विभाग नववा : ई-अंशुमान
एलिचपूर ता लु का.- हा पूर्वी एलिचपुर जिल्हा असतांना त्यांतील मुख्य तालुका होता. परंतु ऑगष्ट १९०५ पासून तो जिल्हा मोडल्यानें उमरावती जिल्ह्यांतील एक तालुका झाला. हा उ. अ. २१० ९’ ते २१० २४’ व पू. रे ७७० २३’ ते ७७० ५३’ यांमध्यें आहे. ह्याचें क्षेत्रफळ ४६९ चौ. मैल. आहे. यांत ३११ खेडेगांवे असून त्यांपैकीं ७ जहांगीरीचीं गांवें आहेत. सातपुडा डोंगराच्या पायथ्याशीं पाइन घाटामध्यें हा तालुका आहे.
सामान्यवर्णन:- उत्तरेस मेलघाट तालुका आणि मध्यप्रांतांतील बैतुल जिल्हा. पश्चिमेस दर्यापूर तालुका. दक्षिणेस आणि पूर्वेस उमरावती आणि मोशीं तालुके आहेत. याची पूर्व पश्चिम लांबी २४ मैल असून उत्तरदक्षिण रूंदी १६ मैल आहे. आकारानें उमरावती जिल्ह्यांत हा सर्वांत लहान तालुका आहे. प्रदेश बहुतेक सर्व सपाट आहे. येथें अजून पुष्कळ जंगल आहे. पुष्कळ ठिकाणीं पाणी अगदीं जवळ सांपडतें. यामुळें हा तालुका पुष्कळ दुष्काळांतून निसटला आहे. हवा अगदीं निरोगी असून एप्रिल आणि मे महिन्यांत उन्हाळा बराच असतो. या तालुक्यांतील चंद्रभागा आणि पूर्णा या नद्या मुख्य आहेत. यांतील पाणी फार खोल असल्यामुळें कालवे काढणें अशक्य आहे. परंतु या नद्यांत पाणी बारा महिने असल्यामुळें पाण्याची ददात नाहीं. एलिचपुरपासून जवळच चंद्रभागेला मिळणारी सरपण नांवाची नदी वाहते. त्या पाण्याचा पुरवठा पूर्वी एलिचपूरला होत होता. तसेंच दत्तुराजवळ ‘सातबुडकी’ म्हणून असेंच पूर्वीचें बांधलेलें काम आहे. त्यांतून आजूबाजूच्या बागाईत जमिनीला पाणी मिळत असे. हौझकटोरा नांवाचें हल्लीं एक रिकामें तळें आहे. त्याचा आणि ‘सातबुडकी’ यांचा संबंध होता अशी एक दंतकथा आहे. लोकसंख्या (१९०१) १४६०३५. इतर तालुक्यांतील लोकसंख्येशीं तुलना केली असतांना याची लोकसंख्या फार थोड्या प्रमाणांत कमी झाली आहे असें दिसून येईल. हा प्रदेश सुपीक आहे याची साक्ष यावरून पटते. दर चौरस मैलास ३११ लोक असें लोकवस्तीचे प्रमाण आहे. वर्हाडांतील सर्व तालुक्यांपेक्षां हें प्रमाण जास्त आहे. बहुतेक सर्व जमीन वहीत आहे. या तालुक्यांत पांच मोठीं गावें आहेत. एलिचपुर, परतवाडा, शिरसगांव, चांदुरबाजार, करजगांव आणि ३०६ खेडेगांवें आहेत.
शेतकी :- ज्वारी, कापूस, तूर, गहूं हीं पिकें येतात. बागाईत फारसें नाहीं रब्बीच्या पिकाखालीं थोडी जमीन असून बहुकेत तींत गहूं होतो इ. स. १९११ सालीं १६३८ एकर बागाईत होतें.
शहर .-वर्हाडंची पूर्वींची राजधानी व हल्लींचें तालुक्याचें ठिकाण. उ. अ. २१० १६’ आणि पू. रे. ७७० ३३’. समुद्रसपाटीपासून १२०० फूट उंचीवर हें असून उमरावतीच्या वायव्येस ३० मैलांवर आहे. लोकसंख्या १९०१ त २६,०८२ होती. म्युनसिपालिटीची स्थापना जुलई १८६९. इ. स. १९०६-०७ सालापूर्वीच सोळा वर्षांचें सरासरीचें उत्पन्न रू. २०,१७४ व खर्च रू. १९,७४८. इ. स. १९०७-०८ सालचें उत्पन्न २०,६४७ रूपये होतें. त्या वर्षाचा खर्च रू. २९,०२९ होता. शहराच्या पाण्याचा पुरवठा अर्वाचीन पद्धतीवर अजून झालेला नाहीं. लोकांनां विहिरीचें आणि सरपण व बिंचन नद्यांचें पाणी वापरावें लागते. पूर्वी बिचन नदीला बांध घातलेला होता. तेथून पाणी शहरांत आणीत असा. दुल्ला दरवाजा आणि बारकल दरवाजा यांच्या दरम्यान अजून मातीचे नळ आहेत. परंतु ते उपयोगांत नाहींत हे नळ हिजरी सन ८२९ म्हणजे इ. स. १४२५ सालीं अंहमदशहा वली बहामनी याच्या कारकीर्दीत घातले होते. आणखी थोडासा खर्च केल्यास त्यांचा उपयोग करतां येण्यासारखा आहे.
ज्यावेळीं एलिचपूर भरभराटींत होतें त्यावेळीं येथें कापूस आणि रेशीम यांचा व्यापार फार चालत असून लांकडावरील खोदकाम व दगडावरील कामहि उत्तम होत असे. याची साक्ष जुन्या इमारती देत आहेत. येथें विणण्याचे व रंगविण्याचें काम पूर्वीपासून पुष्कळ होत आहे. परंतु अलीकडे या सर्वांनां उतरती कळा लागत चालली आहे. येथील सतरंज्या जरी ओबड धोबड असतात तरी टिकण्यांत चांगल्या असून जिल्ह्यामध्यें पुष्कळ खपतात. खादी, रूमाल, पागोटीं, पटके, रेशीमकाठीं साड्या वगैरे येथें होतात. परंतु कोष्ट्यांना मजुरी साधारण मजुराइतकीच जेमतेम पडत असल्यामुळें, व त्यांनां गिरणींतील मालाशीं टक्कर देण्याचें सामर्थ्य नसल्यामुळें हे सर्व धंदे खालावत चालले आहेत. अलीकडील सर्वांत महत्त्वाचा धंदा म्हटला म्हणजे कापसाचा. जरी तालुक्यांतील बहुतेक कापूस उमरावतीस जातो तरी येथें तीन सरकी काढण्याचे कारखाने व एक रूई दाबण्याचा कारखाना मिळून चार कारखाने आहेत.
या शहराचे पूर्वी ५४ पुरे असून त्यांपैकीं हल्लीं ३५ आहेत. त्यांचीं सर्व नांवें मुसुलमानी आहेत. आतां येथें मूर्तिजापूर-एलिचपूर ही रेल्वे आहे.
इतिहास :- एलिचपूर शहराचा इतिहास म्हणजे सर्व वर्हाडचा इतिहास होय. परंतु तो इतरत्र दिला असल्यामुळें त्याची येथें पुनरूक्ति करण्याची जरूरी नाहीं. जिकडे तिकडे असलेल्या जुन्या इमारती या शहराचें पूर्वीचें वैभव दाखवितात. त्यांपैकीं मुख्य पहाण्यासारख्या इमारती म्हणजे सुलतान इमाद उलमुल्क याचा इदगा (इ. स. १३४७), हौझ कटोरा तलाव व मनोरा, दरूस शफ मसजीद (१३४०), दुल्लाशाह अबदुल रहमान याचें थडगें (यास हिंदु व मुसुलमान दोन्ही पूज्य मानतात), मानसिंगानें बांधलेली ममदलशाह विहीर, चौकमशीद, जामीमशीद, सुलतानपुरा (१७५४) नांवाची दगडी इमारत, इस्माइलखान यानें गांवाभोंवतीं बांधलेला तट इत्यादि होत. हौझकटोरा या मनोर्याचें काम बहुतेक १४ व्या शतकांतलें असावें. हा एक अष्टकोनी विटा, वाळू आणि चुना यांचा एक मनोरा आहे. पठाणांच्या धर्तीवर सर्व बांधीव काम आहे. गुलाम हुसेनखानानें एक मोठा इमामवाडा बांधलेला आहे. परंतु एलिचपूरमधील सर्वांत प्रेक्षणीय इमारत म्हटली म्हणजे शरमस्त पुर्यांतील नबाबांची पुरण्याची जागा. हींत इस्माइलखानाचें थडगें असून दुसर्या कांहीं लहान लहान इमारती आहेत. त्या सर्व चांगल्या असून विशेषत: त्यांत दगडांवर केलेलें जाळीचें काम फारच छान आहे. या सर्व इमारतींच्या भोंवती एक दगडी भिंत असून तिला मोठे दोन दरवाजे आहेत. सर्व नबाबांनां बागेचा शोक होता आणि एलिचपूरच्या आसपास असल्या बागेचे अवशेष अजून पहावयास मिळतात. सर्वांत चांगली बाग नामदार बाग नांवाची असून ती दुल्लारहिमान दर्ग्याच्या जवळच आहे. सभोंवती भिंत असून पाणी देण्याकरितां एक मोठी विहीर आहे. हल्लीं येथें सरकी काढण्याचा कारखाना आहे.
लष्कर - लष्करी ठाणें यास परतवाडा म्हणतात. हें एलिचपुरच्या उत्तरेस आहे. उमरावतीस जाण्याकरितां येथून चांगला पक्का रस्ता आहे. अजनगांव सुर्जींला जाण्यास साधा मुरूमाचा रस्ता असून तें गांव १६ मैलांवर आहे. असाच एक रस्ता चांदुर बाजारला जात असून तो गांव येथून चौदा १४ मैल आहे. म्युनसिपालिटीच्या हद्दींत जमीन सुमारें दोन चौरस मैल (११२ एकर आणि साडेसहा गुंठे) आहे. लोकसंख्या सन १९०१ सालीं १०४१० (लष्कर सहित) होती. एलिचपुर सबडिव्हिजनचे परतवाडा हें मुख्य ठिकाण आहे. म्युनसिपालिटी १८९३ त स्थापन झाली. इ. स. १९०६-०७ मागील चौदा वर्षांचें सरासरीचें उत्पन्न १८४०५ व खर्च १४८४३ रूपये इतका होता. पाण्याचा पुरवठा विहिरीपासून आहे. बहुतेक विहिरी चांगल्या आहेत.
परतवाडा हा गांव अलिकडेच वसलेला आहे. सलाबतखानाच्या कवाइती सैन्याचें हें लष्करी ठाणें होतें. इ. स. १८२३ सालीं हें लष्करी ठाणें झालें असें ‘नुरूल बेरार’ वरून दिसतें. जयपुर कोठली हें ठाणें त्याच वेळी सोडलें. कॅप्टन सेयर हा त्यावेळीं अधिकारी होता. इ. स. १८४० सालीं मेडोज टेलरनें असें लिहिलें आहे कीं, येथील सर्व ब्रिगेडिअर चिखलदारा येथें उन्हाळ्यांत जात असे. परंतु पुढें पुढें ही संख्या कमी कमी करण्यांत आली. गांवांतून बिचन नदी वाहते व तीमुळें वस्ती व लष्कर असे दोन भाग झाले आहेत.
व्यापार - मेलघाटांतून सागवान या बाजारांत येतें. त्याची विक्री दर गुरूवारीं होते. सुमारें ६००० रूपयांची विक्री दर गुरूवारीं होते. गुरांचाहि व्यापार बराच चालतो. येथें दोन सरकी काढण्याचें कारखाने व एक रूई दाबण्याचा कारखाना आहे. पूर्वी येथें एक आगकाड्यांचा कारखाना होता. परंतु तो बंद पडला.
येथें मुलकी व दिवाणी ऑफिसें, पोलीस कचेरी, तुरूंग वगैरे आहेत. परतवाडा हें रोमन कॅथोलिक मिशनचें मुख्य ठाणें असून कोव्हकू व सेंट्रल इंडिया हिल मिशनचेंहि ठाणें आहे. येथें अनाथ बालकांकरितां एक धंदेशाळा चालविली असून जवळच तीन मैलांवर काठारिया येथें एक महारोग्यांकरितां इस्पितळ आहे. या दोन्ही संस्थानां सरकारची मदत आहे.