विभाग नववा : ई-अंशुमान
एलेनबरो (लॉर्ड-१७९०-१८७१) हिंदुस्थानचा एक गव्हर्नर जनरल (१८४२-४४). याचें शिक्षण ईटन आणि केंब्रिज येथें झालें सेंट मायकेल परगण्यातर्फें तो १८१८ पर्यंत हाऊस ऑफ कॉमन्सचा सभासद असे. त्या सालीं बापाच्या मृत्यूमुळें त्याला हाऊस ऑफ लॉर्डसमध्यें जागा मिळाली. १८२८ तील वेलिंग्टनच्या कारभारांत त्याला ‘लॉर्ड प्रीव्हीसील’ (राजाच्या खासगी मोर्तबाचा अधिकारी) करण्यांत आलें. परराष्ट्रीय राजकारणांत त्यांचे बरेंच लक्ष असे. पण त्याला परराष्ट्रमंत्र्याची जागा न मिळतां बोर्ड ऑफ कंट्रोलच्या अध्यक्षाचा मान मिळाला. हिंदुस्थानचा राज्यकारभार कंपनीकडून काढून घेऊन तो प्रत्यक्ष राजाकडे द्यावा असें त्याचें मत होतें. मध्यआशियाचें ज्ञान करून घेण्याकरितां त्यानें बर्नेसला तिकडे पाठविलें. लॉर्ड ऑकलंडच्या मागून डायरेक्टरांनीं गव्हर्नर जनरलच्या जागीं एलेबरोची नेमणूक केली (१८४२). एलेनबरो आशियांत शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशानें गेला खरा पण त्याची अडीच वर्षांची सबंध अमदानी युद्धांत निघून गेली. हिंदुस्थानांत पाय ठेवल्यावर त्याला काबूल येतें इंग्लिशांची झालेली कत्तल, गझनी आणि जलालाबाद यांनां पडलेला वेढा व मद्रासच्या शिपायांची बंड करण्याची तयारी यांसारख्या चिंताजनक वार्ता कानीं आल्या. प्रथम अफगाणांचा पाडाव करून मग त्यांनां वाटेल तें करण्यास मोकळें ठेवावयाचे हा त्याचा पहिला बेत लगेच फिरून ब्रिटिश कैद्यांनां सोडविण्याकरितां पुढें चाल करून जात असलेल्या पोलॉक व नॉट या सेनापतींनां त्यानें मागें फिरण्याचा हुकूम केला. पण त्या शूर सरदारांनीं पहिलाच हुकूम मानून काबूलवर हल्ला चढविला व अफगाणांचा पुरा सूड उगविला. तेव्हां एलेनबरोहि आनंदानें बेहोष होऊन त्यानें नॉटला सुलतान महंमदानें सोमनाथाचें देवालय लुटून गझनीला नेलेले चंदनी दरवाजे परत आणण्याविषयीं लिहिलें; व त्यांच्या स्वागतार्थ मोठा समारंभ करण्याचा बेत करून जाहिरनामा काढिला. हा हास्यास्पद समारंभ कोणालाहि आवडला नाहीं. शिवाय गझनीहून आणलेले दरवाजे खरे सोमनाथाचे चंदनी दरवाजे नसून गझनीच्या मुसुलमान कारागिरांनीं पाईन लांकडाचे त्याबरहुकूम केलेले दरवाजे होते. पण लॉर्ड साहेबांनां स्वत:च्या बडेजावीची मोठी हौस असल्यामुळें त्यांनीं अशा प्रकारचे दुसरे कांहीं समारंभ करविले.
यानंतर सिंधच्या अमीराशीं विनाकारण युद्ध सुरू केलें व तो प्रांत आपल्या घशांत घातला; कारण सिंधुनदींतून होणारा व्यापार स्वतंत्रपणें सरकारला आपणाकडे पाहिजे होता. हें अन्यायी वर्तन इंग्रज इतिहासकार व्हिन्सेंट स्मिथ यालाहि पसंत नाहीं. सिंध लुबाडल्यानंतर ग्वाल्हेर संस्थानांतली लष्करी सत्ता मोडण्यांत आली; पण एलेनबरोनें यावेळीं मोठा शहाणपणा दाखवून ग्वाल्हेरचें राज्य कायम ठेविलें. ग्वाल्हेरवरची ही मोहीम अवश्यक होती; कारण पुढें शीख सैन्य व हें बंडखोर शिंद्यांचें सैन्य एक झालें असतें तर शीखयुद्ध कोणत्या थराला गेलें असतें तें सांगवत नाहीं. पण डायरेक्टर लोकांनां एलेनबरोला परत बोलाविणें जरूर वाटलें (१८४४); कारण जरी इंग्लंडचे कारभारीमंडळ व राणी यांच्या तो विश्वासांतला होता तरी डायरेक्टरांची तो मुर्वत ठेवींत नसे व त्यांचें ऐकत नसे. या गव्हर्नरनें गुलामगिरी अमान्य ठरविणारा कायदा केला, लॉटरी बंद केल्या व बंगालमधील पोलिसांची सुधारणा केली.
इंग्लंडांत गेल्यावर १८४६ त तो पहिला आरमारी अधिकारी झाला. १८५८ त चवथ्यानें बोर्ड ऑफ कंट्रोलचा अध्यक्ष झाला. लॉर्ड कॅनिंगच्या अयोध्येच्या जाहीरनाम्याविरूद्ध यानें टाईम्समध्यें खरमरीत टीका केल्यावरून दोन्ही हाऊसनीं त्याच्यासंबंधीं निंदाव्यंजक ठराव पास केला; तेव्हां त्याला राजीनामा देणें भाग पडलें. १८५८ सालीं हिंदुस्थानच्या राज्यकारभारांत जो फेरबदल झाला तो बहुतेक सर्व १८५२ त एलेनबरोनें हाऊस ऑफ कॉमन्सच्या सिलेक्ट कमीटीपुढें दिलेल्या साक्षींत ग्रथित केलेला होता. तेव्हां १८५८ नंतरची हिंदुस्थानची राज्यघटना त्यानेंच आंखल्याप्रमाणें होती असें म्हणणें वावगें होणार नाहीं. अफगाणिस्तानासंबंधीं त्याचें धोरण, सिंधची जप्ती व ग्वाल्हेरवर मोहीम या त्याच्या अमदानींतल्या मुख्य गोष्टी होत. व त्यासंबंधीं अनुकूल प्रतिकूल टीका पुष्कळ होऊन गेल्या आहेत.
[संदर्भग्रंथ:- लॉर्ड कोलचेस्टर संपादित हिस्टरी ऑफ दि इंडियन अॅडमिनिस्ट्रेशन (बेंटले. १८७४). मिनिट्स ऑफ एव्हिडन्स टेकन बिफोर दि सिलेक्ट कमिटी ऑन इंडियन टेरिटरीज (जून १८५२). फ्रेंड ऑफ इंडिया (१८४२-१८४५); सिंधच्या इतिहासावरील ग्रंथ स्मिथ-दि ऑक्सफोर्ड हिस्टरी ऑफ इंडिया].