विभाग नववा : ई-अंशुमान
एरंडी - याचीं हिंदी-अंडीं. कानडी-अउड्ला. गुजराथी दिवेली. ही नांवें होत. एरंड हिंदुस्थानांत आफ्रिकेंतून आला असावा. अबिसिनीयांत याचें झाड रानटी स्थितींत आढळतें. हिंदुस्थानांत एरंडाची लागवड सर्वत्र आढळते. ती बंगाल्यांत जास्त प्रमाणांत आहे. एरंडाच्या सरासरीनें सोळा जाती आहेत. पण या सर्वांचे दोन भाग करतां येतात. पहिला बहुवर्षांयु. ही जात फार उंच वाढते. हिची लागवड कुंपणांत उंसाभोंवतीं व बागाइतांत पाटाच्या कडेनें करतात. याचें बीं जाडें असून त्याचें तेल हलक्या दर्जाचें समजलें जातें. दुसरा वर्षायु. हि जात स्वतंत्र पेरितात. किंवा इतर पिकांशीं मिसळून पेरितात. याचें झाड लहान असतें. व याचें पीक कोरडवाहू जमिनींत करितात. यांचें बीं लहान असून त्याचें तेल उत्तम प्रकारचें निघतें. बहुवर्षायु एरंडीचें तेल दिव्यांत जाळण्यास व वंगणास उपयोगीं पडतें. व वर्षायूचें तेल औषधांत वापरतात. हें तेल सारक आहे. एरंडी दोन्ही हंगामांत होते. यापैकीं रब्बीचें पीक महत्त्वाचें आहे. एरंडी भुसभुशीत पोयट्याच्या, वाळूच्या व काळ्या जमिनींत चांगली वाढते. उत्तर गुजराथेंतही खरीफ हंगामांत भुईमूग, बाजरी कडदण वगैरे पिकांशीं मिसळून करतात. पीक उभें असतांना त्याची सावली आलें, हळद यांसारख्या बागाईत पिकांनां मानवतें. मळईच्या जमिनींत एरंड, जोंधळा तूर, वाल वगैरेशीं मिसळून पेरितात. सुरतेकडे भातखांचरांत वाल, चंवळी, एरंड आणि हरभरा हीं रब्बी हंगामांतील पिकें होत. हें पीक स्वतंत्ररीतीनें पेरिलें तर बियांचें प्रमाण दर एकरीं पंधरा वीस पौंड असतें. मिसळून पेरिल्यास दहा पौंड एरंडी व चाळीस पौंड वाल अगर हरभरा या प्रमाणांत असतें. या पिकाला एक खुरपणी व एकदोन कोळपण्या देतात. खरीप पीक नोव्हेंबरांत तयार होतें. रब्बी फेब्रुवारी अगर मार्चांत तयार होतें. एरंडीची बोंडें तयार झाली. म्हणजे काढून उन्हांत वाळवितात. व नंतर काठ्यांनीं तीं झोडून बीं तयार करितात. दर एकरीं उत्पन्न सरासरी स्वतंत्र पीक १००० ते १४०० पौंड व मिसळीचें पीक ४०० ते ६०० पौंड. तेलाचें शेंकडा प्रमाण अजमासें ३८ ते ४० असतें. तेल औषधास, जाळण्यास व वंगणास उपयोगी आहे. पेंडीचा बागाईतांत खताकरितां उपयोग करितात. ती कडू असल्यामुळें उधइचा त्रास कमी पडतो. पानें रेशमाच्या किड्यांस खावयास उपयोगी पडतात. एरंडाचा पाला बकर्यांस चारतात.
मुंबई इलाख्यांत एरंडीच्या लागवडीकडे दर वर्षी सुमारें एक लक्ष एकर जमीन असते. हें पीक अमदाबाद, सुरत, धारवाड, बेळगांव व सोलापूर ह्या जिल्ह्यांत महत्त्वाचें असून निझामच्या राज्यांत, तैलंगणांत याचा विशेष पेरा होतो. बैतूल, रायपूर व विलासपूर या जिल्ह्यांत एरंडीची जास्त लागवड होते.
एरंडीचें तेल दोन रीतीनें काढतात. थंड पद्धतीनें म्हणजे बीं दाबून काढलेलें तेल औषधास प्रशस्त होय. एरंड्या पाण्यांत कढवून उष्णतेच्या सहाय्यानें तेल काढतात. तें काळसर असून तितकें शुद्ध नसतें. इ. स. १७८८ नंतर इंग्लंडमध्यें एरंडेल तेलाचा औषधांत उपयोग करूं लागलें. हिंदुस्थानांतून तेलापेक्षां अलीकडे एरंडीची निर्गत वाढत आहे. १९१३| १४ सालीं २ कोट रूपये किंमतीची एरंडी निर्गत झाली. याचें कारण तेल काढण्याची इकडील साधनें यूरोपीयांपेक्षां कमी दर्जाचीं असतात. एरंडीचा पुरवठा मुख्यत: संयुक्त प्रांतांतून होतो. दिल्ली व लाहोर येथें अलीकडे तेलाच्या गिरण्या निघाल्या आहेत. १९०४ मध्यें हिंदुस्थानांत एकंदर ११२ तेलाच्या गिरण्या होत्या. त्या बहूतेक कलकत्ता व मद्रासमध्यें होत्या. या तेलाचा उजेड मंद व लख्ख पडतो. याचा वंगणाच्या कामीं उपयोग फार होतो. पेंडींचा खताकडे व जाळण्याकडे उपयोग होतो.
एरंडेल सौम्य रेचक असल्यामुळे लहान मुलांसहि तें देतां येतें. संधिवातावरहि हें चोळल्यानें उपयोग होतो. साबणाच्या पाण्यांत मिसळून याचा बस्तीहि देतात. याच्या मुळाचा काढ्यांत उपयोग करितात. एरंडाचीं पानें रेशमाचे किडे खातात. यामुळें हे किडे बाळगणारे लोकहि याची लागवड करतात.