विभाग नववा : ई-अंशुमान
एरियन - (फ्लेव्हिअस एरिअनस) हा ग्रीक इतिहासकार व तत्त्ववेत्ता बिथिनियामधील निकोमिडियाचा रहिवाशी. हा इ. स. ९६ मध्यें जन्मला, व हॅड्रियन, अँटोनिनस पायस व मार्कस आरेलिअस यांच्या कारकीर्दीत उदयास आला. त्याची कर्तबगारी ओळखून त्याला अथेन्स व रोम या दोन्हीचे नागरिक करण्यांत आलें. हॅड्रियन याला फार चहात असून त्यानें याला कॅप्पॅडोशियाचा सुभेदार नेमिलें होतें (१३१-१३६). सुभेदार असतांना अलनी लोकांवर केलेल्या मोहिमेंत एरियननें नांव गाजविलें. तिसर्या शतकापूर्वी पहिल्या प्रतीच्या रोमन सैन्याचें अधिपत्य एखाद्या ग्रीकाला दिलेलें हें एकच उदाहरण होय. अथेन्स शहरीं एरियनचा बराच काळ गेला; त्या ठिकाणीं तो १४७-१४८ मध्यें मुख्य न्यायाधीश होता. कॅप्पॅडोशिया येथून त्याला परत बोलावण्यांत आल्यापासून त्याचा अधिकारी पेशा संपला. उतारवयांत तो आपल्या गांवीं परत येऊन वाङ्मयीन कार्याला लागला. इ. स. १८० च्या सुमारास तो वारला. डायोकॅसिअसनें लिहिलेलें त्याचें चरित्र नष्ट झालें आहे.
तरूणपणीं एरियन एपिक्टेटसचा शिष्य व स्नेही असे. तो आपल्या गुरूचीं व्याख्यानें शब्दश: टिपून घेत असे. तीं त्यानें “डेसर्टेशन्स” (व्याख्यानें) (आठखंड) व ‘दि एनचेइरिडिआन ऑफ एपिक्टेटस या अर्थाच्या नांवानीं प्रसिद्ध केलीं. पहिला ग्रंथ स्टोइक तत्त्वज्ञानास आधारभूत असून, दुसरा नीतिशास्त्रावर आहे. दुसर्या ग्रंथाचा ख्रिस्ती व पाखंडी लोक शिक्षणाच्या कामीं बरेच दिवस उपयोग करीत सिंप्लिसिअसनें ५५० च्या सुमारास यावर लिहिलेली टीका उपलब्ध आहे.
एरियननें स्वत: रचलेल्या ग्रंथांपैकीं अतिशय महत्त्वाचा म्हणजे “अनाबासिस ऑफ अलेक्झांडर” याअर्थी अलेक्झांडरच्या राज्यारोहणापासून मृत्यूपर्यंतच्या इतिहासाचा ग्रंथ. हा सात विभागांत लिहिलेला इतिहास अलेक्झांडरच्या स्वार्यांबरोबर असलेले अरिस्टोसुलस (कॅस्सन्ड्रेइआचा) व लॅगसपुत्र टॉलेमी (पुढें झालेला इजिप्तचा राजा) यांनीं दिलेल्या माहितींवरून तयार केला. आपल्या नायकाच्या ठिकाणीं असलेल्या दोषांकडे दयार्द्रदृष्टि व त्याच्याविषयीं अंधश्रद्धा ग्रंथकर्त्यानें ठेविलेली दिसते. तरी अलेक्झांजरविषयीं जास्त विश्वसनीय व सर्वांगपरिपूर्ण माहिती या ग्रंथाखेरीज दुसरीकडे आढळणार नाहीं.
एरियनचे इतर उपलब्ध असलेले ग्रंथ म्हणजे “इंडिका”, हा आयोनिक भाषेंत हिंदूस्थानसंबंधीं लिहिलेला ग्रंथ; “अॅसिईज कोन्ट्रा अॅलॅनोज,” रामेन लष्करी कारभाराचें ज्ञान देणारा महत्त्वाचा लेख; “पेरिप्लुस ऑफ दि युक्झाईन,” हॅड्रियन बादशहासाठीं लिहिलेली सरकारी माहिती; “टेक्टिका” ट्राजनच्या कारकीर्दीत एलियानसनें हा लिहिला असें कोणी मानितात; “सिनेजेटिकस,” शिकारीवर विवेचन; ‘पेरिप्लुस ऑफ दि एरिथ्रियनसी,’ हा एरियनचा समजला जाणारा ग्रंथ पुढील काळांतील एखाद्या लेखकाचा असावा. त्याचे नष्ट झालेले ग्रंथहि बरेच आहेत याची लिहिण्याची धाटणी साधी, स्पष्ट व जोरकस आहे; पण भाषा शुद्ध असूनहि तींत कांहीं विचित्रपणा आढळतो. झेनोफोनचें अनुकरण करण्यावरून एरियनला “धाकटा झेनोफोन” असें संबोधण्यांत येतें; तो स्वत:हि आपणाला झनोफोन म्हणवून घेतो.
ए रि य न नें व र्णि ले ला हिं दु स्था न.-इंडिका या ग्रंथांत एरियन हिंदुस्थानाविषयीं ऐकीव माहिती देतो व तीवर जागजागीं खरेखोटेपणाबद्दल टीकाहि करितो. मेगॅस्थेनीज व निआर्कस यांनां असलेली इकडील माहिती देऊन आपलींहि मतें या ग्रंथांत तो व्यक्त करीत आहे. या ग्रंथांतील पुढील विधानें मनोरंजक वाटतील यांत संशय नाहीं. “गंगा व सिंधु या नद्या नाईल व डॅन्यूब नद्यांपेक्षां फारच मोठ्या आहेत.” हिफासिस नदीपलीकडचें वर्णन फारसें विश्वसनीय नाहीं. कारण अलेक्झांडरचे लोक या नदीपलीकडे गेलेले नव्हते. हर्क्युलसनें हिंदुस्थानावर स्वारी केली होती असा समज करून घेऊन मेगॅस्थेनीज हिंदुस्थानचें वर्णन करतो. “डायोनिससनें हिंदी लोकांनां शेतकी, दारूरिणें, पागोटें घालणें ईश्वरोपासनेकरितां केंस वाढविणें यासारख्या गोष्टी शिकविल्या. मोती वापरण्याची चाल हिंदी लोकांनीं पसरविली. हर्क्युलसनें आपल्या पाठीमागें आपल्याच वंशांतील राजा हिंदुस्थानावर राज्य करण्यास असावा म्हणून उतारवयांत आपल्या सात वर्षाच्या मुलीशीं संभोग केला. तेव्हांपासून सातव्या वर्षी मुलीचीं लग्नें करण्याची चाल हिंदुलोकांत आली. यामुळें हे लोक तीस चाळीसीच्या घरांत आले म्हणजे म्हातारे होतात. डायोनिससकालापासून संद्रकोटस (चंद्रगुप्त ?) कालापर्यंत ६०४२ वर्षें लोटलीं व तीन वेळां प्रजासत्ताक राज्यें होऊन गेलीं. हिंदुस्थानांत नदीकांठचीं घरें लांकडाचीं असतात, कारण तीं वाहून जाण्याचा संभव फार. या देशांत सर्व लोक स्वतंत्र. गुलाम कोणीहि नाहीं. यति लोक राष्ट्रकल्याणाचींच फक्त भविष्यें वर्तवितात. छायेखालीं दहाहजार माणसें बसतील इतकीं मोठीं झाडें तेथें आहेत. राज्यांत काय काय प्रकार होतात हें राजास कळविणारा एक वर्ग आहे. खोटें बोलणारा हिंदु अद्याप आढळला नाहीं. मोठे खंदक खणून हत्तींची शिकार करितात. हत्तीकरितां मोठ्या शहाण्या स्त्रिया सुद्धां व्यभिचाराला उद्युक्त होतात व तसें करणें फारसें वाईट मानण्यांत येत नाहीं. कोल्ह्यापेक्षां मोठ्या अशा सोनें खणणार्या मुंग्या आहेत. ग्रीकांनां सर्पदंशावर औषध सांपडलें नव्हतें पण हिंदु मांत्रिक तो चटदिशीं बरा करीत. हिंदु बहुधां रोगी नसतात, कोणी असलेच तर औषधावांचून बरे होतात. ते धोतर नेसतात व अर्धें उपरणें डोक्याला गुंडाळून बाकीचें खांद्यावर सोडतात. दाढी रंगवितात; कांहीं छत्र्या व पांढरे जोडे वापरतात. ते उंच, सडपातळ व वजनानें हलके असतात. लग्नांत हुंड्याची चाल नाहीं; स्वयंवरपद्धतीनें लग्नें होतात. डोंगरी लोकांखेरीज बाकीचे लोक शाकाहारी आहेत.”