विभाग नववा : ई-अंशुमान
एरवल्लर - मलबार आणि कोइमतूर जिल्ह्यांत राहणारी एक जंगली जात. कोचीनमधील एरवल्लरांविषयीं खालील महिती सांपडते:-
कोचीन संस्थानांतील जंगलांत राहणारी ही गरीब डोंगरी जात असून विल्लुवेदन (धनुर्धारी शिकार) असें हिचें दुसरें नांव आहे. त्यांची भाषा तामिळ आहे. त्यांच्यातील स्त्रीपुरूषांचीं नांवें हिंदु देवतांवरून ठेवलेलीं आहेत. हे लोक शेतावर मजूरी करतात. बायका देखील वेतन घेऊन काम करितात. पण त्यांनां स्वत:ला बंधनकारक अशी नोकरी आवडत नाहीं. हे फार विश्वासू, गरीब व देवाला भिणारे नोकर असतात अशी यांची ख्याति आहे.
यांच्यांत विधवेला फक्त विधुराशींच लग्न करतां येतें. बायको आवडली नाहीं तर पुरूषाला काडी मोडून देतां येते व अशा बाईला पुन:एखाद्या विधुराशीं लग्न जमवितां येतें. मृतांनां पुरतात व पांच दिवस सुतक पाळतात.
हे शुद्ध वन्यधर्माचे असून डोंगर, अरण्यें हीं भुतांराक्षसांनीं भरलेलीं आहेत असें ते मानितात. यांचे देव म्हणजे काली, मुनि, कान्निमार आणि करप्परायन. काली व मुनि यांची पूजा अरण्यांत करतात व बाकीचे घरांत पूजितात.
यांचा मुख्य धंदा शेती होय. याशिवाय हे शिकारहि करतात. ससे, पक्षी, शेळ्यामेंढ्या, डुकरें यांचें मांस खातात. ब्राह्मण, नायर, कंमालर आणि इझावा व यांच्या हातचें अन्न खातात; पण मन्नन, पानन, परयन आणि चेरूमन यांनां शिवत देखील नाहींत.