विभाग नववा : ई-अंशुमान
एलगंडल जि ल्हा - हैद्राबाद संस्थानांतील वारंगळ विभागातील जिल्हा चतु:सीमा:- उत्तरेस व वायव्येस अदिलाबाद व निझामाबाद, पश्चिमेस मेदक, दक्षिणेस वारंगल, पूर्वेस गोदावरी व प्राणहिता या नद्या. क्षेत्रफळ ७२०३ चौ. मै. (जहागिरी जमीनी धरून). संस्थानाच्या मालकीच्या व सर्फ-इ-खास जमिनीचें क्षेत्रफळ ५८९८ चौ. मै. होतें. गुरपल्लीपासून तों थेट जगतियल पावेतों ईशान्येस एक डोंगराची ओळ असून सुनिग्राम नामक डोंगरांचीं एक ओळ आहे. यांतील गोदावरी, मानार, प्राणहिता, पेड्डवागु व चेल्लु व वागु ह्या सर्व नद्या गोदावरी नदीच्या उपनद्या होत. वाघ, अस्वल, चित्ता, लांडगा, तरस, गेंडा, वगैरें श्वापदें आढळतात. गोदावरीच्या प्रदेशाची हवा मलेरियाजनक आहे. इतर तालुक्यांतील हवा हितकारक आहे. वार्षिक पाऊस पाणी ३३ इंच.
इ ति हा स.- ह्या जिल्ह्याच्या पूर्वेतिहासापैकीं माहिती उपलब्ध नाहीं. तरी हा वारंगळच्या राज्याचा भाग होता एवढें मात्र खरें, मुसुलमानांनीं तेलंगण जिंकल्यानंतर व वारंगळचें राज्य लयास गेल्यावर ह्याचा अनुक्रमें ब्राह्मणी व कुतुबशाहि राज्यांत समावेश झाला. गोवळकोंडा जिंकल्यानंतर अवरंगजेबानें हा दिल्लीच्य साम्राज्यास जोडला; पण १८ व्या शतकाच्या सुमारास असफजाहनें हैद्राबाद संस्थांनाची स्थापना केल्यानंतर हा जिल्हा दिल्लीच्या साम्राज्यापासून वेगळा होऊन हैद्राबाद संस्थानांत मोडूं लागला.
येथें बरेच किल्ले, देवालयें व मशिदी आहेत. खुद्द एलगंडल येथील किल्ला बराच प्राचीन कालीं बांधलेला असून त्यांत १७५४ सालीं झफर उद-दौलानें बांधलेली मशीद आहे. जमिकुन्हा तालुक्यांत ७०० ते १००० वर्षांपूर्वीं बांधलेले अनुक्रमें बजगूर व मलंगूर नामक दोन किल्ले आहेत. ह्याच तालुक्यांतींल गुरशाल व कतकूर देवालयांपैकीं पहिलें वारंगळचा राजा प्रतापरूद्र ह्याच्या कारकीर्दींत १२२९ सालीं बांधलें गेलें. सध्यां हीं देवालयें जीर्णावस्थेंत आहेत. देवालयांबाहेरील स्तंभावर उडीया भाषेंत कांहीं लेख आहेत. जगतियलचा किल्ला १७४७ मध्यें झफरउददौल्याकरितां बांधण्यांत आला. तसेंच गोदावरीतीरावर ह्याच तालुक्यांत धरमपुरी येथें एक जुनाट देवालय आहे. अनंतगिरीचा जीर्ण किल्ला सिरसिल्ला तालुक्यांत आहे. महादेवपूर तालुक्यांत काळेश्वर व सोनिपेठ येथें असलेल्या दोन मशिदी व तसेंच सिद्दीपेठ तालुक्यांतील राजगोपाळपेठ येथील मशिदी औरंगझेबानें बांधलेल्या आहेत. महादेवपूर तालुक्यांतील प्रतापगिरी किल्ला राजा प्रतापरूद्रानें बांधला असें म्हणतात. ह्या जिल्ह्यांत १५२३ गांवें व खेडीं असून त्यांची लो. सं. १९०१ सालीं १०३५५८२. होती.
मुख्य गांवें:- जगतियल, कोरतला, मन्थनी, करीमनगर (जिल्ह्याचें मुख्य ठिकाण) व वेमलवाडा. शेंकडा ९६ लोक हिंदु आहेत. शेंकडा ९० लोक तेलगू भाषा बोलतात व शेंकडा ६ उर्दू बोलतात. १९०५ सालीं परकाल तालुका वारंगळमधून काढून ह्या जिल्ह्यास जोडण्यांत आला. व चिन्नूर व लखसोटिपेठ अदिलाबादास जोडण्यांत आला व सिट्टीपेठ मेदकला जोडण्यांत आला. ह्या जिल्ह्याचें सध्याचें नांव करिमनगर असून ह्यांत करिमनगर, सुलतानाबाद, महादेवपूर, जमिकुन्टा, परकाल, सिरसिल्ला, जगतियल ह्या सात तालुक्यांचा समावेश होतो. शेंकडा ३५ हून अधिक लोक आपली शेतकीवर उपजीविका करतात. जमिनीचे चल्का, मसब व रेगर असे तीन प्रकार आहेत. रेगर जमिनींत रब्बीचीं पिकें पेरतात. मसब जमिनीचा उपयोग कांहींसा बागाईताकडे तर कांहींसा रब्बीच्या पिकांची लागवड करण्याकडे करतात. खरीपाची पेरणी चल्का जमिनींत करतात. येथें तलाव बरेच आहेत. नद्याची खोरीं अत्यंत सुपीक आहेत. येथें रयतवारी पद्धति चालू आहे. मुख्य पीक ज्वारीचें असून इतर पिकें कापूस, तांदूळ, चणे, कडधान्यें व गळिताचीं धान्यें हीं होतात. चिन्नूर, महादेवपूर, लखसेटिपेट व सिरसिल्ला व जगतियलच्या भागांत बरेंच जंगल आहे. एकंदर जंगल ३०१८ चौ. मै. पैकीं राखलेलें ८१६ चौ. मै. आहे.
बहुतेक सर्वत्र अशुद्ध लोखंड सांपडतें. कोनसमुद्रम् व इब्राहिमपट्टण येथील पोलाद सुप्रसिद्ध आहे. सिद्दीपेठ व जगतियल तालुक्यांत रेशमी साड्या व उपरणीं तयार होतात. तसेंच जाडें भरडें सुती कापडहि सर्वत्र तयार होतें. जगतियल तालुक्यांत कोरटला येथें कागद तयार करतात. चिन्नूर तालुक्यांत टसर रेशमाचें कापड होतें. करिमनगर व मानकोन्डूर येथें रूप्याचें उत्तम जरी व वेलबुट्टी काम होतें. तसेंच उत्तमपैकीं पितळेचीं भांडींहि येथें तयार होतात. मुख्य निर्गत माल:-तांदूळ, ज्वारी, तीळ, मोहर्या, एरंडीचें बीं, तंबाखू, रेशमी कापड, कापूस चामडें वगैरे. आयात माल:- सुती व लोकरीचें विलायती कापड कांचसामान, साखर, सोनें व रूपें, मीठ, अफू, केरोसीन तेल व पितळेचे व तांब्याचे पत्रे.
व्यापाराचीं मुख्य ठिकाणें:- सिद्दीपेठ, पेइपल्ली, कमानपूर, जगतियल, घांबीरवपेठ व करीमनगर. बहुतेक कोमटीलोक व्यापार करितात. आगगाडी नाहीं. येथें तलाव, विहिरी व जंगल बरेंच असल्यामुळें दुष्काळाचें उग्र स्वरूप अजून दिसलें नाहीं. १८९७ सालीं पाऊस फक्त २८ इंच होता व बहुतेक पिकें बुडालीं ह्या जिल्ह्याचे ४ पोटविभाग पाडले आहेत. पहिल्या पोटविभागांत जमिकुन्टा व परकाल हे तालुके असून दुसर्या पोटविभागांत सुलतानाबाद व महादेवपूर, तिसर्या पोटविभागांत जगतियल व सिरसिल्ला व चवथ्यांत करिमनगर. प्रत्येक तालुक्यास एक एक तहसिलदार आहे. सन १८६६ पावेतों खेडीं व तालुके वसुलीकरितां मक्त्यानें देत असत. पण हा जिल्हा तयार करण्यांत आल्यानंतर रयतवारी पद्धति अमलांत आणण्यांत आली. सारावसुली (१९०३) १८२८. एकंदर उत्पन्न २८८६. १९०३ सालापासून १ आणा डोईपट्टी आकारण्यांत आली आहे. सहा महिन्यांहून अधिक शिक्षा झालेल्या लोकांस वारंगळच्या सेन्ट्रल जेलमध्यें पाठविण्यांत येतें. शेंकडा १.८ लोकांस लिहितां वाचतां येतें. चाळीस प्राथमिक शिक्षणाच्या शाळा व दोन माध्यमिक शाळा आणि पांच दवाखाने आहेत.