विभाग नववा : ई-अंशुमान
एरिलिगारू - निलगिरी पठारावर व त्याच्या पायथ्याशीं असलेल्या अरण्यांतून हे एरिलिगारू रानटी लोक राहतात. जीविताला आवश्यक असलेल्या कलांत ते अगदींच अनभिज्ञ आहेत. ते बहुतेक नग्न असतात, झाडांखालीं निजतात व वाघांना मोहित करण्याची आपल्यांत ताकद आहे असें मानितात. त्यांच्या बायकांसंबंधीं असें सांगतात कीं, त्या भक्ष्यशोधार्थ जंगलांत जातांना आपलीं मुलें वाघांच्या स्वाधीन करितात व परत आल्यावर तीं त्या हिंस्त्रप्राण्याकडून सुखरूप जशीच्या तशीं परत घेतात. त्यांचीं गांवें पर्वतांच्या उतारावर बसलेलीं सून, त्यांच्या मध्यभागीं उबार्याकरितां व हिंस्त्रपशू जवळ येऊं नयेत म्हणून एक मोठी आगटी पेटविलेली असते. शेळ्यामेंढ्या व गुरें यांची ते निपज करितात; जाळ्यांत पक्षी व वाघ धरितात आणि केळीं, नारिंगें यांच्या मोठ्या बागा लावितात. सभोंवतालच्या निरनिराळ्या भाषांच्या मिश्रणानें त्याची हेंगाडी भाषा बनली आहे. शेजारच्या लोकांशीं दळणवळण वाढत असल्यानें एरिलिगारू माणसाळत चालले आहेत.