विभाग नववा : ई-अंशुमान
एलाय - इंग्लंडमधील केंब्रिजशायरच्या न्यूमार्केट पार्लमेंटरी विभागांत एलाय शहर आहे. वेस्टर्न रेल्वेनें केंब्रीजच्या उत्तरईशान्येस हें १६ मैल आहे. १९०१ सालीं शहराची लोकसंख्या ७७१३ होती. औस नदीच्या पश्चिमतीरावर हें आहे. जवळच तेलाच्या गिरण्या आहेत. व्याकरणशाळा व ख्रिस्ती सांप्रदायिक विद्यालय येथें आहे. १०८३ सालीं सायमननें मुख्य प्रार्थनामंदीर स्थापिलें. येथें नॉर्दंब्रिआच्या राजानें एथेलरेडशीं तिची इच्छा नसतांना लग्न केलें. त्यापूर्वीच हें शहर बरेंच नांवाजलेलें होतें. येथें आल्यावर तिनें एक मठ बांधला. ८७० साली डेन्स लोकांनीं हा मठ उध्वस्त केला. विंचेस्टरचा बिशप एथल कोल्डनें ९७० सालीं येथें बेनिडिक्टपंथी मठ बांधला. एडवर्ड दि कनफेसरच्या कारकीर्दीत मिळालेले हक्क व मुलूख कायम राहतील या अटीवर मठवासीयांनीं १०७१ सालीं एलाय बेट राजास दिलें. सेंट एथलरेडच्या प्रीत्यर्थ येथें जत्रा भरत असे. १३२१ सालीं मुख्य प्रार्थनामंदिराचा मनोरा ढासळल्यामुळें तीन मठांचा नाश झाला. या मंदिरांत प्रख्यात पुरूषांचीं स्मारकें आहेत. जुन्या मठांचें अवशेष येथें पुष्कळ आढळतात.
ईल नांवाचे मासे येथें सांपडतात म्हणून यास एलाय असें नांव पडलें. मठामुळें याचें महत्त्व जास्त वाढलें. बिशपकडे एकतंत्री सत्ता असून १८५० पर्यंत तोच बेलीफची नेमणूक करीत असे. १२९५ सालीं फक्त पार्लमेंटांत येथून दोन सभासद पाठविण्यांत आले होते.