विभाग नववा : ई-अंशुमान
एमीन्स - हें फ्रान्स देशाच्या उत्तर भागांतील सोमी विभागाचें मुख्य शहर, पॅरिसपासून उत्तरेस ८१ मैलांवर कॅलेला जाणार्या रेल्वे मार्गावर वसलें आहे. येथील लोकसंख्या सुमारें नव्वद हजार आहे. येथें १७ व्या शतकांतील प्रसिद्ध विद्यार्थी चार्लस ड्यूकेंज ह्याचा पुतळा आहे.
येथील पिकार्डी नांवाच्या पदार्थसंग्रहालयांत बर्याच तसबिरा, पुतळे व जुन्या अवशिष्ट वस्तूंचा भरणा आहे. येथें एक मोठें ग्रंथसंग्रहालय आहे.
हें धर्माधिकारी प्रिफेक्ट यांचें राहण्याचें स्थान असून येथें अदालत (जूडिशियल) कचेरी, अपील कचेरी व दुसर्या आर्मीकोरचें मुख्य ठाणें आहे. ह्याशिवाय पहिल्या प्रतीची न्यायकचेरी, व्यापारी न्यायकचेरी व फ्रान्सच्या मुख्य पेढीची एक शाखा ह्या संस्था आहेत. येथील विद्याखात्यांत मुलांमुलींच्या शाळा, शिक्षक तयार करण्याची शाळा, वैद्यकीची प्राथमिक शिक्षणाची शाळा, गायनशाळा वगैरे संस्था आहेत.
येथें लोंकर, रेशीम, ताग वगैरेंचे कारखाने आहेत. येथें धान्य, साखर, लोंकर, गळिताचीं धान्यें वगैरेंचा व्यापार चालतो.
एमीन्समध्यें ४ थ्या शतकाच्या आरंभीं सेंट फिरमीन नांवाच्या तेथील पहिल्या धर्माधिकार्यानें ख्रिस्ती धर्माचा उपदेश केला. मध्ययुगांत या शहराभोंवतालचा प्रदेश अमीनॉयच्या कौंटच्या ताब्यांत गेला. पण त्यावर कौंटप्रमाणेंच तेथील बिशपहि अधिकार चालवीत असे.
ह्या दोघांतील परस्पर मत्सरामुळें शहराच्या लोकांनीं १२ व्या शतकांत स्वातंत्र्याची सनद मिळविली. ११८५ मध्यें अगदीं पहिल्या प्रथम हें शहर फ्रेंच राजा फिलिप आगस्टस याला मिळालें. फेंच राजांच्या हातून पुष्कळ वेळां हें शहर इतरांच्या ताब्यांत गेलें. १४३५ मध्यें आरासच्या तहानें बर्गडीच्या ड्यूककडे गेलें. पुढें १४७७ पर्यंत हें शहर त्याच्यकडेच होतें. १५९७ मध्यें स्पेनच्या लोकांनीं अचानक छापा घालून तें घेतलें. त्यानंतर बर्याच वर्षांनीं ४ थ्या हेनरीनें बर्याच शिकस्तीनें हें शहर परत घेतलें. १७९० पावेतों पिकाडीं प्रांताचें तें राजधानीचें शहर होतें. १८०२ मध्यें एमीन्सचा तह या नांवाचा इंग्रज, फ्रेंच, स्पेन व डच यांच्यामध्यें फार महत्त्वाचा तह झाला. फ्रान्स व जर्मनीच्या युद्धांत १८७० च्या नव्हेंबरच्या २८ तारखेस हें शहर प्रशियन लोकांनीं काबीज केलें होतें.