विभाग नववा : ई-अंशुमान
एरन - मध्य प्रदेशांतील सागर जिल्ह्याच्या खुरई तहसिलमधील एक खेडें. हें बिना व रेवती नद्यांच्या संगमावर आहे. लोकसंख्या (१९०१) १७१. गांवानजीकच्या उंच भागावर बरेच अवशेष आहेत. येथें पूर्वी बरींच वैष्णव देवालयें होतीं; पण सध्यां तीं मोडून तोडून नाश पावलीं आहेत. मुख्य मूर्ति ‘वराहा’ ची आहे व त्यावर तोमराण नामक हूण राजाचा लेख आहे. जवळील एका शिलेवर समुद्रगुप्ताचें नांव आहे. तसेंच येथें कांहीं नाणीं सांपडलीं आहेत. ह्यांवरून इ. स. च्या पूर्वी येथें वस्ती असावी असें सिद्ध होतें. तसेंच येथें बुद्धगुप्ताचा (सन ४८४-५) शिलालेख आहे.