विभाग नववा : ई-अंशुमान

एरिथ्री - एरिथ्री (आधुनिक लित्री) हें आशियामायनरमधील एक आयोनियम शहर होतें. हें एका द्वीपकल्पांत आहे; व त्या द्विपकल्पांत उत्कृष्ट दारू तयार होत असे. कोडुसचा मुलगा कोपास ह्याच्या वेळेस ह्या शहराची स्थापना झाली. बरेच दिवसपर्यंत हें शहर अथेन्सच्या अमलाखालीं होतें; परंतु पिलोपोनेशियन युद्धानंतर या शहरानें अथेन्सचें स्वामित्व झुपारून दिलें. एरिथ्रीमध्यें सिबिल्ला व अथेनीस ह्या दोन भविष्यवादिनींचा जन्म झाला. ह्यांपैकीं अथेनीस ही अलेक्झांडरच्या वेळेस होती. अद्याप हेलेनिक भिंती बरूजांसह चांगल्या स्थितींत आहेत. यांशिवाय किल्ला व बायझन्टाईन इमारती यांचे अवशेष आहेत. आधुनिक लित्री हें एक लहानसें बंदर आहे. त्याचा किआस व स्मर्नाशीं व्यापार चालतो.