विभाग नववा : ई-अंशुमान
एल्जिन - एल्जिन हें स्कॉटलंड देशामधील एल्जिनशायर परगण्यांतलें मुख्य गांव असून रॉयल, म्युनिसिपल व पोलिसबरो आहे. हें गांव लॉसी नदीवर वसलेलें आहे. याची लोकसंख्या (१९०१) ८४६० होती. हें फार प्राचीन गांव आहे. येथील एका टेंकडीवर गॉर्डनच्या ड्यूकचें स्मारक आहे. आगीनें या शहराचें फार नुकसान झालें. इ. स. १७४६ त राजपुत्र चार्लस एडवर्ड हा थंडर्टन वाड्यांत राहिला होता. १९व्या शतकाच्या आरंभापासून या शहरांत सुधारणा झाली. हें स्कॉटलंडमधील निसर्गरमणीय प्रदेशांत असून येथील निरोगी हवा, स्वस्त रहाणी शिक्षणसंस्था यामुळें याची बरीच भरभराट झाली आहे. इ. स. १२२४ त बांधलेलें मोरेचें प्रार्थनामंदीर, नगरभवन, पदार्थसंग्रहालय, शिक्षणसंस्था, बाजार, कला व शास्त्र यांचें व्हिक्टोरिया विद्यालय, हीं महत्त्वाचीं स्थळें आहेत. येथील उद्योगधंदे म्हणजे दारू गाळणे, कातडीं कमावणें, लोखंडाचे ओतीव काम करणें, लोंकरीचीं वस्त्रें विणणे वगैरे आहेत. एल्जिन व दुसरीं पांच शहरें मिळून पार्लमेंटांत एक सभासद पाठवितात. एल्जिनच्या दक्षिणेस २||मैलांवर बिनीं नांवाचें स्कॉटलंडमधील अतिशय जुन्यांपैकीं एक प्रार्थनामंदीर आहे. हें इ. स. ११५० च्या पूर्वी बांधलें असावें.