युअलनें रोममध्यें प्रवेश केला व इटली देशाची रोम ही राजधानी झाली.

रोममध्यें प्रवेश करण्यापूर्वीपासून या नवीन राज्यपद्धतीला पोपचा विरोध होताच. पण रोम काबीज केल्यानंतर तर धर्माधिकारी व राजा यांच्यातला संबंध अधिकच नाजुक झाला. समेट होण्याबद्दल राजानें बरेच प्रयत्‍न केले. परंतु पोपच्या लोकांनीं ते धुडकावून लाविले व पोप व राजा एका शहरांत राहून मरेपर्यन्त एकमेकांस भेटले नाहींत. व्हिक्टर एमॅन्युअल आपला कारभार मोठ्या दक्षतेनें करी. त्याचें लक्ष परराष्ट्रीय राजकारणांत बरेंच होतें. अर्थातच तो या मानानें घरच्या राजकारणाकडे कमी लक्ष देई यामुळें एक मात्र फायदा झाला. तो असा कीं, इटलीमध्यें प्रान्ताप्रान्तांचा जो परस्पर संबंध होता त्यांत एमॅन्युअल ला बरीच सुधारणा करतां आली. हा राजा ता. ९ आक्टोबर १८७८ रोजीं रोममध्यें तापानें मरण पावला. व त्याचा दफनविधि पॅंथिऑनमध्यें करण्यांत आला. त्याच्या मागून त्याचा मुलगा हम्बर्ट हा गादीवर बसला.

व्हिक्टर एमॅन्युअल हा मोकळ्या मनाचा व सुस्वभावी असे. याची राहाणी अगदीं साधी होती. तरी देखील आपण राजे आहों ही कल्पना त्याच्या मनांत पूर्ण जागृत होती. व त्याच्या बाह्यवेषावरून त्याला ओळखणारे लोक त्याची मुत्सद्दीगिरी पाहून चकित होऊन जात. एमॅन्युअल हा शूर शिपाईगडी होता. परंतु १८६६ सालच्या प्रसंगीं त्याला कांहीं पराक्रम दाखवितां आला नाहीं. त्याला शिकारीचा नाद असे.

ह्याच्याजवळ विनोदी गोष्टी व म्हणी यांचा सांठा बराच मोठा होता व वादविवादाच्यावेळीं हा उदाहरणें वगैरे देण्यांत त्याचा उपयोग चांगला करी. स्त्रियांच्या सहवासाचा याला फार शोक असे. व यानें पुष्कळशा उपस्त्रियाहि केल्या होत्या. यांपैकीं, एकजण रोझा व्हर्सिलोन नांवाची बाई अतिशय सुंदर होती. तिला यानें कौंटेसच्या पदाला चढविलें. व तिच्या संततीचा राज्यावर अगर बापाच्या संपत्तीवर काहीं हक्क रहाणार नाहीं या अटीवर १८६९ सालीं तिच्याशीं लग्न लाविलें. तिच्यापासून याला एक मुलगा झाला होता.