विभाग नववा : ई-अंशुमान
एमेरी - ग्रीस देशाजवळ जीं बेटें आहेत त्यांपैकीं कित्येक बेटांतील पर्वताच्या पायथ्याशीं कणदार असे याचे ओबडधोबड दगड सांपडतात. एमेरी या भूशिराजवळ नाक्सस बेटांत याची उत्पत्ति फार होते व त्यावरूनच यास एमेरी हें नांव मिळालें आहे; परंतु हल्लीं दुसर्या कित्येक ठिकाणींहि याचे दगड सांपडतात. हिंदुस्थानांत हे दगड सांपडल्याचें कोठें आढळत नाहीं व याहून जास्त उपयोगी कुरूंद विपुल मिळत असल्यानें याचा कोणी शोधहि केला नाहीं. एमेरी हा पांढूरका, काळ्या रंगाचा किंवा उदी रंगाचा अपारदर्शक खनिज पदार्थ असून याच्या अंगीं तकाकी असते. याचें विशिष्टगुरूत्व ३.७ ते ४.३ असतें व हिर्याच्या खालोखाल कुरूंदाइतका हा कठिण असतो. याच्या अत्यंत काठिण्यामुळें मौल्यवान दगड घांसून साफ व चकचकीत करण्यास व जिल्हई देण्यास जवाहिरे लोक याचा उपयोग करतात. पोलादी हत्यारास साफ व चकचकीत करण्यास शिकलगार व लोहार याचा उपयोग करतात. त्याचप्रमाणें कांचांस जिल्हई देण्यास व चष्म्यांचीं भिंगें करण्यासहि डिंकाच्या पाण्यांत याची पूड कालवून कागद किंवा यांवर सारवितात व तसल्या कागदांचा व कपड्यांचा उपयोग लोखंडी हत्यारें व लहान-सहान दुसरे जिन्नस साफ करण्यास करतात [मोडक पदार्थ-वर्णन भाग १ ला.]