विभाग नववा : ई-अंशुमान
एल्जिन लॉर्ड (१८११-१८६३)-हिंदुस्थानचा एक व्हाईसरॉय व गव्हर्नर-जनरल (१८६२-६३). १८४१ त हा ८ वा अर्ल ऑफ एल्जिन व १२ वा अर्ल ऑफ किंकार्डाईन या नांवानें सरदार झाला. डलहौसी व कॅनिंग यांच्या जोडीनें हा ईटन व ऑक्सफोर्ड या ठिकाणीं विद्याभ्यास करीत होता. १८४२ त त्याला जमेकाचा गव्हर्नर व पुढें चार वर्षांनीं कानडाचा गव्हर्नर-जनरल नेमण्यांत आलें. या दोन्ही हुद्दयांवर असतांना त्यानें लोकांनां संतोषी व सुखी ठेऊन कारभार हांकला. १८५६ त चीन व इंग्लंड यांमध्यें तंटा उपस्थित झाला असतां याला चीनशीं बोलणें करण्याकरितां पाठविलें. लॉर्ड कॅनिंगनंतर याला हिंदुस्थानचा व्हाईसरॉय व गव्हर्नरजनरल नेमण्यांत आलें. त्याला या अधिकारावर असतांना फारसें कास करतां आलें नाहीं सरहद्दीवरील बंडें मोडण्याकरितां त्यानें जय्यत तयारी ठेवली होती. सुमात्रामध्यें वरचढ झालेल्या डच लोकांनां आपल्या काबूंत आणण्याची त्यानें मोठी खटपट केली. चहाची लागवड व तिबेट आणि काश्गर यांनां जाणारे व्यापारी मार्ग हे प्रश्न निकालांत काढण्याकरितां सिमल्याहून सियालकोटला जात असतां वाटेंत धर्मशाळा या ठिकाणीं तो मृत्यु पावला. वालरोडनें त्याचीं पत्रें व रोजनिशा एकत्र करून प्रसिद्ध केल्या आहेत तो ग्रंथ याचें समग्र चरित्र अवगमण्यास उपयोगी पडेल. ‘फ्रेंड ऑफ इंडिया’ १८६२-१८६३ मध्यें याचा हिंदुस्थानांतील छोटा कारभार वर्णिला आहे.
(२) याच नांवाचा हिंदुस्थानचा दुसरा एक व्हाइसरॉय (१८९४-९९). हा वरील एल्जिनचा मुलगा असून याची कारकीर्द मोठीशीं महत्त्वाची झाली नाहीं. १८९७-९८ मधील सरहद्दीवरची बंडाळी हीच काय ती या कारकीर्दीतील विशेष गोष्ट म्हणतां येईल. पहिला प्लेग व भयंकर दुष्काळ या आपत्तीनीं याच्या अमदानींत हिंदुस्थान ग्रासलें गेलें होतें. १९०५ सालीं कॅंपबेल-बॅनरमन मुख्य प्रधान असतां हा वसाहतींचा सेक्रेटरी म्हणून नेमला गेला. पण याचा अंडर सेक्रेटरी विन्स्टन वर्चिल याच्यापुढें एल्जिनचें तेज पडेना. १९०८ सालीं आस्क्विथ मुख्य प्रधान झाला तेव्हां एल्जिनला प्रधानमंडळ सोडावें लागलें.