विभाग नववा : ई-अंशुमान
एलिस - ग्रीसमधील एलिस प्रांताचें एक मुख्य शहर हें पेनीअस नदीवर वसलें आहे. दंतकथेप्रमाणें ऑक्झीलस हा या शहराचा मूळ संस्थापक होय. ख्रि. पू. ४७१ या वर्षी नजीकचीं लहान लहान खेडीं यांत सामील केलीं गेल्यामुळें या शहराची मर्यादा व त्याबरोबर महत्त्वहि फार वाढलें. एलिसमधील प्रसिद्ध संस्था म्हणजे तेथील मल्लभूमि होय. ऑलिंपिआ येथील क्रीडोत्सवाकरितां या ठिकाणींच उमेदवार तालीम घेत असत एलिसमध्यें पुष्कळ देवालयें आहेत. त्यांत अपोलो, सायलेनस व अथेना इत्यादिक देवतांचीं देवालयें प्रमुख होत.
ख्रि. पू. ३९९ या वर्षीं स्पार्टाच्या राजानें हें शहर हस्तगत केलें. ख्रि. पूर्व ३१२ त येथील अन्तर्दुर्गाला तटबंदी करण्यांत आली. परंतु थोडक्याच काळानंतर फायलेमॉन या अँटिगोनसच्या सेनापतीनें ती पाडून टाकिली.